मावळातील गृहप्रकल्पांना कृषीपंपाद्वारे पाणी!

वराळे (ता. मावळ) : इंद्रायणी नदीपात्रात कृषी विद्युत पंपातून बांधकाम व्यावसायिक खुलेआम अनधिकृतपणे पाणीपुरवठा करीत आहेत.
  • महावितरणचे दुर्लक्ष : बांधकाम व्यवसायिकांची सखोल चौकशीची मागणी
  • सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांच्याकडून “पोलखोल’

तळेगाव दाभाडे, (वार्ताहर) – वराळे (ता. मावळ) हद्दीतील अनेक बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्या मोठमोठ्या गृहप्रकल्पाच्या बांधकामासाठी शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवून शेतकऱ्यांच्या कृषिपंपातून अनधिकृतपणे पाणी वापरले जात असून, शासनाची फसवणूक होत आहे. या बांधकाम व्यावसायिकांची सखोल चौकशी करून तसेच समिती नियुक्‍त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी जागतिक मानव अधिकार संघटना पुणे जिल्हा सरचिटणीस व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली.

मावळ तालुक्‍याला वरदान ठरलेल्या इंद्रायणी नदीतून शेतकऱ्यांच्या नावावर असलेल्या कृषिपंपातून गेल्या दीड-दोन वर्षांपासून वराळे परिसरातील होऊ घातलेल्या मोठमोठ्या गृहप्रकल्पाच्या बांधकामासाठी शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडवून अनधिकृतपणे कृषिपंपातून कोट्यावधी रुपयांचे पाणी वापरले जात आहे.

एकीकडे शेतकऱ्यांना कृषिपंप जोडणी न देता त्यांना लाखोंचे बिल देण्याचे काम महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी करत आहे. तर वराळे हद्दीत स्थानिक शेतकऱ्याच्या नावावर बांधकाम व्यावसायिक पुढाकार घेवून कृषी विद्युत पंप जोडणी घेतात. रातोरात “जेसीबी’च्या सहाय्याने इंद्रायणी नदी ते गृहप्रकल्पाच्या बांधकामापर्यंत जलवाहिनी टाकून 24 तास इंद्रायणी नदीतून बेसुमार पाणी उपसा केला जात आहे. काही गृहप्रकल्पात 250 ते 500 सदनिका असून, त्यांना अनधिकृतपणे पाणीपुरवठा केला जातो. किती पाणी किती वापरले यांचे मोजदाद नाही. यांच्या जलवाहिन्यांना जागोजागी गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया असून, अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना हाताशी धरून बांधकाम व्यावसायिकांनी दिवसाढवळ्या पाणी चोरी करत आहेत. पाण्यापासून शासनाला मिळणारा कोट्यावधी रुपयांचा महसूल गेल्या दीड-दोन वर्षांपासून बुडत आहे.

काही बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्या मोठमोठ्या गृहप्रकल्पाचे दूषित सांडपाणी इंद्रायणी नदीत सोडून नदी प्रदूषित करत आहेत. ज्यांचे जुने कृषि विद्युत पंप आहेत, त्यांना रिडिंगची मर्यादा नसल्याने बेसुमार 24 तास पाणी उपसा केला जात आहे. या पाणी चोरीकडे पाटबंधारे विभाग व विद्युत वितरण कंपनी दुर्लक्ष करत आहे. तरी इंद्रायणी नदीपात्रातून शेतकऱ्यांच्या कृषी विद्युत पंपातून गृहप्रकल्पाच्या बांधकामासाठी अनधिकृतपणे पाणी वापरणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांची सखोल चौकशी करून तसेच समिती नियुक्‍त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा जागतिक मानव अधिकार संघटना पुणे जिल्हा सरचिटणीस व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी दिला आहे.

वडगाव पाटबंधारे विभाग शाखा अभियंता अनंता हांडे म्हणाले की, वराळे हद्दीत सुमारे 140 कृषी विद्युत पंप असून, त्यात नाममात्र 3 वाणिज्यिक विद्युत पंप आहे. पाणी चोरी करणाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल.
विद्युत वितरण कंपनी तळेगाव दाभाडे उपकार्यकारी अभियंता मुकुंद तेलके म्हणाले की, पाटबंधारे विभागाने कृषी विद्युत पंपाला परवानगी दिली असून कृषी विद्युत पंपातून बांधकाम व्यावसायिकांना अनधिकृतपणे पाणी देणाऱ्यांवर कारवाई करणार आहे. कृषी विद्युत पंपांचा गैरवापर खपवून घेतला जाणार नाही.

इंद्रायणी नदीपात्रातून शेतकऱ्यांच्या कृषी विद्युत पंपातून वराळे हद्दीतील बांधकाम व्यावसायिकांनी बेसुमार अनधिकृत पाणी उपसा करून पाणी चोरी करत आहे. याविषयी शासकीय स्तरावर माहिती मागविली असता कोणाकडे काहीच नोंद नाही. इथे कुंपणच शेत खाते तिथे सर्वसामान्यांचे काय ? प्रत्यक्ष पाहणी करताना शेतकरी व बांधकाम व्यावसायिक कृषी विद्युत पंपाची जलवाहिनी असताना ती जलवाहिनी विहिरीची व बोअर वेलची असल्याची सांगून दिशाभूल करतात. अनेक ठिकाणी जलवाहिन्या जोडण्यात आल्या आहेत.
– प्रदीप नाईक,
माहिती अधिकार कार्यकर्ते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)