मावळ गोळीबारातील 13 जखमींना महापालिका सेवेत घ्या

पिंपरी – पवना बंद जलवाहिनी टाकण्यावरून मावळ तालुक्‍यातील बऊर येथे 2011 मध्ये झालेल्या गोळीबारात जखमी झालेल्या 13 आंदोलकांना महापालिका सेवेत सामावू घेत, 180 जणांवरील खटले मागे घेण्याची मागणी मावळ तालुक्‍यातील शिष्टमंडळाने केली आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा करत, विविध मागण्यांचे निवदन सादर केले.

या शिष्टमंडळात मावळ पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथराव टिळे, ज्ञानेश्‍वर दळवी, शिवसेना पुणे जिल्हा उपप्रमुख भारत ठाकूर, भाजप मावळ तालुका सरचिटणीस बाळासाहेब जाधव, उर्से ग्रामपंचायतीचे जयसिंग ठाकूर, जालिंदर चौधरी, गणेश ठाकर आदींचा समावेश होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांशी विविध मागण्यावर चर्चा केली. 9 ऑगस्ट 2011 रोजी क्रांतीदिनी महापालिकेच्या बंद पाईप योजनेला विरोध करताना तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप कर्णिक यांच्या आदेशावरून पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या गोळीबारात तीन जणांचा मृत्यु झाला. तर 13 आंदोलक गोळीबारात जखमी झाले होते. याशिवाय 180 आंदोलकांवर खटले दाखल करण्यात आले आहेत. या घटनेला सात वर्षे पूर्ण झाली आहेत. येत्या 9 तारखेला या घटनेतील मृतांना गोळीबाराच्या ठिकाणी मावळवासियांकडून श्रद्धांजली वाहण्यात येते. या गोळीबारातील तीन मृतांच्या वारसांना महापालिका सेवेत सामावून घेण्यात आले आहे. या धर्तीवर गोळीबारात जखमी झालेल्या 13 जणांनादेखील महापालिका सेवेत सामवून घेण्याची मागणी या शिष्टमंडळाने केली आहे.

याबाबत एकनाथराव टिळे म्हणाले की, 1972 सालापासून पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा केला जात आहे. याला आमचा आजही विरोध नाही. मात्र, आगामी 30 वर्षांचे नियोजन करताना नियोजित बंद पाईप योजनेमुळे मावळातील 70 ग्रामपंचायतींना पाण्याची समस्या जाणवणार आहे. पाण्याचे नियोजन करताना तत्कालीन जलसंधारण विभागाने मावळातील जनतेवर अन्याय केला आहे. महापालिकेबरोबरच मावळातील लोकसंख्या वाढत असताना पिंपरी-चिंचवडमध्ये दरडोई 160 लिटर पाणी तर मावळात दरडोई 40 लिटर पाण्याचे नियोजन आम्हाला मान्य नाही.

भारत ठाकूर यांनी धरणातील पाणीसाठ्याकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, पवना धरणात केवळ साडे आठ टीमएसी पाणीसाठा होत असताना, तत्कालीन जलसंधारण विभागाकडून 10.5 टीएमसी पाणी वाटपाचे नियोजन दिशाभुल करणारे आहे. त्यामुळे पाणी वाटपात मावळ तालुक्‍यावर अन्याय होत आहे. याशिवाय महापालिकेच्या बंद पाईप योजनेला आमचा कायम विरोध असणार आहे. त्यामुळे पवना नदीपात्रात गहुंजे येथे कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा बांधून रावेत व गहुंजे येथून पाणी उचलावे, अशा तोडग्याची चर्चा करण्यात आली आहे. या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन आयुक्त हर्डीकर यांनी दिल्याची माहिती ठाकूर यांनी यावेळी दिली.

सत्ताधारी भाजपच्या पोकळ वल्गना
पवनेच्या बंद पाईप योजनेला कायम विरोध असल्याचे वक्तव्य मावळचे भाजप आमदार बाळा भेगडे यांनी पवना धरणाच्या जलपूजनप्रसंगी केले आहे. एकीकडे जनतेचे प्रश्‍न सोडविण्याचे नाटक करायचे, तर दुसरीकडे भाजपनेच ही योजना मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले असताना त्याला विरोध करायचा. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांना जनतेच्या प्रश्‍नांचे काही देणे-घेणे नसल्याचे स्पष्ट झाले आहे.अशा प्रकारामुळे जनतेचा रोष वाढत आहे. पवना बंद जलवाहिनीचा प्रश्‍न मार्गी न लावल्यास जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.
– दत्ता साने, विरोधी पक्षनेते, पिंपरी-चिंचवड महापालिका


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)