मियामी ओपन टेनिस स्पर्धा; हालेपचा डोडिनवर संघर्षपूर्ण विजय

मियामी  – अग्रमानांकित टेनिसपटू सिमोना हालेपने बिगरमानांकित ओशन डोडिनवर 3-6, 6-3, 7-5 असा संघर्षपूर्ण विजय मिळवताना मियामी ओपन टेनिस स्पर्धेच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. तर बिगरमानांकित झरीना दियासने 18व्या मानांकित स्वेतलाना कुझनेत्सोवावर, तसेच अन्य एका सामन्यात मोनिका निक्‍युलेस्क्‍यूने 17व्या मानांकित मॅग्दालेना रिबारिकोव्हाला पराभूत करताना खळबळ उडविली. इतर महत्त्वाच्या सामन्यांमध्ये कॅरोलिना प्लिस्कोवा, अँजेलीक कर्बर, कॅरिना विथॉफ्ट व व्हिक्‍टारिया आझारेन्का यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करताना तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

इंडियन वेल्स टेनिस स्पर्धेत बिगर मानांकित खेळाडूकडून पराभव पत्करून हालेप स्पर्धेतून बाद झाली होती. मियामी ओपनच्या दुसऱ्या फेरीतील सामन्यातही तिला बिगरमानांकित खेळाडूने झुंजवले. हा सामना तीन सेटपर्यंत चालला. सामन्याचा पहिला सेट जिंकत डोडिनने सनसनाटी निर्माण केली होती. पहिल्या सेट डोडीनने 6-3 असा आपल्या नावे केला होता. त्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये पुनरागमन करत हालेपने दुसरा सेट 6-3 असा जिंकला. मात्र यानंतरही हालेप दडपणाखाली असल्याचे जाणवत होते. याचाच फायदा घेत डोडिनने हालेपवर जोरदार हल्ला चढवीत सनसनाटी निकालासाठी प्रयत्न केले. परंतु हालेपने डोडिनचा दबाव झुगारून देत जोरदार प्रत्युत्तर दिले आणि हा सेट 7-5 असा जिंकत सामना आपल्या नावे केला.

आजच्या दुसऱ्या सामन्यात झरिना दियास या बिगरमानांकित खेळाडूने 18व्या मानांकित स्वेतलाना कुझनेत्सोव्हाचा 6-1, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. सामन्याच्या पहिल्या मिनिटापासून सामन्यावर झरिनाने वर्चस्व राखले आणि स्वेतलानावर दबाव वाढवत सामना आपल्या जिंकला. अन्य एका सामन्यात बिगरमानांकित मोनिका निक्‍युलेस्क्‍यूने 17व्या मानांकित मॅग्दालेना रिबारिकोव्हाला 6-3, 6-3 असे नमवत टेनिस विश्‍वात खळबळ माजवली. सामन्याच्या पहिल्या मिनिटापासूनच मोनिकाने आक्रमक धोरण अवलंबले. दबावाखाली आलेल्या मॅग्दालेनाने सामन्यात अनेक चुका केला. याचा पुरेपूर फायदा घेत मोनिकाने सामना सहज जिंकत पुढील फेरीत प्रवेश केला.

तर या स्पर्धेतील इतर महत्वाच्या सामन्यांमध्ये कॅरोलिना प्लिस्कोव्हाने एकाटेरिना माकारोव्हावर 7-5, 7-5 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. दुसऱ्या सामन्यात अँजेलिक कर्बरने जोहाना लार्सनला 6-2, 6-2 असे सरळ सेटमध्ये हरवले. तर कॅरिना विथॉफ्टने ज्युलिया जॉर्जला संघर्षपूर्ण लढतीत 7-6, 4-6, 6-4 असे नमवले. व्हिक्‍टोरिया आझारेन्का आणि मॅडिसन कीज यांच्या सामन्यातील पहिला सेट आझारेन्काने संघर्षपूर्ण लढत देत 7-6 (5) असा जिंकला. मात्र दुसरा सेट सुरू असताना कीजने सामन्यातून माघार घेतल्यामुळे हा सामना जिंकत व्हिक्‍टोरियाने पुढील फेरीत प्रवेश केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)