मिफ २०१८ : सामाजिक प्रश्नांना चित्रपटातून वाचा फोडण्याचा दिग्दर्शकांचा प्रयत्न

नवनवे आणि अस्पर्श्य विषय चित्रपटासारख्या प्रभावी माध्यमातून लोकांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवोदित दिग्दर्शकांसाठी मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव हे एक उत्तम व्यासपीठ आहे. दिग्दर्शक हर्षल वाडकर आणि विनोद कांबळे या दोघांनीही आपल्या लघुपटातून अतिशय वेगळे विषय रसिकांसमोर मांडले आहेत. हर्षलचा ‘कन्वरसेशन’ आणि विनोदचा ‘पोस्ट मोर्टम’ हे दोन्ही लघुपट मिफच्या भारतीय चित्रपट स्पर्धा गटात निवडले गेले आहेत.

हर्षल वाडेकरचा लघुपट कन्वरसेशन, एका तरुणीची कथा आहे जी आपल्या प्रियकरासोबत पहिल्यांदाच शारीरिक सुख उपभोगण्यासाठी जाते अत्यंत खाजगी, तरल क्षण अनुभवत असताना या दोघांमध्ये आंतरिक संवाद सुरु होतो. अनेक वर्षांपासून मनात दाबून ठेवलेल्या अव्यक्त भावना, फँटसी, अकल्पित विचार ही मुलगी आपल्या प्रियकरासमोर विश्वासाने, मोकळेपणाने मांडते… या दोघांच्या मनाचा खरा “संवाद”इथूनच सुरु होतो. केवळ काही तासांत चित्रित झालेल्या या लघुपटात दिग्दर्शकाने हा धाडसी विषय मांडला आहे. चित्रपटात नायिकेची भूमिका प्रगल्भा कोलेकर या नवोदित अभिनेत्रीने केली आहे. आज या महोत्सवात हर्षल आणि प्रगल्भाने या लघुपटामागची भूमिका आणि चित्रीकरणाचे अनुभव पत्रकारांना सांगितले.

-Ads-

या लघुपट कृष्णधवल रंगात चित्रित करण्यात आला आहे. गजबजलेल्या, गर्दीत हरवलेल्या मनातल्या अत्यंत हळुवार,खोल भावना कृष्ण धवल स्वरूपात जास्त प्रभावीपणे पोचवता येतात, त्यामुळे या प्रकाराची निवड केल्याचं हर्षलनं सांगितलं. पुरुष असो वा स्त्री, अनेकदा अंतरिक भावना सामान असतात, आपल्या कल्पनेच्या पलीकडच्या असतात, पण सामाजिक संकेत, संकोच, संस्कार यामुळे आपण त्या व्यक्त करायला धजावत नाही. या चित्रपटातून संस्कार आणि भावना यांच्यातलं द्वंदव पार करत, त्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न या युवा दिग्दर्शकाने केला आहे.

विनोद कांबळे यांचा लघुपट “पोस्ट मार्टेम”  सफाई कामगारांच्या कुटुंबातल्या “गोपी” या १४ वर्षाच्या मुलाची कथा आहे. लहान वयात वडलांचा आधार हरपलेल्या गोपीवर कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी येते आणि त्यामुळे त्याला शिक्षण अर्धवट सोडावं लागतं. एकीकडे शिक्षणाची आवड आणि ध्यास  तर दुसरीकडे घराची जबाबदारी यातला गोपीचा संघर्ष या चित्रपटात मांडण्यात आला आहे. सामाजिक जाणीवा जपणाऱ्या अभिनेत्री वैशाली केंदळे यांनी या चित्रपटात गोपीच्या आईची भूमिका साकारली आहे.

या चित्रपटाविषयी सांगताना विनोद कांबळे म्हणालेत की हा संपूर्ण चित्रपट खऱ्या लोकेशन्सवर चित्रित करण्यात आला आहे. चित्रपट आणि त्यातील व्यक्तीरेखांचं  वास्तव आयुष्य प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे मांडलं जावं, यासाठी सगळी वास्तव दृश्य चित्रित केल्याचं  विनोदने सांगितलं.गोपीची भूमिका स्वप्नील ढवळेने साकारली आहे.

सिनेमा हे  समाजावर खोलवर परिमाण करणारं प्रभावी माध्यम आहे, ह्यावर दृढ विश्वास असलेल्या या मराठमोळ्या युवा दिग्दर्शकांनी हे विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला हव्या तशा पद्धतीने, हवा तो विषय प्रेक्षकांपर्यत नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या नवोदित दिग्दर्शकांना हा प्रयत्न नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)