मार्गदर्शक : सुरक्षित रस्ते वाहतूक   

दत्तात्रय आंबुलकर 

वाढते महामार्ग, वाहनांची संख्या व वाढता वेग या साऱ्या बाबी लक्षात घेता भारत आणि भारतीयांनी रस्ते, वाहन आणि वाहनचालकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणे अपरिहार्य ठरते. गेल्या काही वर्षात वाहन अपघात, त्यात अंतर्भाव असणारे वाहक-नागरिक आणि या अपघातापोटी त्यांना होणारे अपघात आणि नुकसान व या साऱ्यांचा संबंधित व्यक्ती, त्यांचे कुटुंबीय आणि समाजावर होणारे परिणाम पाहता रस्ते वाहतूक आणि वाहन सुरक्षा याचे महत्त्व तर अनेकपटींनी वाढते. 

वाहन, वाहक आणि वाहतूक या मध्यवर्ती मुद्यांमध्ये शासन-प्रशासन, समाज-वाहनचालक व नागरिक हे महत्त्वपूर्ण असे अपरिहार्य घटक ठरतात या साऱ्यांची एक महत्त्वाची भूमिका असते .

शासन – स्थानिक व महत्त्वाच्या आणि विशेष व वाढत्या वाहन संख्येनुसार रस्ते, वाहतूक सिग्नल्स, वाहतूक संचालन इ.ची व्यवस्था करणे. यामध्ये रस्ते बांधणी व त्यांची वेळेत निगा राखण्यासाठी इंडियन रोड कॉंग्रेस वा तत्सम प्रमुख व सक्षम संस्थांचे ज्ञान-अनुभव व मार्गदर्शक मुद्यांचा अवलंब करणे व त्यांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे यांचा व वाहन चालविण्याच्या निकषांनुसार परवाना देणे.

प्रशासन – रस्ते वाहतुकीशी निगडित अशी वाहतूक व्यवस्था करणे, वाहनांची संख्या व वाहतुकीच्या स्वरुपानुसार वाहतूक रचना करणे, वाहतूक विषयक कायदे व नियमांचे पालन होते अथवा नाही ते पाहणे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणे.

नागरिक व समाज – प्रत्येक वाहनचालक हा समाजघटक म्हणून वाहन चालवितो व वाहन चालविताना त्याला ठराविक नियम वा शिस्त पाळावी लागतेच. ही वाहतूक शिस्त न पाळणे म्हणजे अपघाताला थेट निमंत्रमच ठरणारे असल्याने प्रत्येक वाहनचालक, त्याचे मित्र-कुटुंबीय, सहकारी इ. प्रत्येकाने परस्परात वाहन आमि वाहतूक विषयक शिस्त आमि परस्पर जबाबदारीचे भान ठेवणे हे प्रत्येक व्यक्ती आणि प्रसंगी समाजहिताचे ठरते. वाहन चालविताना पुढील मुद्यांकडे प्रकर्षाने व पूर्णपणे ध्यान ठेवणे आवश्‍यक असते.

वाहतुकीचे नियम पाळणे– डाव्या बाजूनेच वाहन चालविणे, वळताना सिग्नल देणे इ. आपल्या आणि इतरांच्या तसेच त्यांच्या वाहनांच्या सुरक्षेसाठी आवश्‍यक असते.

निर्धारित गती नियंत्रण – नियंत्रित वेगासह वाहतूक वाहन व रस्ता वाहतुकीसाठी पूरक ठरते.

सीट बेल्ट लावणे – चारचाकी वाहनातील चालक व प्रवाशांनी सीट बेल्ट लावल्यास अपघात टळू शकतात अथवा अपघातप्रसंगी होणाऱ्या शारीरिक नुकसानीची तीव्रता नक्‍कीच कमी होते.

हेल्मेट वापरणे – दुचाकी वाहनचालकांनी हेल्मेट लावल्यास त्यांना संरक्षण मिळतेच; शिवाय रस्ते अपघातप्रसंगी जखमांचे प्रमाण कमी येते.

प्रदूषण नियंत्रण तपासणी – वाहनांद्वारा सतत प्रदूषण होत असते. यावर इलाज म्हणजे प्रत्येक वाहन चालकाने निर्धारित

कालावधीनुसार आपल्या वाहनाची प्रदूषण नियंत्रण तपासणी – पडताळा करून घेणे सामाजिकदृष्ट्या अत्यावश्‍यक ठरते.

वाहन चालविताना धूम्रपान-मद्यपान न करणे – या उभय बाबतीत वाहन चालविताना त्याचा अवलंब केल्यास अपघातांना ते कारणीभूत व हानीकारक ठरणारे असल्याने त्यावर कटाक्षाने नियंत्रण ठेवणे आवश्‍यक असते.

