मिलिंदराव, नवीन लढाई इतकी सोपी नाही

संदीप राक्षे 

पक्षनिष्ठा की राज निष्ठा अशी दुहेरी कसरत करावी लागणार

सातारा : केवळ अपघात किंवा नशिबाचा हात काही पण म्हणा भाजपचे घोषित पालिका गटनेते मिलिंद काकडे यांच्या बाबतीत ही म्हण अगदीच लागू पडते. मात्र राजकीय योगायोग असा की ज्या खासदार उदयनराजे भोसले यांचा कट्टर कार्यकर्ता म्हणून काकडे यांची ओळख आहे ,त्यांच्याच सत्ताधारी सातारा विकास आघाडीच्या विरोधात काकडे यांना भाजपच्या तंबूतून शस्त्रे परजावी लागणार आहेत. त्यामुळे एकसंघ गटबांधणीसह विरोधकांना शह देण्याची महत्वपूर्ण कामगिरी मिलिंद काकडे यांना करावी लागणार आहे. त्यामुळे मिलिंदराव तुमची लढाई निश्‍चितच सोपी नसणारं आहे हे आता सांगण्याची वेळ आहे.

पक्षनिष्ठा की राज निष्ठा अशी दुहेरी कसरत नूतन गटनेत्यांची होणार असून पुढच्या 15 महिन्यात काकडे काय बांधणी करणार यावर पक्षश्रेष्ठीचे बारकाईने लक्ष असणार आहे. 2016 डिसेंबरच्या पालिका निवडणुकांमध्ये भाजपने जे बेरजेचे राजकारण केले त्यात उदयनराजे यांचे खंदे समर्थक मिलिंदराव राजेंच्याच सूचनेवरून भाजपवासी झाले. प्रभाग क्रं दोन मधून मुरलीधर भोसले यांचा 46 मतांनी पराभव करून मिलिंद काकडे यांनी पालिका गाठली. आणि शहराच्या पूर्व भागातील भाजपचा पहिला नगरसेवक म्हणून मानं मिळवला. मात्र गेल्या पंधरा महिन्यात गटनेते धनंजय जांभळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने जे राजकीय डावपेच आखले त्यात काकडे यांनी केवळ ठरावाच्या विरोधात मतदान करण्यासाठीच हात वर केले.

उदयनराजे यांच्या सातारा विकास आघाडी विरुद्ध कधी ब्र उच्चारला नाही. 1991-1996; 2001-2006 या दोन टर्ममध्ये मिलिंद काकडे यांच्या मातोश्री मंदाकिनी काकडे यांनी नगरसेवक म्हणून खासदार उदयनराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली कामाचा ठसा उमटविला. अभ्यासपूर्ण मांडणी हे मंदाकिनी काकडे यांचे वैशिष्टय होते. तीच वेळ आता गटनेत्यांवर आली आहे. भाजपच्या गोटात असूनही कधीच भाजपच्या न वाटलेल्या मिलिंद काकडे यांना पक्षाच्या संघटनात्मक बांधणीची कमान सांभाळावी लागणार आहे.

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूकीत काकडे पक्षादेश डावलून राजेंच्या वळचणीला राहिले. काही महत्वं पूर्ण ठराव मतदानांच्या वेळी काकडे यांनी हातच वर केला नाही. हा त्यांचा अचंबित व्यवहार कोणालाच पटला नाही. मात्र मिलिंद काकडे यांच्यासमोर कार्यकर्त्याची दुभंगलेली फळी सांधण्याचे अवघड कार्य समोर आहे. सर्वसाधारण सभामध्ये विरोधातला भाजपचा पवित्रा काय व कसा असणार याची आखणी काकडे यांना करावी लागणार आहे. जांभळे यांच्या महत्वाकांक्षेला मुरडं घालून विजय काटवटे – सिध्दी पवार ही जोडी सोबतीला ठेवण्याचे जवाबदारी काकडे यांना पार पाडावी लागेल.

प्रसंगी सातारा विकास आघाडीचा टोकाचा विरोध पत्करणे आणि तितकाच धारदार विरोध चुकीच्या ठरावांना करणे अशा महत्वपूर्ण कामांसाठी महसूलमंत्र्यांनी मिलिंद काकडे या ना संधी देउन ट्रायल आणि एररं चा फॉर्म्यूला कायम ठेवला आहे. त्यामुळे भाजपच्या गटबांधणीची लढाई काकडे यांच्यासाठी निश्‍चित सोपी नाही

भाजपच्या गोटात संमिश्र प्रतिक्रिया
मिलिंद काकडे यांची भाजपच्या पालिका गटनेतेपदी निवड करण्यात आली. यावर सर्वांनी एकमताने दादांच्या समोर मंजूरीच्या माना डोलावल्या प्रत्यक्षात भाजपचे स्थानिक नेते दादांच्या या निर्णयाने फारसे खूश नाहीत. त्यामुळे सध्या भाजपच्या गोटात प्रचंड सन्नाटा आहे. मात्र लोकसभा निवडणुकांचे वाजणारे पडघम अवघ्या वर्षभरात वाजणार आहेत. त्यात चंद्रकांत दादांनी खास पध्दतीने उदयनराजे यांच्या सावि आच्या विरोधात उदयनराजे फॅन मिलिंद काकडे यानाच उभे केले आहे. या राजकीय घडामोडींचा क्‍लायमॅक्‍स पुढील वर्षात कसा रंगवायचा याचा डायरेक्‍टर कट थेट दादांकडे असणार आहेत.

कमराबंद चर्चा होणार

गटनेतेपदाच्या अनौपचारिक घोषणेवर शिक्कामोर्तब करुन घेण्यासाठी दुपारी तीन नंतर मिलिंद काकडे कराडला रवाना झाले. भाजप जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांची ते भेट घेणार आहेत त्यात पत्र स्वीकृती आणि कमराबंद चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे. कराडमधून गटनेतेपदाची अधिकृत घोषणा करणारे निवेदन प्रसिद्ध करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)