मार्केट यार्डात मुक्‍या जनावरांना पिण्यासाठी पाणी, निवारा उपलब्ध नाही

बाजार समितीचे दुर्लक्ष : जनावरांना होतोय उन्हाचा त्रास

पुणे- महाराष्ट्रातील मोठी बाजारपेठ, अशी ओळख असलेल्या गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील विक्रीसाठी आलेल्या जनावरांना पिण्यासाठी पाणी आणि निवारासारख्या किमान मुलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भर उन्हाळ्यात जनावरांना उन्हाचा त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे जनावरे विक्रीसाठी आलेल्यांनाही पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. संपूर्ण बाजारातून कोट्यावधी रुपयांचा सेस वसुल करणारी बाजार समिती किमान मूलभुत सुविधा तरी उपलब्ध करून देणार का, असा सवाल आता बाजार घटकांमधून विचारण्यात येत आहे.
मार्केट यार्डातील केळी बाजाराच्या शेजारील जागेत दर रविवारी जनावरांचा बाजार भरतो. येथे प्रत्येक रविवारी सुमारे 100 हून अधिक म्हशी, तर 60 ते 70 शेळ्या, मेंढ्या खरेदी-विक्रीसाठी येत असतात.

सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेला बाजार दुपारी साडे बारापर्यंत चालतो. उन्हाळ्यात उन्हामुळे माणसाच्या शरीराची लाही-लाही होत असते. तीच गत जनावरांची होत असते. मात्र, बाजार समितीचे याकडे लक्षच नाही. गेल्या काही वर्षांत जनावरांच्या बाजारात उलाढाल घटल्याच्या कारणावरून बाजार समिती प्रशासन या बाजाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे व्यापारी वर्गाचे म्हणणे आहे. तर हा व्यापार बंद करण्याचा काहींचा घाट असल्याचा आरोप काही लोक करत आहेत. त्या दृष्टीने बाजार समितीकडून पाऊलेही उचलण्यात येत आहेत. जनावरांचा बाजार भरत असलेल्या ठिकाणावर बाजार समितीने काही शेडही उभारले आहेत. येथील जागा कांदा-बटाटा व्यापारासाठी, गोडाऊनसाठी व्यापाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. तर येथील आणखी मोकळी जागा दुचाकी, चारचाकी, मोठे ट्रक यांना पार्किंगसाठी देण्यात आली आहे. परिणामी, जनावरांच्या व्यापारासाठी कमी जागा उपलब्ध आहे. उन्हात जनावरांचा व्यापार होत आहे.

याविषयी नाव न देण्याच्या अटीवर गुरांचे व्यापारी म्हणाले, बाजारात दर रविवारी शेकडो जनावरांची वर्दळ राहते. गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका वाढत आहे. वाढलेले उन्ह हे म्हशी, शेळ्या-मेंढ्यांसाठी मोठ्या प्रमाणात त्रासदायक ठरते. म्हशींना पिण्यासाठी तसेच थंड राहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्‍यकता भासते. मात्र, प्रशासनाकडून पिण्यासाठी पाणी तसेच निवाऱ्याची व्यवस्था न केल्याने त्याचा त्रास या मुक्‍या जनावरांना होत आहे. सध्या नागरिकांना दूरवरून पाणी आणून जनावरांची तहान भागवावी लागत आहे. व्यापाऱ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी तसेच बसण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

विभाग प्रमुखांचा बोलण्यास नकार
जनावरांच्या बाजारात असलेल्या या दुरावस्थेबद्दल विभाग प्रमुख अनंत रायकर यांना पत्रकारांनी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी काहीही माहिती देण्यास आणि बोलण्यास नकार दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)