मावळ तालुक्‍यात मूर्ती दानास उत्स्फूर्त प्रतिसाद

तळेगाव-दाभाडे – मावळ तालुक्‍यात गुरुवारी गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी बऱ्याच गणेशोत्सव मंडळ आणि भक्‍तांनी गणेश विसर्जन केले. पण यावर्षी विसर्जन थोड्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आले. नदीत मूर्ती विसर्जित करण्याऐवजी मंडळांनी आणि भक्‍तांनी आपल्या बाप्पाच्या मूर्तीचे दान केले.

गणेशोत्सव मंडळाच्या व घरगुती गणेश मूर्ती व पूजेचे साहित्य इंद्रायणी नदीत विसर्जन न करता रोटरी क्‍लब ऑफ तळेगाव सिटीच्या “पर्यावरणाला मान; मूर्ती दान : विसर्जना ऐवजी मूर्ती दान करा’ योजनेस जागरुक भक्‍त आणि कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेकांनी गणेश मूर्ती व पूजेचे साहित्य दान करून इंद्रायणी नदीत होणारे प्रदूषण रोखण्याचा संदेश दिला. यावेळी कातवी येथील इंद्रायणी नदीपात्राच्या गणेशमूर्ती विसर्जन घाटावर सुमारे 450 लहान व मोठ्या गणेशमूर्ती व मोठ्या प्रमाणात पूजेचे साहित्य जमा केले. गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी तसेच नागरिकांनी या योजनेचे स्वागत केले.

रोटरी क्‍लब ऑफ तळेगाव सिटीचे संस्थापक विलास काळोखे म्हणाले, पाणी हे जीवन असून गणेशमूर्ती व पूजेचे साहित्य टाकल्याने नदी प्रदूषित होऊन जलचरांचे अस्तित्व धोक्‍यात येते. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती नदीतील पाणी ओसरल्यावर तुटलेल्या अवस्थेत आढळतात. एक प्रकारे ही बाप्पांची विटंबनाच आहे. नदी प्रदूषण रोखण्यासाठी “पर्यावरणाला मान; मूर्ती दान : विसर्जना ऐवजी मूर्ती दान करा.’