मार्केट यार्डात कांद्याची हंगामातील सर्वोच्च आवक

घाऊक बाजारात भावात किलोमागे 10 रुपयांनी घसरण

किरकोळ बाजारातही भाव उतरले

-Ads-

पुणे- गरवी कांद्याचा हंगाम जोरात सुरू झाला आहे. मार्केटयार्डातील कांदा विभागात सोमवारी हंगामातील सर्वोच्च तब्बल 300 ट्रक इतकी आवक झाली. त्यामुळे मागील काही दिवसांपासून वाढलेल्या कांद्याच्या भावात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत घाऊक बाजारात कांद्याच्या भावात किलोमध्ये सुमारे दहा रुपयांनी घसरण झाली.

येथील घाऊक बाजारात कांद्याला प्रती दहा किलोस 150 ते 200 रुपये भाव मिळत असल्याची माहिती व्यापारी रितेश पोमण यांनी दिली. दरम्यान किरकोळ बाजारातही कांद्याचे भाव घसरले असून, 25 ते 30 रुपये किलो भावाने कांद्याची विक्री होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. तर आणखी भाव घसरतील, या शक्‍यतेने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कांद्याचा हंगाम राज्यभर जोरात आहे. पुण्यासह राज्यातील इतर बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांदा दाखल होत आहे. पुण्यात सोमवारी तर तब्बल 300 ट्रक कांद्याची आवक झाली. त्या तुलनेत कांद्यास मागणी कमी असल्यामुळे कांद्याच्या भावात मोठी घसरण झाली आहे. मागील आठवड्यात घाऊक बाजारात कांद्याला प्रति 10 किलोस 250 ते 300 रुपये भाव मिळत होता. त्यामध्ये घसरण होऊन आता 150 ते 200 रुपये भाव मिळत आहे. दरम्यान, भावात आणखी घसरण होण्याच्या शक्‍यतेने शेतकऱ्यांनी अपरिपक्व आणि कच्चे कांदे बाजारात आणण्यास सुरूवात केली आहे.

जागतिक बाजारात भारताचा कांदा महाग
कांद्याचे भाव स्थिरावण्यासाठी केंद्र शासनाने कांद्यावरील संपुर्ण निर्यातमूल्य कमी करावे, अशी मागणी उत्पादकांमधून होत आहे. याविषयी पोमण म्हणाले, देशांतर्गत बाजारपेठांमध्ये कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. त्यात निर्यात करावी, म्हटले तर निर्यात मूल्यही सरकारने वाढवले आहे. किमान निर्यात मूल्यच अधिक आहे. त्या निर्यातमूल्यापेक्षा कमी भावाने निर्यात करता येत नाही. त्यातच पाकिस्तान, इजिप्त आणि चीन या देशांचे कांद्यांचे भाव जागतिक बाजारपेठेमध्ये भारताच्या तुलनेत स्वस्त आहेत. त्यामुळे भारताचा कांदा विकला जात नाही. त्यामुळे निर्यात मूल्य कमी करण्याची आवश्‍यकता आहे. अन्यथा शेतकऱ्याला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागेले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)