सर्व हापूसच्या भावात घसरण 


नागरिकांकडून अपेक्षित मागणी नाही

पुणे – पावसाच्या भीतीने कर्नाटक हापूसची आवक वाढली आहे. त्या तुलनेत मागणी कमी असल्यामुळे रत्नागिरी, कर्नाटक हापूसच्या भावात घट झाली आहे. घाऊक बाजारात रत्नागिरी हापूसचे भाव देखील 200 ते 250 रुपये डझनपर्यंत खाली आले आहेत. तर कर्नाटक हापूस केवळ 100 ते 150 रुपये डझन विकण्याचे वेळ व्यापाऱ्यांवर आली आहे.
कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीमुळे ऐन हंगामामध्ये कर्नाटक हापूस आंब्याची आवक कमी झाली होती. आता निवडणुका झाल्यामुळे रखडलेला माल मोठ्या प्रमाणात बाजात येऊ लागला आहे. त्यात सध्या प्रचंड वाढलेला उकाडा लक्षात घेता कोणत्याही क्षणी धो-धो पाऊस होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यामुळे शेतकरी आणि व्यापारी चांगलेच धास्तावले असून, मिळेल ते पैसे पदरात पाडून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात माल बाजारात आणत आहेत. सध्या रत्नागिरी हापूसचा हंगाम शेवटच्या टप्प्यात असला तरी कर्नाटक हापसूची झालेली प्रचंड आवक, स्थानिक गावांतील हापूस, केशर आणि अन्य गावरान जातीचे आंबे दाखल होऊ लागले आहेत. आवक ज्या प्रमाणात होत आहे. त्या प्रमाणामध्ये नागरिकांकडून आंब्याला उठाव नाही. याचाच परिणाम भावावर झाला असून, आंब्याचे भाव मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत.
रविवारी गुलटेकडी मार्केटयार्डमध्ये कर्नाटक आंब्याच्या तब्बल 30 हजार पेट्यांची आवक झाली. तर रत्नागिरी हापूसची 4 हजार पेट्या आवक झाली. याशिवाय लालबाग, बदाम, केशरसह स्थानिक हापूस आणि गावरान आंब्ये देखील बाजात येऊ लागले आहेत. यामुळे किरकोळ बाजारात कर्नाटक हापूस 100 ते 150 रुपये डझन, रत्नागिरी हापूस 200 ते 250 रुपये डझने विक्री होऊ लागली आहे. रत्नागिरीची हापूसची या आठवड्यात आणि कर्नाटक हापूसची 10 जून पर्यंतच नागरिकांना या चव चाखता येईल, असे आंब्याचे व्यापारी अरविंद मोरे, रोहन उरसळ यांनी सांगितले.
घाऊक बाजारातील आंब्याचे भाव
कर्नाटक : कच्चा पायरी (4 डझन) 300-400, तयार कर्नाटक पायरी (4 डझन) 500 ते 600, कर्नाटक कच्चा हापूस (4 डझन) 400-600, तयार कर्नाटक हापूस (4 डझन) 700 ते 900, रत्नागिरी हापूस : कच्चा
(4 ते 8 डझन) 700-1200, तयार (4 ते 8 डझन) 1000-1500.

गावरान आंब्याची 30 ते 40 डाग आवक
मार्केट यार्डात गावरान आंब्याची आवक वाढली आहे. रविवारी 30 ते 40 डागची आवक झाली. हवेली तालुक्‍यातून विशेषता जास्त आवक होत आहे. चवीने गोड, नैसर्गिकरित्या पिकविलेले हे आंबे असल्याने नागरिकांकडून त्यांना मागई असते. घाऊक बाजारात दर्जानुसार 180 ते 200 रुपये भावाने गावरान हापूसची, तर 100 ते 125 रुपये भावाने पायरीची विक्री होत असल्याची माहिती व्यापारी तात्या कोंडे यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)