मावळच्या खोऱ्यातील तासुबाई

निसर्गाच भरभरून दान असलेल्या मावळ तालुक्‍यात पर्यटनासाठी बरीच ठिकाणे उभी आहेत. लोहगड-विसापूर-तुंग- तिकोना-मोरगिरी-कार्ला-भाजे अशी नावाची भलीमोठी जंत्रीच समोर येते. गड-किल्ले-लेण्या-मंदिरे आदींबाबत मावळ भाग अगदी समृद्ध आहे. शिवाय येथील भूमीही इतिहासात तावून-सुखावून गेली आहे. येथल्या डोंगररांगावरून कोसळणारे धबधबे तर पुण्या-मुंबईच्या शहरी पर्यटकांना कायमच आकर्षित करीत असतात. पण याच तालुक्‍यातील काही अनवट व अप्रकाशित ठिकाणे बऱ्याच जणांना माहित देखील नाही. तासुबाई देवीच मंदिरही याच जातकुळीतील. डोंगराच्या कुशीत वसलेलं हे मंदिर भक्ती आणि पर्यटनाच एक सुंदर ठिकाण बनलय यात काही शंका नाही. त्यामुळे निसर्गाची आवड असणाऱ्यांनी एकदा तरी तासुबाईच्या राउळात माथा टेकवलाच पाहिजे.

तर या तासुबाई मंदिराला भेट देण्यासाठी सर्वप्रथम मावळ तालुक्‍यातील तळेगाव एमआयडीसी वरून आंबळे व नंतर कल्हाट नावाचे गाव गाठायचे. कल्हाटला येण्यासाठी जुन्या मुंबई-पुणे रस्ते महामार्गावरून कान्हे भोयरेवरून येता येते. एकदा का महामार्गावरून आपण आत शिरलो की, अस्सल मावळी सौंदर्याचा सारीपाट आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. जसजसं आपण आतमध्ये शिरत जातो, तसतसं डोंगररांगाचे विळखे आपल्याभोवती घट्ट होत जातात. मावळी ग्रामजीवन डोळ्यांना सुखावू लागते. इंद्रायणी नदी वाट आडवी करून वाहत असते. या साऱ्या लयबद्ध खेळात जेव्हा आपण कल्हाटपाशी येवून पोहचतो, तेव्हा निसर्गाच्या शब्दशः कुशीत बसलेल्या या गावाचा आपल्याला हेवाच वाटून जातो. गावही टुमदार आणि ऐसपैस. सह्याद्री सारखा पाठीराखा असेल तर गावही ऐटीतच असतं म्हणा. या कल्हाट गावाला बहुधा प्राचीन इतिहास असावा असे वाटते. कारण उजव्या बाजूच्या डोंगरात एक लेणी कोरलेली अस्पष्टपणे दिसते. या लेणीला कल्हाटची लेणी असे म्हणतात. ही लेणी देखील दुर्लक्षितच. अस्सल भटकेच तिथे जाऊ शकतात एवढी तिची वाट बिकट आहे. त्यामुळे गावच कुतूहल आपल्या मनात आणखीच वाढत जाते. अशा या गावात तासुबाईच मंदिर कुठे आहे अस विचारलं तर अगदी लहान मुल सुद्धा वाट दाखवतील.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गावातच आपल्या गाड्या लावायच्या. अन मंदिराकडे निघायचे. दोन डोंगराच्या घळीतून वर जाणारी पायवाट अगदी ठसठशीत आहे. जागोजागी खुणाही केलेल्या दिसतात. त्यामुळे चुकण्याची शक्‍यता कमीच. पावसाळ्यात तर ही वाट अधिकच बहरते. साधारण तासाभराच्या चालीनंतर उजव्या बाजूला वळलो की, आपण एका पठारावर येतो. या पठारावर छोटीशी वस्तीदेखील आहे. या पठारावर उभ राहुन मावळच निसर्गसौंदर्य पाहण्यासारखा दुसरा आनंद नाही. छोटी-छोटी कौलारु घर, भातखाचरे, वळणावळणाचे रस्ते, डोंगररांगा हे सार काही निसर्गाच्या कॅनव्हासवर उमटलेल दिसत. कितीही वेळ पाहिलं तरी मात्र आपल मन काही भरत नाही हे नक्की. मग आपोआपच कॅमेऱ्याकडे हात न गेला तरच नवल! असो. पठारावरून पुढची वाट मात्र सपाट चालीची असून वीस मिनिटांतच आपण मंदिरापुढे हजर होतो. दोन डोंगराच्या बेचक्‍यातल हे मंदीर पाहून आपण अक्षरशः हर्षोल्हीत होतो. मंदिराच्याच मागे तासुबाई नावाचाच डोंगराचा उंच सुळका भव्यतेची जाणीव करून देतो. तसेच मंदिरासमोर असलेली दरी पाहून छातीही दडपून जाते. मंदिराच्या भौगोलिक विविधतेचे हे सारे खेळ पाहून झाले की, मग मंदिराच्या आवारातून शिरायचे. पूर्वाभिमूख असलेल हे मंदिर गाभारा व सभामंडप पत्रा व खाली फरशी यांचा मिळून बनला आहे. गाभारा मात्र दगडांचा आहे. गाभाऱ्यातील देवीचा तांदळा हा स्वयंभू असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात. तसेच ही देवी मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करते असे देखील गावकरी सांगतात. अतिशय प्रसन्न वातावरणात आपणही माथा टेकवून मोकळे व्हायचे. मंदिराचा जिर्णोद्धार गावकऱ्यांनी नुकताच केलेला दिसतो. तसेच मंदिराभोवती पडलेले वीरगळीचे दगड, पाहता मंदिर बरेच जुने असल्याचे जाणवते. पंचक्रोशीतल्या नागरिकांचा मंदिरात मोठा राबता असून नवरात्रात महिलाही मोठ्या प्रमाणात येथे दर्शनासाठी येत असतात. पंचक्रोशीतले अत्यंत जागरूक श्रद्धास्थान म्हणूनही हे ठिकाण ओळखले जाते.

असो मंदिर पाहून आपल्या मनात वेगळेच समाधान उमटते. खरतरं आठवड्याभराच्या ताणतणावातून एक दिवस जरी आपण या ठिकाणी आलो की, मनाला एक वेगळीच उर्जा मिळून जाईल. भक्त म्हणून किंवा निसर्गाचा रसिक म्हणून येथे या. हि वाट मात्र निराश करणार नाही एवढं मात्र नक्की!

– ओंकार वर्तले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)