मावळात मोठ्या जल्लोषात गणरायाचे स्वागत

वडगाव मावळ -ढोल-ताशांचा दणदणाट व गणरायाचा जयजयकार करत अबाल वृद्धांचा सहभाग असलेल्या आनंदोत्सवाला मोठ्या भक्तीमय वातावरणात गुरुवारी सुरुवात झाली. लाडक्‍या गणरायाचे घरोघरी मोठ्या उत्साही वातावरणात आगमन झाले. गणपत्ती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात गुरुवारी घरोघरी तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी श्रीं’ची प्रतिष्ठापना करण्यात आली.

सार्वजनिक गणेश मंडळांसह मावळवासियांनी बाप्पांचे पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत केले. त्यामुळे आबालवृध्दांचा उत्साह द्विगुणीत झाला. पुढील दहा दिवस अवघा मावळ गणेशमय होणार आहे.बाप्पाच्या आगमनासाठी आवश्‍यक ती तयारी मावळवासियांनी बुधवारीच पूर्ण केली होती. सकाळपासूनच घरोघरी गणेशमूर्ती नेण्याची लगबग सुरु होती. सकाळपासूनच मावळातील कामशेत, तळेगाव, लोणावळा या मुख्य बाजारपेठा गणेशभक्तांच्या गर्दीने फुलल्या होत्या. गणेशमूर्ती विक्री करणाऱ्या स्टॉल्सवर मूर्ती खरेदीसाठी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. मोरया मोरया…मंगलमूर्ती मोरया’ च्या जयघोषामुळे अवघा मावळ दिवसभर मंगलमय झाला होता. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी डीजेला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात बाप्पांची मिरवणूक काढली, हे यंदाच्या गणेशोत्सवाचे वैशिष्ट्‌य ठरले.

गणेशभक्तांनी इंदोरी परिसरात जल्लोषात गणेशाचे स्वागत केले. सकाळपासूनच बाप्पांना घरी नेण्यासाठी मोठ्या व्यक्तींबरोबर लहान बालगोपालही आतुर झालेले दिसत होते. श्रींची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी घरोघरी तयारी झालेली होती. गजबजलेल्या बाजारपेठा, मिठाईच्या दुकानांमध्ये लागलेल्या रांगा, झांजा-ढोल यांच्या दुकानातील गर्दी हे चित्र दरवर्षीप्रमाणे यंदाही दिसत होते. पाटांवर दिमाखात विराजमान झालेल्या मुर्ती, कुठे तांडव करणारा बाप्पा, कुठे पुस्तक वाचणारा बाप्पा, सिंहासनावर विराजमान झालेले बाप्पा, गरुड मोर यांच्यावर आरूढ असलेला वरदविनायक जणू गणेशभक्तांच्या घरी जाण्याची वाट पाहत असल्याचे वाटत होते. डीजेवर बंदी असूनही त्याच जल्लोषात गणेश मंडळांनी पारंपारिक वाद्यांत गणेशाचे स्वागत केले. काही ठिकाणी काहीसे ढगाळ वातावरण दिसत होते. प्लास्टिक व थर्माकॉल बंदी असल्याने नागरिकांनी कागदी सजावटीच्या साहित्यांना पसंत केले.इंदोरी, जांबवडे, माळवाडी, वराळे, तळेगाव आदि परिसरत सर्वत्र वातावरण गणेशमय झाले होते.

कार्ल्यात गणराज्याचे जल्लोषात स्वागत
कार्ला- गणेशभक्त आपल्या लाडक्‍या गणरायाचे स्वागताची तयारी व प्रतिक्षा करत होते. आज तो दिवस आला व गणरायाचे आगमन झाले व गणराज्याचे स्वागत कार्ल्यात ढोलताशांच्या गजरात जल्लोषात करण्यात आले.
कार्ला परिसरातील ‘वेहरगाव,दहिवली,शिलाटणा,मळवली,भाजे,पाटण,देवले,वाकसई,बोरज,टाकवे या ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.
.सकाळी घरातील सर्व सदस्य एकत्र येऊन गणेशाचे स्वागत करत होते घरातील छोटी मंडळीने ढोल ताशांच्या गजरात ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ जयजयकार करत गणपती चे स्वागत करत होते.
घरातील गणपतीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर कार्ला गावातील मारुती मंदिरात सकाळी साडे अकरा वाजता “गणपती बप्पा मोरया’ जयघोष करत ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. त्याचबरोबर रोहिदास तरुण मंडळाने देखील दिड दिवसाचा पाहुणा असलेल्या गणपतीचे स्वागत करीत समाज मंदिरात प्लास्टिकच्या बाटल्यांपासून तयार केलेल्या मंदिरात गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली. यंदाच्या गणेशोत्सवाचे ते आकर्षण ठरले. यावेळी गावातील गणेशभक्त या कार्यक्रमाला उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)