मित्रानेच काढला मित्राचा काटा

  • अनैतिक संबंधाच्या संशयावरून दगड डोक्‍यात घालून केला खून

यवत – आपल्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयावरून मित्रानेच मित्राच्या डोक्‍यात दगड घालून खून केल्याची घटना घडली आहे. यानंतर हा केलेला खून दडपण्यासाठी कालव्याच्या पाण्यात टाकून दिला. परंतु पोलिसांनी शिताफीने तपास करीत आरोपीला रात्री ताब्यात घेत अटक केली आहे. याबाबत आरोपीने मित्राचा खून केल्याची कबुली दिली आहे. बापू धोंडिबा डोंबाळे (रा. साळोबावस्ती, खुटबाव, ता. दौंड, जि. पुणे) असे आरोपीचे नाव आहे. तर, संतोष चांगदेव कदम (वय 35, रा. कदमवस्ती यवत, ता. दौंड, जि. पुणे) असे खून झालेल्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपी डोंबाळे आणि मयत कदम हे दोघे मित्र होते. कदम यांचे बापू डोंबाळे याच्या घरी येणे-जाणे होत होते. आपल्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याचा आरोपी डोंबाळे याला संशय होता. त्यानुसार आरोपीने कदम यांचा खून करण्याचे ठरविले. त्यानुसार बारामती येथे नातेवाईकाकडे पैसे आणायला जायचे आहे, असे सांगून (दि.18) गुढीपाडव्या दिवशी हे दोघे दुचाकीवरून बारामतीला गेले. त्या रात्री हे दोघे बारामती तालुक्‍यातील कोऱ्हाळे बुद्रुकनजीक पेशवेवस्ती येथील हनुमान मंदिरात झोपले. यावेळी आरोपी बापू डोंबाळे याने आपला मित्र कदम यांच्या डोक्‍यात झोपेत असताना मध्यरात्री दगड घालून त्याचा खून केला. यानंतर हा खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी दुचाकीला पाठीमागे दोराने बांधून अमानुषपणे एक किलो मीटर ओढत नीरा डावा कालव्याच्या पाण्यात संतोष कदम यांचा मृतदेह टाकून देण्यात आला.
यानंतर दि. 20 रोजी मानाप्पावस्ती येथील जहागीरदार वस्तीनजीक एका शाळकरी मुलाला पाण्याच्या प्रवाहात कदम यांचा मृतदेह तरंगत असताना दिसला. पोलिसांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने तो मृतदेह बाहेर काढला. तसेच तपासणी केली असता पॅन्टच्या खिशात आधारकार्ड सापडल्याने मृत कदम यांची ओळख पटली. या घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ संदीप पखाले, उपविभागीय पोलीस अधिकारी बापू बांगर यांनी घटनास्थळी भेट देऊन आरोपीच्या तपासाबाबत सूचना केल्या. त्यानुसार यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, वडगांव निंबाळकर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गणेश पोटे, संभाजी कदम, दशरथ बनसोडे, वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे कल्याण खांडेकर, पोलीस हवालदार विशाल नगरे, सलमान खान यांनी गोपनियतेने माहिती काढून यातील मयत संतोष कदम याचा मित्र आरोपी बापू डोबांळे यास मध्यरात्री त्याच्या घरातून ताब्यात घेतले. याबाबत अधिक चौकशी केली असता आपल्या मित्राचा खून केल्याचे आरोपी डोंबाळे याने कबुली दिली आहे. मयत आणि खून करणारा आरोपी हे दोघे दौंड तालुक्‍यातील आहेत. परंतु खुनाची घटना वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असल्याने आरोपी डोंबाळे यास वडगाव निंबाळकर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)