वाहन चालविताना कानाजवळ मोबाईल वापरणे – वाहन दुचाकी असो अथवा चारचाकी, वाहन चालविताना वाहकाचे दोनी हात मोकळे असणे आवश्‍यक असतेच. यावर केवळ साहस वा अट्टाहासापोटी वाहन चालविताना एका हाताने मोबाईल वापरून केवळ एका हाताने वाहन चालविण्याचे धाडस करणे आपल्या तर अंगलट येतेच पण त्याचे घातक परिणाम इतर वाहन आणि प्रवाशांवर पण होतात हे विसरून कसे चालेल.

नायलॉन मांजा – गेली काही वर्षे नायलॉन वा चिनी मांजामुळे विशेषतः दुचाकी वाहनचालकांना जखमा होऊ अशा अपघातांपोटी जीव गमवावे लागले आहेत. त्यांनी असा मांजाची विक्री-वापर कटाक्षाने बंद होणे आवश्‍यक आहे.

हे सर्वच मुद्दे सुरक्षित वाहन-रस्ते वाहतूक व अपघात नियंत्रणाला प्रत्यक्ष व परस्पर पूरक असल्याने या आणि अशा मुद्यांचे पालन न केल्यास होणाऱ्या वा संभाव्य अपघातांचे गांभीर्य मुळातून समजून घेणे आवश्‍यक असून त्यादृष्टीने पुढील परिस्थिती आणि वस्तुस्थितीचे गांभीर्य अधिकच वाढते. सीट बेल्टचा वापर सुमारे 25% वाहनचालकच करतात व हीच स्थिती हेल्मेट वापरणाऱ्यांच्या संदर्भात पण सर्वसाधारणपणे दिसून येते.

संयुक्त राष्ट्र संघाच्या एका सर्वेक्षणानुसार भारतातील वाहन आणि रस्ते अपघातांमध्ये अपघाती वा मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींच्या नोकरी-रोजगारांवर होणाऱ्या परिणामांमुळे भारताच्या जीडीपी वर 3% एवढा नकारात्मक परिणाम होत असतो. भारतातील वाहन अपघातांमध्ये दररोज सुमारे 43 बालकांना या अपघातांना सामोरे जावे लागते.

मुख्य म्हणजे रस्ते अपघातांचे परिणाम आपल्यातील बालके, युवा-तरुण, घरच्या कमावत्या व्यक्ती-व्यावसायिक, ज्येष्ठ नागरिक या साऱ्यांना वेगळ्या प्रकारे व वेगवेगळ्या संदर्भात भोगावे लागत असल्याने या प्रकाराकडे केवळ अपघात-इजा-मृत्यू यासंदर्भातच न पाहता त्याचे वैयक्तिक, कौटुंबिक, सामूहिक, सामाजिक संदर्भातील आयाम तपासून पाहणे गरजेचे ठरते.

वाहतूकविषयक नियम, कायदे व सुरक्षित वाहन-वाहतूक यासंदर्भातील नियमांचे पालन करणे. अशा नियमांचे महत्त्व व उपयोग समजून घेऊन त्याचे अधिकाधिक प्रामाणिपणे व जबाबदारीने पालन करणे. रस्त्यांचे अद्ययावत स्वरुप कायम राखणे व त्यांची निगा राखणे. गरजांनुरुप वाहतुकीचे नियोजन-नियंत्रण करणे.सर्वसामान्यांमध्ये प्रबोधनाद्वारा जनजागृती करणे.

रस्ते वाहतूक अपघातांमुळे होणारे अपघात व त्याद्वारे विविध स्तरावर व विविध प्रकारे होणाऱ्या नुकसानीची जाणीव सातत्याने करणे. विविध सामाजिक संस्था-मंच, समाज माध्यमे, संवाद साधणे इ. साधनांचा समयोजित वापर करणे.
शासन-प्रशासन, पोलीस-वाहतूक विभाग व नागरिक आणि जनसामान्यांमध्ये संवाद-समन्वय-सहकार्य साधणे. वाहन आणि वाहतूक सुरक्षा साधताना दंड व शिक्षा या प्रशासनिक कारवाईचा सर्वात अखेरचा अशा स्वरुपात वापर करणे.

वाहन आणि रस्ते वाहतूक अधिक वा संपूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी वाहन चालविताना दिसून येणारा बेदरकार निष्काळजीपणा प्रामुख्याने व प्राधान्यासह हाताळणे गरजेचे आहे. हे काम केवळ कायदा-न्यायालय, पोलीस-प्रशासन, संवाद-प्रबोधन यामुळेच होईल असे नाही. कारण मूळ प्रश्‍न आहे तो आपल्या आणि वाहनचालकांच्या बेदरकार मानसिकतेचा.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)