– बारणेंच्या विजयाच्या घोषणेची औपचारिकता शिल्लक
पिंपरी – मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे श्रीरंग बारणे तब्बल 1 लाख 70 हजार मतांनी आघाडीवर आहेत. 10 लाख 46 हजार 643 मतांची मोजणी पुर्ण झाली असून अवघ्या तीन लाख मतांची मोजणी शिल्लक आहे. यामध्ये करिष्मा होण्याची आशा राष्ट्रवादी काँग्रेसला असली तरी बारणेंच्या विजयाची घोषणा होण्याची औपचारिकता शिल्लक असल्याचे प्रत्येक फेरीनिहाय दिसत आहे.
आत्तापर्यंतच्या मोजणीनुसार श्रीरंग बारणे यांना 5 लाख 54 हजार 259, पार्थ पवार यांना 3 लाख 83 हजार 967, वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील यांना 55 हजार 790 मते मिळाली आहेत. 11 हजार 918 मते नोटाला मिळाली आहेत.
टपाली मतदान वगळता पहिल्या फेरीपासून श्रीरंग बारणे आघाडीवर असल्याचे पहायला मिळत आहे. त्यांची लाखाची आघाडी मोडीत काढणे पार्थ पवार यांच्यासाठी आव्हान ठरत आहे. उर्वरीत फेऱ्यांमध्ये काय होणार याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राजाराम पाटील यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळत आहेत. तर नोटाला चौथ्या क्रमांकाची मते मिळत आहेत. 10 लाख 46 हजार 643 मतांची मोजणी पुर्ण झाली आहे. खासदार बारणे यांच्या घरासमोर विजयोत्सवाची सुरूवात झाली आहे.