मार्केट यार्डात रत्नागिरी हापूसची तुरळक आवक

गेल्या आठवड्याच्या तुलनेत भावात पेटीमागे 2 हजार रुपयांनी घसरण

पुणे – मार्केट यार्डात रत्नागिरी हापूसची तुरळक आवक सुरू झाली आहे. बाजारात रविवारी 40 ते 45 पेट्यांची आवक झाली आहे. गेल्या रविवारच्या तुलनेत आंब्याच्या पेटीच्या भावात 2 हजार रुपयांनी घट झाली आहे. बाजारात आज (दि. 28) 5 ते 7 डझनाच्या पेटीस 4 ते 9 हजार रुपये भाव मिळाल्याची माहिती व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.

बाजारात मागील रविवारी (दि. 21) रत्नागिरी आंब्याची पहिली आवक झाली होती. त्यावेळी पेटीस 11 हजार रुपये भाव मिळाला होता. त्यानंतर दररोज थोड्या प्रमाणात आंब्याची आवक होत आहे. बुधवारी (दि.24) आंब्याच्या 5 ते 7 डझनाच्या पेटीस 8 ते 11 हजार रुपये भाव मिळाला होता. त्या तुलनेत रविवारी आवक वाढली आहे. बाजारात 40 ते 45 पेट्या आंब्याची आवक झाली. पेटीस 4 ते 9 हजार रुपये भाव मिळाला.
मार्केट यार्डातील गणेश फ्रुट एजन्सी या गाळ्यावर आलेल्या कोकणातील “महालक्ष्मी ब्रॅंड’ च्या आंब्याला सर्वाधिक म्हणजे 9 हजार 1 रुपये भाव मिळाला. पिंपरी-चिंचवड भागातील व्यापारी सुनील शेप आणि जगन्नाथ शेप यांनी या आंब्याची खरेदी केल्याची माहिती मोरे यांनी दिली आहे. दरम्यान, आता आंब्याची तुरळक प्रमाणात आवक सुरू झाली आहे. 10 फेब्रुवारीपासून आंब्याची सुरळीत आवक सुरू होईल. भावामध्येही घट होईल, असे व्यापारी युवराज काची यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)