माळीवाडा बसस्थानक समस्यांचे आगर

नगर – राज्यातील नगर-पुणे पहिली बससेवा सुरू झालेले, राज्यासाठी मध्यवर्ती असलेले मिनीमंत्रालयासमोरील माळीवाडा बसस्थानकाची आज दुरवस्था झाली आहे. दुर्गंधी, घाणीचे साम्राज्य, विविध ठिकाणी पाझर होऊन पाण्याची गळती, बांधकाम कॉलमला तडे, पाण्याची सुविधा नाही अशी अवस्था या बसस्थानकाची झाली आहे. स्थापना 1958 साली झाली असून, या बसस्थानकाची त्वरित दुरुस्ती अथवा नव्याने बांधकाम न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. परिवहन महामंडळाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने कर्मचारी व नागरिक त्रस्त झाले आहे. प्रवासी या दयनीय अवस्थेमुळे बाहेर राहणेच पसंत करीत आहेत. माळीवाडा बसस्थानक अद्ययावत होणार की नाही? असा प्रश्‍न प्रवाशांना पडला आहे.

या बसस्थानकाचा राज्यात नावलौकिक होता. परंतु, आज या बसस्थानकाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. या बसस्थानकातून बसच्या ये-जा करणाऱ्या 727 फेऱ्या होतात. इतर विभागातून सोलापूर, नांदेड, उस्मानाबाद, नंदूरबार, येणाऱ्या-जाणाऱ्या 243 बसगाड्या आहेत. त्यामुळे अनेक विभागांतून येणाऱ्या नागरिकांना या ऐतिहासिक शहरात माळीवाडा बसस्थानकात प्रवेश करताच अतिशय वाईट अनुभव येतो. येथील आवारात आसपासचे व्यावसायिक, स्थानिक कॅन्टीनवाले सर्व कचरा, दूषित अन्न या आवारात टाकत असून, यामुळे मोठ्या प्रमाणावर डासांची उत्पत्ती होऊन नागरिकांना अनेक आजारांना बळी पडावे लागते. रात्री-अपरात्री मद्यपींचा या ठिकाणी बिसलरी बाटलीत दारू पिण्याचा सपाटाच चालू असतो. पथारीवाले, टपरीचालक यामुळे वाहतूक कोंडी या ठिकाणी नित्याचीच बाब ठरली आहे. रात्रीच्या वेळी अनेक अवैध धंदे या परिसरात राजरोस सुरू असतात. बसस्थानकाच्या छतास अनेक ठिकाणी पाझर येऊन गळती होत असते. यामुळे पावसाळ्यात नागरिकांच्या अंगावर पाणी पडत आहे. बसस्थानकात बाहेरगावावरून येणाऱ्या चालक-वाहकांसाठी बसण्याची, राहण्याची सोय नाही. हे बसस्थानक पूर्णपणे जीर्ण झाले आहे. एसटी बसचे कार्यालय, कंट्रोल रूम याची दुरवस्था झालेली आहे. कॉलम, बिमला तडे जाण्यास सुरुवात झालेली आहे. ठिकठिकाणी कचरा पडून अस्वच्छता निर्माण झाली आहे. या ठिकाणचे रंगकाम कधी झाले होते का हे सांगणे कठीण आहे. अशा एक नाही तर अनेक समस्या या आगारात आहेत. लवकरात लवकर हे बसस्थानक नव्याने बांधले गेले नाही तर भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची भीती निर्माण झाली आहे.

प्रवाशांसाठी कोणतीही सुविधा नाही. शौचालयाचा सर्व भाग दुर्गंधीयुक्‍त झाला आहे. ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. बसस्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. बस कधीही वेळेवर सोडण्यात येत नाही. एक ते दीड महिन्यांपासून साफसफाई झाली नाही. नागरिकांसाठी पाण्याची टाकी बांधलेली आहे, पण या ठिकाणी कधी पाणी असते तर कधी पाणी नसते. जरी असले तरी ड्रेनेजचे पाणी या ठिकाणी येते. सर्वत्र कचरा आणि घाण पसरली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. परिवहन मंडळाने या बसस्थानकाच्या ठिकाणी सुधारणा करून नागरिकांना स्वच्छ पाण्याची सुविधा निर्माण करावी.
– मनेष श्रीखंडे नागरिक

शौचालयाची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. बाहेरगावावरून येणाऱ्या नागरिकांकडून शौचालयासाठी 8 रुपये घेतले जातात. त्यामुळे नागरिकांची येथे आर्थिक लूट केली जाते. शौचालयाच्या परिसरात सर्वत्र दारुच्या रिकाम्या बाटल्यांचा खच असतो. या ठिकाणी कर्मचारी, अधिकाऱ्यांना पाण्याची सोय नाही तर नागरिकांना कधी होणार? नेमून दिलेले झाडूवालेही कधी येत नाहीत. परिवहन मंडळाने या बसस्थानकात नागरिकांसाठी सर्व सुविधा निर्माण करून नागरिकांची आर्थिक लूट होणार नाही यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.
रमेश काळे
नागरिक

बसस्थानकाचे नव्याने पुनर्वसन
आगार व्यवस्थापनाने नवीन बांधकाम, रंगरंगोटी व्हावी यासाठी अनेकवेळा पत्रव्यवहारही केला आहे. त्यासंदर्भात डिव्हिजन ऑफिसचे अधिकारी या ठिकाणी येऊन पाहणीही करून गेले. याबाबत डिव्हिजन ऑफिसवरूनही काही निर्णय झालेला नाही. परंतु, लवकरच नागरिकांसाठी आधुनिक सुविधा, बसस्थानकाचे नव्याने पुनर्वसन करण्यात येईल, अशी माहिती माळीवाडा बसस्थानकप्रमुख शिवाजी कांबळे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)