मिलिंद तेलतुंबडेला 1982 नंतर भेटलो नाही

डॉ. आनंद तेलतुंबडे : “एल्गार’च्या आयोजनात माझा संबंध नाही
 
पुणे – मी आंतरराष्ट्रीय ख्यातीचा विचारवंत आहे. मला अनेक देशांत वेगवेगळ्या परिषदेत बोलण्यासाठी आमंत्रित करण्यात येते. अशाप्रकारे माझ्यावर कारवाई करणे खेदजनक आहे. भूमिगत कॉ. मिलिंद तेलतुंबडे हा माझा सर्वांत छोटा भाऊ आहे. तरीही मागील 38 वर्षांपासून आमचा संपर्क नसल्याचे डॉ. आनंद तेलतुंबडे यांनी सांगितले.
न्यायालयाच्या आदेशानंतर सुटका केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मी आयआयटी अहमदाबाद येथे 1982 साली शिक्षण घेतले. तेव्हापासून आमच्यात कोणताही संपर्क आलेला नाही.

“एल्गार’च्या आयोजनात माझा संबंध नव्हता. त्यादिवशी एल्गार परिषदेच्या पूर्वी व्यासपीठाजवळ माझे काही नातेवाईक आणि मित्र यांना भेटण्यास मी गेलो होतो. मात्र, मित्राच्या घरातील लग्न असल्याने परिषदेस न थांबता गोव्याला परतलो. अनुराधा गांधी मेमोरियल कमिटी मार्फत विविध लेक्‍चर घेण्यात येतात. अनुराधा गांधी ही प्राध्यपिका होती, ती जन्मजात माओवादी नव्हती. डेमॉक्रेटिक राईट ऑर्गनायझेशनशी संबंधित असलेल्या प्रा. शोमा सेन, सुधा भारद्वाज, अरुण परेरा, गौतम नवलखा यांना अटक करण्यात आली आहे. माझ्या विरोधात पोलिसांनी ई-मेलचे पुरावे दिले असले तरी, त्याची प्रामाणिकता न्यायालयात सिद्ध होईल.

देशात कायद्याचे राज्य नाही…

पॅरिस परिषदेकरिता मला अमेरिकन विद्यापीठाच्या निमंत्रणावरून बोलविण्यात आले होते. त्याचा खर्च पॅरिसमधील विद्यापीठाने केला होता. पॅरिस दौरा पोलीस आणि राज्य सरकारवर थोड्याच दिवसांत बूमरॅंग होणार आहे. माझ्या परदेश दौऱ्याकरिता कोणत्याही संघटनेने पैसे दिलेले नाही. याप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात खटला चालला तर शासन उघडे पडेल. मी एैरागैरा नसून मला जगभरातून परिषदेत बोलण्याकरिता आंमत्रणे येत असतात. देशात कायद्याचे राज्य नाही, फॅसिझम वाढत आहे. कोणतेही सरकार सत्तेत आले, तरी मी सरकारच्या त्रुटीबाबत लिखाण करत असतो, असे डॉ. तेलतुंबडे यांनी यावेळी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)