मार्श-हॅन्ड्‌सकोम्बने हिरावला भारताचा विजय

तिसरा कसोटी क्रिकेट सामना : पाचव्या विकेटसाठी झुंजार अखंडित भागीदारी
रांची, दि. 20 – फिरकी गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर 152 धावांनी पिछाडीवर असलेल्या दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची 4 बाद 63 अशी अवस्था झाली होती. पराभवाचे सावट गडद झाले होते. दुसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावातील घसरगुंडी इतक्‍यात विसरण्यासारखी नव्हती. अशा वेळी शॉन मार्श आणि पीटर हॅन्ड्‌सकोम्ब या जोडीने तब्बल 62.1 षटके झुंज देत भारतीय गोलंदाजांना रोखून धरताना ऑस्ट्रेलियन संघाला पराभवाच्या छायेतून बाहेर काढले. या जोडीने केलेली 124 धावांची भागीदारी ऑस्ट्रेलियन संघाला जीवनदान देणारी ठरली. अखेर 100व्या षटकानंतर भारतीय कर्णधार विराट कोहलीने सामना अनिर्णित अवस्थेत संपविण्याचे आवाहन केले. ऑस्ट्रेलियाने ते तत्काळ स्वीकारले आणि अत्यंत रोमांचकारी अवस्थेत पोहोचलेला तिसऱ्या कसोटी सामना अखेर अनिर्णित राहिला.
भारतीय खेळपट्ट्यांवर अत्यंत महत्त्वाची ठरणारी नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी स्वीकारल्यावर ऑस्ट्रेलियाने स्टीव्हन स्मिथ आणि ग्लेन मॅक्‍सवेल यांच्या शतकांच्या जोरावर पहिल्या डावात दुसऱ्या दिवशी 451 धावांची मजल मारली. त्यानंतर चेतेश्‍वर पुजारा आणि वृद्धिमान साहा यांच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर भारतीय संघाने दुसरा डाव 9 बाद 603 धावांवर घोषित करताना 152 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. काल चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या डावात 2 बाद 23 अशी अवस्था करताना भारताने सनसनाटी विजयासाठी तयारी केली होती. मात्र शॉन मार्श आणि पीटर हॅन्ड्‌सकोम्ब यांच्या भागीदारीमुळे आज पाचव्या दिवसअखेर 6 बाद 204 धावा करताना ऑस्ट्रेलियाने हा सामना अनिर्णित राखण्यात यश मिळविले. द्विशतकी खेळी करणाऱ्या चेतेश्‍वर पुजाराला सामन्याचा मानकरी हा पुरस्कार देण्यात आला.
पुणे येथे झालेला पहिला कसोटी सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर भारताने बंगळुरू येथे झालेला दुसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. आता तिसरा कसोटी सामना अनिर्णित राहिल्यामुळे येत्या 25 मार्च रोजी धरमशाला येथे सुरू होत असलेल्या अखेरच्या चौथ्या कसोटी सामन्याला अतोनात महत्त्व प्राप्त झाले आहे.
पहिल्या सत्रावर भारताचे वर्चस्व
काल चौथ्या दिवसअखेरच्या 2 बाद 23 धावांवरून पराभवाच्या दडपणाखाली पुढे खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन संघासाठी आजचे पहिले सत्र म्हणजे कठोर परीक्षाच होती. युवा सलामीवीर मॅट रेनशॉ आणि कर्णधार स्टीव्हन स्मिथ यांनी जवळजवळ 21 षटके झुंज देताना ऑस्ट्रेलियन संघाच्या आशा पल्लवित केल्या. परंतु उपाहारापूर्वीच्या दोन षटकांमध्ये हे दोघेही लागोपाठ बाद झाल्यामुळेऑस्ट्रेलियन संघाला जबरदस्त हादरे बसले. रेनशॉ आणि स्मिथ यांनी तिसऱ्या विकेटसाठी 21.2 षटकांत 36 धावांची भर घातली. ईशांतने रेनशॉला एका अप्रतिम इनकटरवर पायचित केले. तर पुढच्याच षटकात जडेजाने स्मिथचा त्रिफळा उडविला. या वेळी लेगस्टंपबाहेर टप्पा पडलेला चेंडू पॅडने तटविण्याचा स्मिथचा प्रयत्न सपशेल फसला आणि वळलेल्या चेंडूने पॅड-बॅटमधून वाट काढत यष्टींचा वेध घेतला. रेनशॉनने 84 चेंडूंत 1 चौकारासह 15 धावा केल्या. तर स्मिथने 68 चेंडूंत 2 चौकारांसह 21 धावांची खेळी केली. उपाहारासाठी खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 4 बाद 83 धावा केल्या होत्या या वेळी शॉन मार्श नाबाद 15 धावांवर खेळत होता, तर पीटर हॅन्ड्‌सकोम्ब नाबाद 4 धावांवर त्याला साथ देत होता. ऑस्ट्रेलियन संघ अद्यापही 69 धावांनी पिछाडीवर होता आणि त्यांचे केवळ सहा फलंदाज बाकी होते. पहिल्या सत्रातील 28.4 षटकांत ऑस्ट्रेलियाने 60 धावांची कमाई केली होती. एका बाजूने वेगवान मारा आणि दुसऱ्या बाजूने फिरकी असे भारताचे डावपेच पहिल्या सत्रात तरी यशस्वी ठरल्याचे दिसत होते.
