माहिती फलक शोपीस ; अनेक योजना अडगळीत

सागर येवले 

जिल्हा परिषदेतील फलकांचा दिखावूपणा


अधिकाऱ्यांना योजनांबाबत अनभिज्ञ

पुणे – जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना समजावी यासाठी जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येक विभागात माहिती फलक लावण्यात आले आहेत. मात्र, हे फलक केवळ शोभेचे बनले असून, यातील अनेक योजना या बंद झाल्या असून, काही योजना असून नसल्यासारख्या आहेत. धक्‍कादायक बाब म्हणजे अधिकाऱ्यांनाच काही योजनांबाबत माहिती नसल्याचे दिसून आले. त्यामुळे हे फलक केवळ दिखावा म्हणून लावलेत का? असा प्रश्‍न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

केंद्र आणि राज्य शासनाकडून गोरगरिबांसह मध्यमवर्गीय नागरिकांसाठी विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. या योजना तळागाळापर्यंत पोहचाव्यात, प्रत्येक लाभार्थ्याला त्याचा लाभ मिळावा यासाठी विभागीय कार्यालयांमार्फत या योजनांचा प्रसार केला जातो. त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या वतीनेही जिल्हास्तरावर विविध योजना राबविल्या जातात. दरम्यान, या योजनांची माहिती सर्वांना समजावी यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये योजनांचे माहिती फलक लावावे, असे आदेश देण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येक विभागामध्ये माहिती फलक लावण्यात आले आहे. मात्र, या फलकावरील योजनांची माहिती घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडे गेले असता, यातील बहुतांश योजना बंद असल्याचे समोर आले.

जिल्हा परिषदेमध्ये महिला व बालकल्याण, कृषी व पशुसंवर्धन, ग्रामपंचायत विभाग, समाजकल्याण, आरोग्य आणि बांधकाम या विभागाकडून विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचे माहिती फलक प्रत्येक विभागात दर्शनी भागात लावण्यात आले आहेत. त्यामध्ये ग्रामपंचायत विभागाकडून शासन निधी आणि जिल्हा परिषद या दोन्ही निधीतून मिळून एकूण 15 ते 16 प्रकारच्या योजना राबविल्या जातात. मात्र, त्यातील काही योजना बंद असून, काही योजना निधीअभावी राबविता येत नसल्याचे समोर आले आहे.

महिला व बालकल्याण विभागाकडून 12 पेक्षा जास्त योजना राबविल्या जातात. त्याअंतर्गत येणाऱ्या योजनांचा आकडा एकत्र केला तर ती संख्या 20 वर जाते. तर समाजकल्याण विभागाकडूनही 20 प्रकारच्या विविध योजना राबविल्या जातात. कृषी आणि पशुपालन, ग्रामीण पाणीपुरवठा, आरोग्य यासह अन्य विभागाकडून अनेक योजना राबविल्या जातात. मात्र, यातील बोटावर मोजण्या इतक्‍याच योजना सध्या सुरू असून, लाभार्थ्यांची संख्या दिवसेंदिवेस कमी होताना दिसत आहेत.

ती योजना आता बंद झाली…
ग्रामपंचायत विभागाकडून राबविण्यात येणारी गृहस्वामीनी योजना काय आहे, याबाबतच माहिती विचारली असता ती बंद झाली. यासह अन्य योजनांची माहिती घेतली असता ती राज्य शासनाकडून राबविण्यात येते, निधी नसल्यामुळे योजना राबविली नाही, कधी तरी राबवतो, आता या जुन्या योजना झाल्या, पूर्वीचे बोर्ड आहेत. ते अजून बदलले नाहीत, अशी उत्तरे अधिकाऱ्यांकडून येतात. एवढच काय तर या योजनेमध्ये विविध पुरस्कारांचाही समावेश आहे. मात्र, मागील दोन ते तीन वर्षांपासून हे पुरस्कार दिले नसून, यावर्षी सर्व पुरस्कारांचे वाटप करण्यात आले. मुलींसाठी सायकल वाटप योजना नियोजन शुन्यमुळे गुंडाळावी लागली. असे अनेक योजना या केवळ कागदावर आणि फलकांवर राहिल्या आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेतील माहिती फलक आता केवळ “शोभेचे’ ठरत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)