माहिती तंत्रज्ञान क्रांतीमुळे कोकणवासियांचे जीवन उजळेल – दीपक केसरकर

सिंधुदुर्गमधील एक लाख घरात इंटरनेट सेवा व मोफत सेट टॉपबाक्ससाठी सामंजस्य करार

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना ई-एज्युकेशन व स्पर्धा परीक्षेचे धडे मिळावेत, यासाठी जिल्ह्यातील एक लाख घरांमध्ये इंटरनेट जोडणी व मोफत सेट टॉप बॉक्स देण्यासंबंधी भारत संचार निगम लिमिटेड (बी.एस.एन.एल) व स्ट्रीम कास्ट कंपनी यांच्यात आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला. यावेळी, ग्रामीण भागातील घरे इंटरनेटने जोडला जाणारा सिंधुदुर्ग हा पहिला जिल्हा असून या माध्यमातून कोकणात होणाऱ्या माहिती तंत्रज्ञान क्रांतीमुळे कोकणवासियांचे जीवन उजळून निघेल, असे प्रतिपादन दीपक केसरकर यांनी केले.

-Ads-

दीपक केसरकर यांच्या पुढाकाराने झालेल्या या कार्यक्रमास मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, बीएसएनएलचे मुख्य महाव्यवस्थापक पियुष खरे, स्ट्रिम कास्टचे चेअरमन निमिष पांड्या, स्ट्रिम कास्टच्या ई एज्युकेशन विभागाच्या प्रमुख असिमा चिल्लाळ उपस्थित होते. यावेळी श्री. ठाकरे यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे ज्ञान प्रबोधिनीची घोषणा केली.

केसरकर म्हणाले, सिंधुदुर्गसारख्या भागात इंटरनेट सेवा सुरू होण्यासाठी हा सामंजस्य करार महत्त्वपूर्ण असून सिंधुदुर्गवासियांसाठी हा दिवस ऐतिहासिक आहे. या योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सेट टॉप बॉक्समध्ये बीएसएनएलची इंटरनेट जोडणी असणार आहे. यामधून विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शक अभ्यासक्रम, शालेय विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निंग आदी सुविधा असणार आहेत. सर्वसामान्यांच्या घरापर्यंत पोहोचण्यासाठी वेगळे तंत्रज्ञान आणणे आवश्यक आहे. स्ट्रिम कास्ट कंपनीने हे तंत्रज्ञान लो बँडविड्थवर उपलब्ध करून दिले आहे. या योजनेत सेट टॉप बॉक्स मोफत मिळणार असून इंटरनेट सेवेसाठी अतिशय माफक शुल्क आकारण्यात येणार आहे.

कोकणातील पदवीधरांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी सिंधुदुर्गमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्स उभारण्यात येणार आहे. यासाठी स्ट्रिमकास्ट कंपनी सुमारे शंभर कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याबरोबरच इतर चार जिल्ह्यातही या सेंटर ऑफ एक्सलन्सच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय ही कंपनी आशिया खंडातील सर्वात मोठे डेटा सेंटर सिंधुदुर्गमध्ये उभारणार आहे. या माध्यमातून कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात माहिती तंत्रज्ञान क्रांती होणार आहे, असेही केसरकर यांनी सांगितले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)