मावळात युती-आघाडीचे ‘पॅचअप’ झाले तरी, संशयकल्लोळ कायम

पिंपरी – विधानसभेची गणिते फिसकटण्याच्या भीतीने भाजप आमदारांनी वरवर शिवसेना खासदारांशी जुळवून घेण्याची भूमिका घेतली. मनोमिलनाचे जाहीर शक्तीप्रदर्शन देखील करण्यात आले. दुसरीकडे उशिराने का होईना कॉंग्रेसला आघाडीचा धर्म आठवला. नेते “पॅचअप’चे दर्शन घडवत असले तरी दुसरीकडे कार्यकर्ते मात्र भलतीकडेच प्रचार करत असल्याचे चित्र पिंपरी-चिंचवडच्या राजकीय वर्तुळात आहे. सकाळी पक्षाच्या उमेदवाराचा, तर रात्री विरोधी उमेदवाराच्या भेटी-गाठींचा “छुपा अजेंडा’ राबविला जात आहे. त्यामुळे एकूणच संशयकल्लोळाचे वातावरण आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांचे प्रमुख उमेदवार अद्यापही “गॅस’वर आहेत.

सध्या लोकसभा निवडणुकीचे शहरात वातावरण जोरदार तापले आहे. शहरातील दोन मतदारसंघ “मावळ’ला, तर भोसरीचा एक मतदारसंघ शिरुर लोकसभेला जोडण्यात आलेला आहे. शहरात पूर्वी राष्ट्रवादीचे आता भाजपाचे वर्चस्व आहे. दोन्ही ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना अशा लढती होत असल्याने भाजपाला आणि कॉंग्रेसला आघाडी आणि युतीच्या उमेदवारांचे काम करावे लागत आहे. आघाडी आणि युतीमध्ये मनोमिलन झाले असले तरी ते वरवरचेच ठरल्याचे आता पुढे येवू लागले आहे. जात-पात, पै-पाहुणे आणि विधानसभेची गणिते यावरच उमेदवारांचा प्रचार समर्थक करत आहेत. आजचा प्रचार उद्यासाठी आपल्याला कसा फायदेशीर ठरेल, यावरच सर्वकाही खटाटोप सुरू झाले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शिवसेना-भाजपाचे काही नगरसेवक राष्ट्रवादीचा, तर कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे काही आजी-माजी नगरसेवक शिवसेनेच्या वळचणीला छुप्या पद्धतीने गेल्याने संशयाच्या वातवरणात भरच पडली आहे. त्यातच रविवारी (दि. 14) दिवसभर राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि भाजपाचे सहयोगी आमदार महेश लांडगे यांचा व शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे व कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांच्या गाठीभेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात विविध चर्चांना ऊत आला होता. सातत्याने सुरू असलेल्या घडामोडींमुळे कोण-कोणाचे काम करतो, याचा अंदाजच उमेदवारांना येत नसल्याने त्यांच्या अडचणीत वाढच झाल्याचे बोलले जात आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)