पिंपरी – मावळ लोकसभा मतदार संघातील मतमोजणीला बालेवाडी क्रीडा संकुल येथे सकाळी आठ वाजता सुरूवात झाली.
मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे पार्थ पवार यांच्यासह 21 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे.
गेल्या दोन लोकसभा निवडणुकीतील मावळ मतदारसंघांचा इतिहास पाहिला तर केंद्र आणि राज्यातील सत्तेविरोधात मतदारांनी कौल दिला आहे. २००९ मध्ये देशात आणि राज्यात काँग्रेस आघाडीचे सरकार निवडून आले. पण मावळ मतदारसंघातील मतदारांनी शिवसेनेचे गजानन बाबर यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली होती. त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत देशभरात मोदी लाटेसोबतच सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात नाराजी होती. त्याचा फायदा त्यावेळचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांना झाला. त्यामुळे सलग दोनदा शिवसेनेचा भगवा मावळवर फडकला. आता श्रीरंग बारणे सलग दुसऱ्यांदा आपले नशिब आजमावत आहेत. तर बारणे यांच्या विजयामुळे शिवसेनेला मावळात विजयी हॅटट्रीक साधता येणार आहे. पार्थ पवार यांच्यामुळे पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सध्या टपाली मतमोजणी सुरू असून काही वेळातच मतदान यंत्राद्वारे प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होईल.
लोकसभा निवडणुकीच्या ताज्या अपडेटसाठी फक्त क्लिक करा www.dainikprabhat.com. दैनिक प्रभातचे App डाऊनलोड करा आणि झटपट अपडेट मिळवा.