मिटिंग पे मिटिंग अन्‌ तारीख पे तारीख मनपाचा कारभार

अधिकाऱ्यांतील बेबनाव चव्हाट्यावर


उत्पन्नाचे स्त्रोत वाढविणे गरजेचे


ऐंशी टक्के लोक काम करत नाहीत

नगर – स्थायी समितीच्या सभेत 619 कोटींच्या अर्थसंकल्पावर चर्चा झाली. नवीन उत्पन्नाचे स्त्रोत शोधणे, आहे त्या स्त्रोतांवर प्रामाणिकपणे मेहनत घेत उत्पन्न वाढविणे यासह अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमता व कर्मचाऱ्यांचे वर्तन याबाबतही चर्चा झाली.

सभापती सुवर्णा जाथव यांनी वेळोवेळी कामातील दुरुस्तीबाबत सूचना केल्या. दरम्यान, अधिकाऱ्यांतील बेबनाव मात्र या सभेत चव्हाट्यावर आला. तर, समस्या सोडविणे, आस्थापनांचा परस्पर समन्वय याबाबत फक्त मिटिंग पे मिटींग अन्‌ तारीख पे तारीख होत असल्याबाबत सभेत खेद व्यक्त करण्यात आला.सुरुवातीलाच विलास वालगुडेंच्या (दि.19) बैठकीला अनुपस्थित असणे गाजले. त्यांनी वसुलीच्या कामाचा हवाला देत त्यांची बाजू मांडली. तसेच, प्रत्येक बाब आयुक्तांना सांगूनच केली पाहिजे असे काही नाही, असे ते म्हणाले. वसुलीच्या कामात लिपिकांची कमतरता, शिपायांना लिहिता-वाचता न येणे, आदेशांचे पालन न करणे, आदी मुद्दे वालगुडेंनी सुरुवातीलाच सभेपुढे स्पष्ट केले.

अभ्यास करून या! -सुवर्णा जाधव
सभेत अधिकाऱ्यांना त्यांच्याकडील जबाबदारीची माहिती देता येत नव्हती. वारंवार विचारूनही अपुरी माहिती दिली जात होती. त्यावर, ज्याच्याकडे जे खाते आहे त्याला त्याच खात्याची काहीच माहिती नाही. सर्वांनी आधी अभ्यास करावा, अशी खंत सभापती सुवर्णा जाधव यांनी व्यक्त केली.

त्यानंतर लेखाशीर्षानुसार बाबींची चर्चा सुरू झाली. त्यात बाबासाहेब वाकळे, दत्ता कावरे, आदींनी मनपा हद्दीतील बिगरशेती जागांचा कर तहसील कार्यालय घेते; आपण का घेत नाही? याबाबत खुलासा मागविला. शासन निर्णयानुसार असा कर मनपाने घ्यायला पाहिजे. त्यातून उत्पन्नात वाढ होईल ही बाब त्यांनी लक्षात आणून दिली. गाळ्यांच्या भाड्यांचाही प्रश्‍न चर्चेत आला. सध्या वाढीव भाड्याला होणाऱ्या विरोधामुळे गाळेधारक कर भरत नाहीत. तो वसूल होण्याचे नियोजन हवे. ढिसाळ कारभारामुळे आपणच आपल्या मनपाची स्थिती खालावली आहे. सगळ्याच विभागात अव्यवस्था आहे. ऐंशी टक्के लोक काम करत नाहीत, अशी तक्रार पदाधिकाऱ्यांनी केली. तसा याचा रोष आमच्यावर येत असल्याचे त्यांचे म्हणणे होते.

सिद्धिबागेत भेळवाले साफसफाई करतात, कर्मचारी नाही ही बाब योग्य नाही. मोबाइल मनोऱ्यांचे उत्पन्न मिळविण्याबाबत ठोस कारवाई करण्याची सूचना पुढे आली. एका मनोऱ्यावर तीन-चार संस्था असतात. वसुली मात्र एकाच संस्थेची होते याकडेही लक्ष वेधण्यात आले. मनपा हद्दीत 234 मनोरे आहेत. नगर रचना विभागाने केवळ 55 मनोऱ्यांना परवानगी दिली आहे.

शास्ती माफी करण्याच्या निर्णयावरही चर्चा झाली. परंतु, पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे याबाबत निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन मागविण्याचे आयुक्‍यांनी सांगितले. तर, आस्थापना खर्च सध्या 70 टक्के आहे तो 35 टक्‍क्‍यांपर्यंत आणण्याची गरज आहे. तसे झाले तरच मनपा अस्तित्त्वात येताना ठरल्यानुसार स्टाफिंग पॅटर्न राबविणे शक्‍य असल्याचे आयुक्त मंगळे यांनी सांगितले. तर, शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी स्वतंत्र शीर्ष (हेड) सुरू करण्याचे ठरले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)