मावळात अवैध धंद्यावर धाडसत्र

  • दारू साठा जप्त : तळेगावात पोलीस महानिरीक्षकांच्या विशेष पथकाची धडक मोहीम

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या पथकाने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन अवैध धंद्यांवर शनिवारी (दि. 12) धडक कारवाई केली. या कारवाईमध्ये दारू साठ्यासह आरोपींना अटक केली. या पथकाचा धसका घेवून मावळ तालुक्‍यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिसांनीच पुढाकार घेतला आहे.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील यांच्या आदेशानुसार पुणे ग्रामीण हद्दीतील मावळ तालुक्‍यातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैधरीत्या सुरू असलेल्या दारू विक्री, मटका, जुगार, गांजा, काळे ऑईल भेसळ, भंगार चोरी, वेश्‍याव्यवसाय, लॉजिंग आदींवर कारवाई करण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्र पोलीस उपअधीक्षक सई भोरे पाटील, पोलीस हवालदार अनिल पास्ते, मोहन पाटील, वैशाली पिसे आदींचे पथक नियुक्त करण्यात आले.

या पथकाने पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैधरीत्या सुरू असलेल्या धंद्यांवर बेधडक धाड टाकण्याचे सत्र सुरू केले. तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोमाटणे फाटा येथे शिवशक्ती चायनीजच्या आडोशाला देशी व विदेशी एकूण 4,136 रुपयांचा साठा जप्त करून आरोपी अशोक विठ्ठल मरकले (वय 40, रा. संभाजीनगर तळेगाव दाभाडे, ता. मावळ) याला मुद्देमालासह अटक केली.

तळेगाव दाभाडे खिंड येथे गावठी हातभट्टी दारू एकूण 110 रुपयांचा साठा जप्त करून आरोपी गणेश मधुकर शेडे (वय 33, रा. तळेगाव दाभाडे खिंड ता. मावळ) याला अटक केली. या दोघांवर तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

कोल्हापूर परिक्षेत्राच्या विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाच्या पथकाच्या कारवाईची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने मावळातील पोलीस ठाण्याच्या हद्दीत छुपे पद्धतीने सुरू असलेले धंदे त्वरित बंद झाले. तर काही पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांची त्वरित बैठक घेवून अवैध धंदे करणाऱ्यांना कडक ताकीद दिली. महिला व नागरिकांनी या पथकाचे स्वागत केले. अशा पद्धतीच्या पथकाची कारवाई सुरु असल्यास गुन्हेगारीला जरब बसेल, असा विश्‍वास व्यक्‍त केला.

स्वातंत्र्यदिन, दहीहंडी उत्सवाच्या धर्तीवर
पोलिसांनी सतर्क राहण्याचे आदेश
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे पाटील दै. प्रभातशी बोलताना म्हणाले, कोल्हापूर परिक्षेत्राच्या पुणे ग्रामीण, कोल्हापूर सांगली, सातारा, सोलापूर आदी जिल्ह्यातील हद्दीत अवैधरीत्या धंदे सुरू असलेल्या पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. दारूमुळेच किरकोळ भांडणातून गंभीर गुन्हे घडतात. अवैधरीत्या धंद्यांना अभय देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणार आहे. येणाऱ्या स्वातंत्रदिन, दहीहंडी उत्सवाच्या धर्तीवर पोलिसांनी सतर्कत राहण्याचा आदेश दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)