मार्केट यार्डात कडकडीत बंद

व्यापारी, कामगार संपात सहभागी


तर शेतकऱ्यांनी विक्रीसाठी शेतीमाल आणला नाही

पुणे – सकल मराठा समाजाच्या वतीने गुरूवारी मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या राज्यव्यापी आंदोलनाला
पाठींबा देत मार्केट यार्डातील व्यापारी, कामगार आणि विविध बाजार घटकांनी कडकडीत बंद पाळला. शेतकऱ्यांना पूर्व कल्पना दिल्याने मार्केट यार्डात शेतीमालाची आवक झालीच नाही. त्यामुळे तेथे कोणतेही व्यवहार झालेच नाहीत. एकंदरीत श्री छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड आडते असोसिएशन आणि कामगार युनियनने पुकारलेला बंद शंभर टक्के यशस्वी झाला. यापूर्वी दोन्ही संघटनांच्या आवाहनानुसार 30 जुलै रोजी मार्केट यार्ड बंद ठेवण्यात आले होते.
राज्यात आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. सर्वत्र जोरात आंदोलन सुरू आहे. गुरूवारी राज्यव्यापी बंद पुकारल्याचे त्यांनी जाहिर केले होते. त्यानुसार श्री छत्रपती शिवाजी महाराज आडते असोसिएशन आणि कामगार युनियनने बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार व्यापारी, कामगारांनी तर बंद पाळलाच.
या आवाहनाला प्रतिसाद देत गुरूवारी शेतकऱ्यांनी शेतीमाल विक्रीसाठी बाजारात आणलाच नाही. तर, किरकोळ विक्रेते आणि खरेदीदार खरेदीसाठी आलेच नाहीत. त्यामुळे फळे, भाजीपाला, कांदा-बटाटा, पान आणि केळी विभागातील कामकाज दिवसभरासाठी ठप्प झाले होते. भुसार बाजारात दुकाने चालू होती. मात्र, व्यवहार झाले नाहीत. तेथील कामगार संपात सहभागी झाले होते. परराज्यातून अल्प प्रमाणात शेतीमालाची ट्रकातून आवक झसली. मात्र, त्या गाड्या तशाच उभ्या आहेत. त्यातील माल काढणे आणि मालाची विक्री उद्या (शुक्रवारी) होणार आहे. गुरूवारी सकाळी मार्केट यार्डातील शारदा गजानन येथे सर्व व्यापारी, कामगार जमले. सुरूवातील गजाननाची आरती करण्यात आली. त्यानंतर मराठा आंदोलनात आतापर्यंत हुतात्म झालेल्याना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर मार्केट यार्डातील शिवाजी पुतळ्यापर्यंत मोर्चा काढण्यात आला. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. बंद विषयी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ म्हणाले, मराठा आरक्षणासाठी दुसऱ्यांदा पुकारलेला मार्केट यार्ड बंद पूर्णपणे यशस्वी झाला आहे. राज्यात मराठा समाजाचे ज्या तीव्रतेने आंदोलन सुरू आहे. एवढ्या मोठ्या तीव्रतेने कधीही कोणते आंदोलन झालेले नाही. त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांना आरक्षण द्यावे. त्यासाठी आवश्‍यक प्रक्रीया शासनाने त्वरित पूर्ण करावी. तर कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे म्हणाले, राज्य सरकारने मराठा आरक्षणास दिरंगाई करू नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांच्या भावना लक्षात घेऊन तात्काळ अधिवेशन बोलवावे. मराठा आरक्षणाची घोषणा करावी. अन्यथा राज्यात सुरू असलेले आंदोलन आणखी तीव्र होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
44 :thumbsup: Thumbs up
11 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
4 :blush: Great
0 :cry: Sad
3 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)