माहितीच्या विक्रीचा एक नवाच “फेस’

     चर्चा

 महेश कोळी

फेसबुकच्या पाच कोटी यूजर्सचा डाटा चोरून त्याचा दुरुपयोग केल्याचा आरोप केंब्रिज ऍनालिटिका या ब्रिटिश डाटा ऍनालिसिस फर्मवर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे फेसबुकही संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून, फेसबुककडून चूक झाल्याचे मार्क झुकेरबर्ग यांनी मान्यही केले आहे. सोशल मीडियावरील विश्‍वास उडविणाऱ्या या चिंतेत टाकणाऱ्या घटना आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फेसबुकवर यूजर्सची संपूर्ण माहिती उपलब्ध असते. नाव, रहिवास, वय, लिंग यासह एखाद्या व्यक्‍तीच्या राजकीय विचारसरणीपर्यंत सर्वकाही फेसबुकवरून समजू शकते. अशी माहिती आधार कार्डाद्वारे सरकारला उपलब्ध होऊ शकते. म्हणजेच फेसबुकचा सर्वेसर्वा मार्क झुकेरबर्गकडे कुणाचेही “आधार कार्ड’ न जमा करताही सगळी माहिती उपलब्ध आहे. आजकाल प्रत्येकजण आपल्या गोपनीयतेबद्दल दक्ष बनला असतानाच फेसबुककडे दिलेला हा डाटा कितपत सुरक्षित आहे, हा प्रश्‍न अनेकांना पडत होताच. हा प्रश्‍न योग्यच होता आणि तिथे माहिती सुरक्षित नाही, हे जगाला समजून चुकले आहे.

“केंब्रिज ऍनालिटिका’ या ब्रिटिश डाटा ऍनालिसिस फर्मसंदर्भात निर्माण झालेला ताजा वाद जगभरातील फेसबुक यूजर्सची डोकेदुखी ठरला आहे. या कंपनीवर फेसबुकच्या पाच कोटी यूजर्सचा डाटा चोरल्याचा आणि त्याचा दुरुपयोग निवडणूक प्रचारादरम्यान केल्याचा आरोप आहे. सन 2016 मध्ये झालेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या      निवडणुकीदरम्यान या कंपनीने सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सेवा दिली होती. न्यूयॉर्क टाइम्स आणि लंडन ऑब्झर्व्हर या माध्यमांनी यासंदर्भात धक्कादायक खुलासा केला आहे. समोर आलेली परिस्थिती पाहून कोणीही फेसबुककडे साशंक नजरेने पाहणे स्वाभाविक आहे. केंब्रिज ऍनालिटिकाने नेमका कसा हा घोटाळा केला असेल? फेसबुक यासाठी किती प्रमाणात जबाबदार असेल? एखाद्या देशाच्या सरकारपेक्षाही फेसबुक आता शक्‍तिशाली झाले आहे की काय? अमेरिका, ब्रिटन आणि युरोपीय महासंघाचे या घोटाळ्याविषयी काय मत आहे? भारताने काय भूमिका घ्यायला हवी? असे प्रश्‍न पडणे स्वाभाविक आहे. या प्रश्‍नांची उत्तरे प्रत्येकजण आपापल्या परीने शोधण्याचा प्रयत्न करतो आहे.

त्यामुळे फेसबुक नावाचे सर्वांत मोठे सोशल व्यासपीठ संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून, लाखो यूजर्सनी फेसबुकला रामराम ठोकल्याचेही वृत्त आले आहे. मतदारांचे मत बनविण्यासाठी त्यांचा डाटा वापरण्यात आला, असा आरोप केंब्रिज ऍनालिटिकावर करण्यात आला आहे. या कंपनीचे भारतातील निवडणुकांशी संलग्न लोकांशीही लागेबांधे असल्याचे समोर येऊ लागले आहे. या कंपनीच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, सन 2010 च्या बिहार निवडणुकांमध्ये कंपनीला कंत्राट मिळाले होते आणि निर्धारित लक्ष्याच्या 90 टक्‍क्‍यांहून अधिक जागांवर कंपनीचे “क्‍लाएन्ट’ मोठ्या मताधिक्‍क्‍याने विजयी झाले होते. सन 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आता ही कंपनी भारतातील राजकीय पक्षांच्या संपर्कात आहे, असे सांगितले जाते. म्हणजे, केवळ अमेरिकेतीलच नव्हे तर जगभरातील कोणत्याही निवडणुकांमध्ये अशा मोठ्या प्रमाणावर संकलित केलेल्या डाटाच्या पृथक्‍करणाच्या आधारे मतदारांवर प्रभाव टाकण्याचे, त्यांचे मन वळविण्याचे आणि मत बनविण्याचे उद्योग सुरू आहेत.

पाच कोटी लोकांचा डाटा चोरीस गेल्याच्या प्रकरणात फेसबुकही आरोपीच्या पिंजऱ्यात आहे. फेसबुकने ही चोरी “होऊ दिल्याचा’ गंभीर आरोप केला जात आहे. ही चोरी 2015 मधील आहे; मात्र गेल्या आठवड्यात जेव्हा हे प्रकरण समोर आले, तोपर्यंत फेसबुक गप्पच राहिले. या मौनामुळेही फेसबुकवर संशय घेण्याजोगी परिस्थिती निर्माण होते. फेसबुकचा एकही यूजर फेसबुकला एक रुपयाही देत नाही. मग फेसबुकला एवढी अब्जावधी डॉलरची कमाई होते तरी कशी? हा प्रश्‍न आहेच. जगाच्या लोकसंख्येच्या एक चतुर्थांश लोक सध्या फेसबुक यूजर्स आहेत. दररोज सुमारे 200 कोटी यूजर्स फेसबुकवर लाइक, कमेन्टसह फोटो अपडेट करण्यासारख्या कृती करतात. प्रत्येक यूजर फेसबुकवर दिवसातला सरासरी 42 मिनिटांचा वेळ घालवतो. आजमितीस फेसबुकची कमाई सुमारे 72 हजार कोटींच्या आसपास पोहोचली आहे.