मार्श-हॅन्ड्‌सकोम्बचा प्रखर प्रतिकार
उपाहार ते चहापान या दुसऱ्या सत्रातच सामना विजयापर्यंत नेण्याचा भारताचा प्रयत्न सपशेल फसला, तो शॉन मार्श आणि पीटर हॅन्ड्‌सकोम्ब या जोडीच्या प्रखर प्रतिकारामुळेच. दुसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांनी तब्बल 33 षटके टाकली, परंतु त्यांना एकही बळी घेता आला नाही. मार्श-हॅन्ड्‌सकोम्ब जोडीने अत्यंत संयमी फलंदाजीचे दर्शन घडविताना या सत्रात 66 धावांची भर घालून भारताचे सर्व प्रयत्न असफल ठरविले. चहापानाला खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात 4 बाद 149 धावांची मजल मारली होती. यावेळी शॉन मार्श नाबाद 38 धावांवर, तर पीटर हॅन्ड्‌सकोम्ब नाबाद 44 धावांवर खेळत होते. या जोडीने तोपर्यंत पाचव्या विकेटसाठी 86 धावांची अखंडित भागीदारी करताना भारताला विजयापासून रोखले होते. या जोडीने आपली अर्धशतकी भागीदारी 156 चेंडूंत पूर्ण केली. तसेच ऑस्ट्रेलियाच्या धावांचे शतक 44 व्या षटकात फलकावर लावले. दुसऱ्या हप्त्यासाठी गोलंदाजीला आलेल्या जडेजाने खेळपट्टीवरील “रफ पॅच’मधून चेंडू वळविताना अफलातून मारा केला. त्याने सलग चार निर्धाव षटकेही टाकली. परंतु विकेट घेण्यात मात्र कोणत्याही भारतीय गोलंदाजाला यश मिळाले नाही. दरम्यान बळी घेण्यासाठी आतुर झालेल्या भारतीय संघाने एक रीव्ह्यू वाया दवडला. दरम्यान हॅन्ड्‌सकोम्बचा झेल शॉर्टलेगवरील करुण नायरने जवळजवळ टिपलाच होता. परंतु तो थोडक्‍यात बचावला.
अखेरच्या सत्रात कडवी झुंज
शॉन मार्श आणि पीटर हॅन्ड्‌सकोम्ब या जोडीने चहापानानंतरही आपली झुंज कायम राखली. अखेर जडेजाने तिसऱ्या हप्त्यात मार्शला बाद करून ही जोडी फोडली. मार्शने तब्बल 197 चेंडूंचा सामना करताना 7 चौकारांसह 53 धावांची झुंजार खेळी केली. तसेच त्याने हॅन्ड्‌सकोम्बच्या साथीत पाचव्या विकेटसाठी 373 चेंडूंत 124 धावांची भागीदारी करताना ऑस्ट्रेलियाला संकटातून बाहेर काढले. मार्शनंतर तीनच षटकांनी पहिल्या डावातील शतकवीर ग्लेन मॅक्‍सवेलला परतवून अश्‍विनने ऑस्ट्रेलियाला सहावा धक्‍का दिला. मात्र या कामगिरीसाठी भारताला खूपच उशीर झाला होता. हॅन्ड्‌सकोम्बने मॅथ्यू वेडच्या साथीत दिवसअखेर सातव्या विकेटसाठी अखंडित भागीदारी करताना ऑस्ट्रेलियाचा पराभव टाळला. हॅन्ड्‌सकोम्बने ऐतिहासिक कामगिरी बजावताना तब्बल 200 चेंडूंचा सामना करीत 7 चौकारांसह नाबाद 72 धावांची संस्मरणीय खेळी केली. भारताकडून रवींद्र जडेजाने 54 धावांत 4 बळी घेताना विजयासाठी निकराचे प्रयत्न केले. परंतु त्याला अश्‍विनची अपेक्षित साथ लाभली नाही. किंबहुना अश्‍विनचे अपयश हेच भारताला विजय मिळविण्यात आलेल्या अपयशाचे महत्त्वाचे कारण ठरले.

