मिरी येथील अपघातात एकजण ठार

पाथर्डी, दि. 18 (प्रतिनिधी) – मिरी येथे लग्नाला जात असताना रेणुकाईवाडी शिवारात सकाळी मिरीकडून येणाऱ्या भरधाव पिकअपने दुसऱ्या पिकअपच्या पाठीमागील बाजूस जोराची धडक दिली. त्यामुळे केळवंडी येथील भाऊसाहेब आठरे (वय 67) यांचा वाहनातून पडून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी, गुरुवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास अशोक कोठे हे आपल्या मालकीची पिकअप गाडी घेऊन मिरी येथे लग्नाच्या कार्यक्रमासाठी चालले होते. यावेळी गाडीमध्ये लग्नाच्या काही वस्तू, तसेच काही लोक होते. यादरम्यान प्रवास करत असताना तिसगावकडून मिरी येथे जात असताना रेणुकाईवाडी गावाच्या शिवारात सकाळी 8.30 च्या सुमारास मिरीकडून येणाऱ्या पिकअपच्या (एम.एच. 16, 3065) चालकाने त्याची गाडी भरघाव वेगात चालवून अशोक कोठे यांच्या गाडीच्या उजव्या बाजूच्या पाठीमागच्या भागाला जोराची धडक दिली.
यावेळी धडक दिल्याने गाडीमधील भाऊसाहेब आठरे (वय-67) रोडवर उडून पडले. त्यामुळे त्यांना जबर मार लागून ते जागीच मयत झाले. या गाडीतील सीताबाई शिरसाठ, लक्ष्मीबाई शिरसाठ (सर्व रा. केळवडी) तसेच मीना केदार यांनाही किरकोळ दुखापत झाली आहे. मयत भाऊसाहेब आठरे यांचे पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अपघातात गाडीचेही बरेच नुकसान झालेले आहे. याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशनमध्ये अशोक कोठे यांच्या फिर्यादीवरून वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास हेडकॉन्स्टेबल भोईटे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)