फेसबुक यूजर्सकडून एक रुपयाही घेत नाही; मात्र मोठ्या प्रमाणावर डाटा संकलन करते आणि व्यावसायिक जगताला हा डाटा विकला जातो. आपला प्रत्येक क्‍लिक आपल्याला एखाद्या व्यावसायिक कंपनीशी जोडत असते. म्हणजेच, व्यावसायिक कंपन्यांना आपल्याकडील डाटा विकून फेसबुक आपली कमाई करते. काही साइट्‌सवर जाण्यापूर्वी “आपण फेसबुकच्या माध्यमातूनच या साइटवर जाऊ इच्छिता का,’ असा प्रश्‍न विचारला जातो. त्याचे उत्तर “येस’ असे दिले तर संबंधित साइटला आपली फेसबुकवरची माहिती आपोआप मिळते. डाटाविषयी कोणतीही जबाबदारीफेसबुक   घेत नाही, तसेच व्यक्‍तिगत माहितीच्या खरे-खोटेपणाचीही जबाबदारी फेसबुकची नसते. डिजिटल स्पेसमधील “फेसबुक’ ही कंपनी आज जगातील सर्वांत मोठा ब्रॅंड बनली आहे. कंपनीची बाजारपेठेतील प्रतिमा खूप मोठी आहे. म्हणून, जेव्हा हा घोटाळा उघड झाला, तेव्हापासून कंपनीचे शेअर्स कोसळू लागले.

फेसबुकचा सगळा आर्थिक खेळ जाहिरातींच्या “प्लेसिंग’चा आहे. या प्रक्रियेला “टार्गेटिंग’ म्हणजे लक्षित करणे असे म्हणतात. मानवी व्यवहारांच्या संदर्भातील हा डाटा फेसबुक केवळ व्यावसायिक कंपन्यांनाच नव्हे तर राजकीय पक्षांनाही उपलब्ध करून देते. “ब्रेक्‍झिट’च्या काळात मच्छिमारीशी संबंधित लोकांचे असेच “टार्गेटिंग’ करण्यात आले होते. या प्रक्रियेत कोण, कुणावर, किती प्रभाव पाडू शकतो आणि त्याला किती लाभ मिळतो, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. त्याचप्रमाणे डाटा विकण्याच्या आणि खरेदी करण्याच्या या प्रक्रियेत किती रक्‍कम कुणाला मिळते, हेही स्पष्ट होऊ शकत नाही. केम्ब्रिज ऍनालिटिका कंपनीचा संस्थापक ख्रिस्तोफर वायली याने केलेल्या खुलाशानुसार, कंपनीने पाच कोटी फेसबुक यूजर्सचा पर्सनल डाटा मिळवून त्याचा वापर केला होता. ऍनालिटिकाने या माहितीचा उपयोग ट्रम्प यांच्या निवडणूक मोहिमेदरम्यान मतदारांना प्रभावित करण्यासाठी केला होता.

भारतात माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार (2000) व्यक्‍तिगत डाटा लीक झाल्यास संबंधिताला भरपाई मिळण्याची तसेच डाटा लीक करणाऱ्याला शिक्षा होण्याची तरतूद आहे. पासवर्ड, आर्थिक माहिती, आरोग्यविषयक माहिती आणि बायोमेट्रिक माहिती याला कायदा संवेदनशील माहिती मानतो. आपल्याकडेही काही वर्षांपूर्वीपासून राजकीय पक्षांमध्ये सोशल मीडियावर पकड मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा लागल्याचे पाहायला मिळते. ब्रिटबार्ट या वेबसाइटचे संस्थापक स्टीव्ह बॅनन यांनी ख्रिस्तोफर वायली याची डाटाचा उपयोग एखाद्या शस्त्रासारखा करण्याची क्षमता पाहिली आणि त्याच्यासोबत ब्रिटनमध्ये केंब्रिज ऍनालिटिका या कंपनीची मुहूर्तमेढ रोवली.

डाटा संकलित करण्याकडे त्यांनी एक फायदेशीर संधी म्हणून पाहिले. त्याच वेळी कंजर्व्हेटिव्ह हेजफंडचे अब्जाधीश रॉबर्ट मर्सर यांनी या सर्व योजनेसाठी पैसा पुरविला. केम्ब्रिज विद्यापीठाचे मानसतज्ज्ञ प्रा. अलेक्‍झांडर कोगान यांनी “धिस इज युवर डिजिटल लाइफ’ नावाचे ऍप तयार केले. प्रा. कोगान यांचे ऍप भविष्यात एवढी मोठी खळबळ उडवून देणार आहे, याची त्यावेळी कुणालाच कल्पना नव्हती. व्यक्तिगत माहिती मिळविणे, विकणे आणि खरेदी करणे हा एक व्यवसाय बनत असल्याचे या घटनांवरून दिसून येत असून, सोशल मीडियावरील विश्‍वास उडविणाऱ्या या घटना आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)