धावफलक-
ऑस्ट्रेलिया- पहिला डाव- मॅट रेनशॉ झेल कोहली गो. यादव 44, डेव्हिड वॉर्नर झे. व गो. जडेजा 19, स्टीव्हन स्मिथ नाबाद 178, शॉन मार्श झे. पुजारा गो. अश्‍विन 2, पीटर हॅन्ड्‌सकोम्ब पायचित गो. उमेश यादव 19, ग्लेन मॅक्‍सवेल झे. साहा गो. जडेजा 104, मॅथ्यू वेड झे. साहा गो. जडेजा 37, पॅट कमिन्स त्रि. गो. जडेजा 0, स्टीफन ओकीफ झे. विजय गो. उमेश यादव 25, नॅथन लियॉन झे. नायर गो. जडेजा 1, जोश हॅझेलवूड धावबाद 0, अवांतर 22, एकूण 137.3 षटकांत सर्वबाद 451.
बाद क्रम- 1-50, 2-80, 3-89, 4-140, 5-331, 6-395, 7-395, 8-446, 9-449.
गोलंदाजी- ईशांत शर्मा 20-2-70-0, उमेश यादव 31-3-106-3, अश्‍विन 34-2-114-1, जडेजा 49.3-8-124-5, विजय 3-0-17-0.
भारत- पहिला डाव – लोकेश राहुल झे. वेड गो. कमिन्स 67, मुरली विजय यष्टिचित वेड गो. ओकीफ 82, चेतेश्‍वर पुजारा झे. मॅक्‍सवेल गो. लियॉन 202, विराट कोहली झे. स्मिथ गो. कमिन्स 6, अजिंक्‍य रहाणे झे. वेड गो. कमिन्स 14, करुण नायर त्रि. गो. हॅझेलवूड 23, अश्‍विन झे. वेड गो. कमिन्स 3, वृद्धिमान साहा झे. मॅक्‍सवेल गो. ओकीफ 117, रवींद्र जडेजा नाबाद 54, उमेश यादव झे. वॉर्नर गो. ओकीफ 16, ईशांत शर्मा नाबाद 0, अवांतर 19, एकूण 210 षटकांत 9 बाद 603 घोषित.
बाद क्रम – 1-91, 2-193, 3-225, 4-276, 5-320, 6-328, 7-527, 8-541, 9-595.
गोलंदाजी- कमिन्स 39-10-106-4, हॅझेलवूड 44-10-103-1, ओकीफ 77-17-199-3, लियॉन 46-2-163-1.
ऑस्ट्रेलिया- दुसरा डाव- डेव्हिड वॉर्नर त्रि. गो. जडेजा 14, मॅट रेनशॉ पायचित गो. ईशांत शर्मा 15, नॅथन लियॉन त्रि. गो. जडेजा 2, स्टीव्हन स्मिथ त्रि. गो. जडेजा 21, शॉन मार्श झे. विजय गो. जडेजा 53, पीटर हॅन्ड्‌सकोम्ब नाबाद 72, ग्लेन मॅक्‍सवेल झे. विजय गो. अश्‍विन 2, मॅथ्यू वेड नाबाद 9, अवांतर 16, एकूण 100 षटकांत 6 बाद 204.
बाद क्रम- 1-17, 2-23, 3-59, 4-63, 5-187, 6-190.
गोलंदाजी- अश्‍विन 30-10-71-1, जडेजा 44-18-54-4, उमेश यादव 15-2-36-0, ईशांत शर्मा 11-0-30-1.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)