मिमिक्री

अबाऊट टर्न

जगातल्या कोणत्याही दोन व्यक्‍तींचा आवाज हुबेहूब एकमेकांसारखा नसतो. नाटकवाल्यांमध्ये जे लोक “व्हॉइस अँड स्पीच कल्चर’चा अभ्यास करतात, त्यांना हे नक्‍कीच माहीत असेल. प्रत्येकाच्या आवाजाला पीच, व्हॉल्यूम आणि वैशिष्ट्य असे तीन भाग असतात. त्यापैकी वैशिष्ट्य कधीच फारसे बदलता येत नाही. हे अल्पसे ज्ञान आम्हाला पडलेल्या प्रश्‍नामधून मिळालेलं आहे. “मिमिक्री आर्टिस्ट’ म्हणजे नकलाकार नेमकं काय करतो? इतक्‍या वेगवेगळ्या व्यक्‍तींच्या आवाजाची हुबेहूब नक्‍कल तो कशी काय करू शकतो? मिमिक्री आर्टिस्ट फक्‍त पीच आणि व्हॉल्यूमच्या मदतीनं एखाद्या व्यक्‍तीच्या आवाजाचं वैशिष्ट्य गाठण्याचा प्रयत्न करतो. ज्याला ते जास्तीत जास्त जमतं, तो चांगला मिमिक्रियन म्हणून नावारूपाला येतो.

बाकी गल्लीबोळात बरेच मिमिक्री आर्टिस्ट असतातच की! विशेषतः अमिताभ बच्चन यांनी केलेल्या जाहिरातींची मराठी आवृत्ती पाहा! “आम्ही हिंदी ऐकतो… आम्हाला नको भाषांतर…’ असं ओरडून सांगावंसं वाटतं, त्या जाहिराती मराठीत पाहताना! कुणीही कुणाचाही आवाज काढावा, हे इतकं का सोपं असतं? आता हेच पाहा ना… एका मिमिक्री आर्टिस्टनं मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांच्याच आवाजाची नक्कल करण्याचा प्रयत्न केला. आला की नाही अंगलट? दोन साथीदारांसह त्याला अखेर बेड्या पडल्याच. आपण राजकारण्याच्या आवाजाची नक्‍कल करून दुसऱ्या एका राजकारण्यालाच फसवतोय, याची त्याला कल्पनाच नव्हती, असंही नाही. तरीही पठ्ठ्यानं नको ते धाडस केलंच!

आजच्या जगात महत्त्वाकांक्षा कुणाला नाहीत? फसवणारा माणूस नेहमी महत्त्वाकांक्षी माणसाला पकडतो. ज्याला पैसा वाढवायचा आहे, त्याला सहा महिन्यांत दामदुप्पट करून देण्याचं आमिष दाखवलं जातं. बेकारीनं गांजलेल्या तरुणाला नोकरीचं आमिष दाखवून लुटलं जातं. लग्न न होणाऱ्यांना चांगल्या स्थळाचं आमिष दाखवून पैसे उकळले जातात. राजकारणात तर महत्त्वाकांक्षांना तोटाच नाही. “युवा नेता’ असं लिहून ज्याचा फलक नाक्‍यावर आजच झळकलाय, त्यालाही उद्या आपण आमदार होणार असं वाटतं.

मग एखाद्या नगरसेवकाला तसं वाटत असलं तर त्यात गैर काय! ठाण्याचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांना विधान परिषदेची आमदारकी मिळवून देण्याचं आमिष दाखवून तिघांनी एक भन्नाट कट रचला. या तिघात एका महिलेचाही समावेश आहे. “मुख्यमंत्र्यांशी माझी चांगली ओळख असून, तुम्हाला विधान परिषदेची उमेदवारी मिळू शकते,’ असा फोन या मंडळींनी डुंबरे यांना केला आणि नंतर चक्‍क मुख्यमंत्र्यांचाच आवाज त्यांना ऐकवला. डुंबरे यांचा “बायोडाटा’ घेतलाय ना, असं “मुख्यमंत्र्यांनी’ डुंबरे यांच्यासमोर त्यांच्या “सहायका’ला विचारलंसुद्धा! अर्थातच या सगळ्या गोष्टी फोनवरून झाल्या.

प्लॅन चांगला होता… पण आपण एका राजकारण्याला टोपी घालायला निघालोय, हे या ठग मंडळींनी लक्षातच घेतलं नाही. राजकारणी लोक स्वतःचा रेकॉर्ड केलेला आवाजसुद्धा “आपलाच आहे ना’ या शंकेनं तीन-तीनदा तपासून बघतात. मुख्यमंत्र्यांच्या आवाजाची शहानिशा केल्याशिवाय दहा कोटींचा सौदा करेल का कुणी? बरं, आवाज तरी हुबेहूब काढायचा प्रयत्न करावा… किंवा दहा कोटींसाठी चांगल्या मिमिक्री आर्टिस्टला लाख-दोन लाखांची सुपारी तरी द्यावी. तेही नाही! बिनभांडवली व्यवसाय करायला गेले आणि आले की गोत्यात!

– हिमांशु


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)