माहित नाही…!!!

किती मस्त आहे ना देवाचं.. निसर्गाच्या सानिध्यात , ठंडगार वाऱ्याचा आस्वाद घेत , काहीही न करता मस्त बसून असतो मंदिरात…”ना जेवण बनवायची लगबग, ना पोटासाठी करियर ची धडपड़….रोज नित्य नेमाने नैवेद्य येतो आणि पुण्यात वास्तव्य असल्याने वेळेवर झोप सुद्धा मिळते.” या सर्व विचारांची जुगलबंदी करत मी बाकड्यावर निवांत बसुन होते.”प्रसाद घे गं पोरी!!” असा आवाज कानावर पड़ताच भानावर येऊन वर पाहिले तर एक आजोबा प्रसाद घेऊन माझ्या समोर उभे होते.

प्रसाद घेऊन जराशी सरकले आणि आजोबांना बसायला जागा दिली.सर्वत्र शांतता पसरली होती , त्या शांततेचा भंग करत नोकिया ची जूनी रिंगटोन ऐकू यायला लागली.सगळ्यांचे लक्ष त्या फ़ोन ने वेधुन घेतले होते.त्यामुळे आजोबा गड़बडून गेले.आलेला फ़ोन उचलण्यासाठी, त्यांची धडपड सुरु झाली.फोन उचलून “माहित नाही” एवढे दोनच शब्द बोलून त्यांनी फ़ोन ठेवला.फ़ोन उचलण्यासाठी 5 ते 7 मिनिटे लागली पण बोलणे फ़क्त काही सेकंदापुरते….असं का??काय माहित नाही?? कशाचे उत्तर आहे हे??अश्‍या बऱ्याच प्रश्नांचा मनात गोंधळ सुरु झाला. पण आजोबांना विचारायचे कसे?? अनोळखी व्यक्तिला कसे विचारणार..पण थोडसं धाडस करुन “सगळं ठीक आहे ना आजोबा’ असे मी विचारले. आजोबांनी स्वताला सावरत होकरार्थी मान डोलावली.

अनोळखी व्यक्ति असेच बोलत असावेत. परत विषय तिथल्या तिथेच “माहित नाही’ कोणाला ? आणि काय माहित नाही? तेवढ्यात कानावर आवाज आला, “तू कशी काय इकडे?’ आवाजानेच ओळखले ह्या नानी काकू…प्रश्नाचं उत्तर देतच होते की लगेच पुढचा प्रश्न हजर, गेली नाही का अजुन म्हैसुरला? अशी प्रश्नांची सरबती सुरु करुन नानी काकूंनी माझे संपूर्ण रामायण-महाभारत जाणून घेतले. आणि सगळं काही विचारून झाल्यावर ,चल गं उशीर होतोय मला असे म्हणत जशा आल्या तश्‍या निघुनपण गेल्या. या दरम्यान आजोबा तिथेच बसून होते. त्यांच्या कानावर माझ्यात आणि नानी काकुंमध्ये झालेला संवाद पड़ला असावा. म्हणून आजोबांनी विचारले,”गनोबा’ची वाट बघत आहेस का? या प्रश्नावरुन मला हसू फुटले, कारण नानी काकूंनी इथे कशी?असं विचारल्यावर, गनोबाला भेटायला असे मी म्हणाले होते.

हसत हसतच म्हणाले,”बसला आहे ना मंदिरात त्याची वाट कशी बघणार आजोबा…’ कोण गं?? अहो तुम्ही ज्याला गणपती बाप्पा म्हणता, त्याला मी गनोबा म्हणते. ते ऐकून आजोबांना पण हसू फुटले… “तुम्ही मूलं पण ना’, असं म्हणत आजोबा हसू लागले. एवढं सगळं चालू असुन सुद्ध्‌ माझ्या मनात “माहित नाहीचा’ गोंधळ सुरुच होता. गनोबा ने एका अनोळखी व्यक्तीला जाणून घेण्याची संधी दिली होती, त्याच संधीचा फायदा घेत मी आजोबांशी बोलू लागले… मी एक विचारु का आजोबा? असं म्हणाले. आजोबानी होकरार्थी मान डोलावली ,”मगाशी आलेला तो फ़ोन कोणाचा होता?’ आजोबा उत्तरले मुलाचा. आणि “माहित नाही” हे उत्तर कशाचे? ह्या प्रश्नाला आजोबा शांत होते, मला वाटले त्यांना वाईट वाटलं की काय म्हणून सॉरी म्हणत मी आजोबांकड़े बघितले तर ते कोणत्या तरी विचारात मग्न झाले होते.

भरलेल्या आवाजात आजोबा म्हणाले, काही नाही पोरी, मुलाने विचारले आज तुमची जेवणाची सोय काय आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे बघ माहित नाही. त्यांच्या आवाजावरूनच त्यांना झालेला त्रास मला जाणवत होता. मी उगाच प्रश्न विचारला अस म्हणत सॉरी हं आजोबा अस म्हणून मी शांत बसले, परत तुम्ही मूलं पण ना , अस म्हणून आजोबा उठले. निघतो गं पोरी, जेवणाची सोय बघायला हवी असे म्हणत निघुन गेले….दोन दिवस आजोबा वारंवार डोळ्यासमोर येत होते. आजोबांबद्दलचे बरेच प्रश्न मनात गोंधळ घालत होते. म्हणून नक्की काय घडले असेल हे जाणून घेण्यासाठी मी काही दिवसांनी परत मंदिरात आले. तिथे येऊन समजले की आजोबांच्या बायकोचा आज दहावा आहे. म्हणजे मी ज्या दिवशी आजोबांना भेटले होते तेव्हा ते त्यांचं सर्वस्व हरवून बसलेले असताना, त्यांचा मुलगा जेवणाची सोय काय? म्हणून फ़ोन करतो. हे सगळ समजल्यानंतर आता उमगत होतं मला की आजोबा “तुम्ही मूलं पण ना’ असं का म्हंटले असावेत.

– प्राजक्ता जाधव


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)