मासिक पाळीबद्दल दुर्दैवाने आपल्या समाजात अजूनदेखील गैरसमजांचे जाळे पसरले आहे. अजूनदेखील मासिक पाळीला विटाळ म्हणून तिच्याकडे घृणास्पद नजरेने बघितले जाते व पाळीबद्दलच्या याच नकारात्मक दृष्टिकोनामुळे काही नुकत्याच वयात आलेल्या मुलींना पाळीचा व त्या दिवसांचा तिरस्कार वाटून त्यांच्याकडून पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेतल्या जातात, मुळात बहुतांशी पालकांमध्येच पाळीबद्दलची जाणीव जागृती व पाळीमागील शास्त्रीय कारणांची पुरेशी माहिती नसल्याकारणाने ही माहिती त्यांच्या पाल्यांकडे देखील योग्य रीतीने पोहोचत नाही.
मासिक पाळी म्हणजे काय?
दर महिन्याला एक स्त्री बीज बीजांडामधून परिपक्व होऊन बाहेर पडते व त्याच्या वाढीसाठी गर्भाशयात एक आवरण तयार होते. उदरात पडलेले हे स्त्री बीज गर्भाशय नलिकेत जाते व 24 तास शुक्राणूंची वाट बघते व शुक्राणू न आल्यास स्त्री बीज फलित होत नाही त्यामुळे फलित न झालेल्या बिजासहित हे आवरण रक्ताच्या स्वरूपात शरीराबाहेर टाकले जाते; म्हणून रक्तस्त्राव होतो व त्यालाच मासिक पाळी असे म्हणतात. हा रक्तस्त्राव साधारणतः 2 ते 5 दिवस सुरू रहातो.
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास जसे आपल्या घरी येऊ घातलेल्या नवजात बाळासाठी आपण गुबगुबीत गादी, मऊ मखमली दुपटे अशी जय्यत तयारी करतो तसेच स्त्रीचे शरीरदेखील बाळासाठी गर्भाशयाच्या बाजूने मऊ, मखमली आवरण तयार करते व बाळ 9 महिने त्या मऊ आवरणात सुखरूपपणे वाढते परंतु; जर या गर्भाशयात बाळच नसेल तर या आवरणाचा काय उपयोग? त्यामुळे शरीर हे आवरण बाहेर टाकून देते व तिलाच आपण मासिक पाळी म्हणतो.
मासिक पाळीमध्ये घ्यावयाची काळजी
मासिक पाळी ही साधारणतः दर 28 दिवसांनी येते तरीही कमीत कमी 21 व जास्तीत जास्ती 35 दिवसांनी आली तरी त्यात वावगे असे काहीच नाही परंतु मासिक पाळी ही खूप अनियमित असल्यास तसेच रक्तस्रावाचे प्रमाण खूप कमी अथवा खूप अधिक असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. तसेच,
मासिक पाळी समज- गैरसमज…
मासिक पाळी म्हणजे शरीरातील अशुद्ध रक्त बाहेर टाकण्याची एक प्रक्रिया होय; ही एक अत्यंत चुकीची समजूत बहुतांशी आढळून येते, तसेच पाळी ही विटाळ असल्याने पाळीच्या दिवसात देवाला शिवू नये व बाजूला बसावे ही अजून एक अंधश्रद्धा खूप ठिकाणी दिसून येते, तसेच पॅड वापरू नये कारण वापरलेले उघडे पॅड जर सापाने चाटले तर ज्या स्त्री चे हे पॅड आहे ती स्त्री निर्वंश होते. अशा प्रकारच्या असंख्य अंधश्रद्धांचा उहापोह आपल्या समाजात या 21 व्या शतकात देखील माजतो आहे परंतु, यामागची शास्त्रीय कारणे समजून घेणे अत्यावश्यक आहे. पूर्वीच्या काळी स्त्रिया या सतत घरकामात जुंपलेल्या असत त्यामुळे त्यांना पाळीच्या काळातील होणाऱ्या शारीरिक त्रासातून थोडा आराम मिळावा यासाठी तिला बाजूला बसविण्याची पद्धत पडली परंतु; त्याचा संबंध समाजातील काही लोकांनी देवाशी जोडला तसेच वापरलेले पॅड उघड्यावर फेकल्याने कोणालाही त्याचा संसर्ग होऊ शकतो म्हणून पॅड उघड्यावर फेकू नये; पण, या गोष्टीचा संबंध साप, निर्वंशतता यांसारख्या बिनबुडाच्या गोष्टींशी जोडला गेला व या अंधश्रद्धांची निर्मिती झाली.
मासिक पाळी ही श्राप नसून परमेश्वराने प्रत्येक स्त्रीला दिलेले एक वरदानच आहे. या मासिक पाळीच्या प्रक्रियेतूनच एक स्त्री आई होऊ शकते तर, याच मासिक पाळीमुळे प्रत्येक स्त्री निरोगी आयुष्य जगू शकते; त्यामुळे मासिक पाळीचा संबंध अंधश्रद्धांशी न जोडता त्यामागील शास्त्रीय कारणे समजून घेऊन प्रत्येक स्त्रीने या मासिक पाळीला आपल्या आयुष्यातील निसर्गाने दिलेली एक सुंदर भेट म्हणून स्वीकारणेच रास्त ठरेल.
ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
गर्भ धारनेसाठी स्री चा योग्य काळ कोणता?
कोणत्या दिवसात मूल धारणा होउ शकते?