मित्राचा खून करणारा पोलिसांच्या जाळ्यात

दारूच्या नशेतील कृत्य : 48 तासांत गुन्ह्याची उकल

पुणे – किरकोळ कारणावरुन दारुच्या नशेत मित्राचा खून करुन त्याचा मृतदेह टेकडीवर टाकणाऱ्या तरुणास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे, 15 जून रोजी कात्रज परिसरातील टेकडीवर हा प्रकार घडला होता. विशेष म्हणजे, कोणताही धागादोरा नसतानाही भारती विद्यापीठ पोलिसांनी अवघ्या 48 तासांत हा गुन्हा उघडकीस आणून आरोपीला जेरबंद केले आहे.

दीपक अंकुश लोणके (वय, 25, रा. दत्तनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. शानु छन्नम खान ( वय 32, रा. संतोषनगर, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. लोणके आणि खान हे दोघे मित्र आहेत. त्यांच्यात किरकोळ कारणावरुन वाद झाला होता. याचा राग लोणके याच्या मनामध्ये होता. त्यावर लोणके याने खान याला रात्री दहा वाजता कात्रजजवळील विश्‍वेश्‍वर टेकडीवर नेले. तेथे या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला, त्यावेळी लोणके याने खान याच्यावर धारदार शस्राने वार करुन त्याचा खून केला. त्यानंतर लोणके याने खान याचा मृतदेह टेकडीवर टाकून दिला. दोघेही फिरस्ते असल्याने हा खून कोणी केला, याचा छडा लावणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. आरोपी आणि माहिती मिळण्याची शक्‍यता धूसर असल्याने पोलीसांनी वेगवेगळ्या दिशेने तपास सुरू केला होता. त्यानुसार पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी त्यादिवशी लोणके आणि खान हे दोघे बराचवेळ एकत्र फिरत असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले होते, त्यानुसार पोलिसांनी लोणके याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने खान याचा खून केल्याची कबुली दिली.

अप्पर पोलीस आयुक्त रविंद्र सेनगावकर, उपायुक्त प्रविण मुंढे, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह गायकवाड, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे, पोलीस उपनिरीक्षक समाधान कदम, कर्मचारी अरुण मोहिते, अमोल पवार, प्रणव संकपाळ, उज्वल मोकाशी, सर्फराज देशमुख, कुंदन शिंदे, गणेश चिंचकर, महेश मंडलिक, अभिजित रत्नपारखी आणि भिमराव पुरी यांच्या पथकाने ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)