मार्केट यार्डात आणखी एक अनाधिकृत टपरी

प्रशासनाला मात्र, याबाबत काहीच माहित नाही

पुणे – मार्केट यार्डातील अनाधिकृत टपऱ्यांची संख्या दिवसेनदिवस वाढतच चालली आहे. आता भाजीपाला विभागात आणखी एक नवीन टपरी सुरू झाली आहे. ही टपरी रस्त्यालगत असल्याने वाहतुक कोंडी होत आहे. त्याचा बाजार घटकांसह शेतकऱ्यांना त्रास होत आहे. विशेष म्हणजे ही टपरी कोणाची आहे. कधी सुरू झाली, याबाबतची माहिती नसल्याचे खुद्द बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे बाजारात “आंधळ दळतय, कुत्र पीठ खातय’ या पंक्तीचा प्रत्यय इथे येत आहे. भाजप प्रणीत प्रशासक मंडळातील काही संचालकांच्या कार्यकर्त्यांच्याच या टपऱ्या आजेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याची बाजार घटकांमध्ये चर्चा आहे.
मागील काही दिवसांपासून मार्केट यार्डातील गुळ – भुसार विभाग, भाजीपाला, फळविभाग आदी विभागात अनाधिकृत टपऱ्या, खाद्यपदार्थांची दुकाने थाटली आहेत. एककीड बाजारात शिस्त लागावी, वाहतुक कोंडी कमी व्हावी, यासाठी बाजार समितीकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सोयीस्कररित्या अनाधिकृत टपऱ्यांकडे बाजार समिती दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे बाजारात पुन्हा वाहतुक कोंडी निर्माण होत आहे. परिणामी, शेतकऱ्यांचा माल गाळ्यवर पोहोचण्यास विलंब होत आहे. शेतकऱ्यांना कमी भाव मिळत आहे. थोडक्‍यात, बाजार वाढणाऱ्या अनाधिकृत टपऱ्यांचा फटका शेवटी शेतकऱ्यांनाच बसत आहे. भाजीपाला विभागात नव्याने सुरू झालेल्या अनधिकृत टपऱ्यांमुळे वाहतुक कोंडी होऊन अतिरिक्त शेतमाल लावण्यास जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे या टप-या हटवाव्यात अशी मागणी आडते असोसिएशनने प्रशासक मंडळाकडे केली होती. समितीचे नवनियुक्त सचिव बी.जे.देशमुख यांनी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर गरज, असलेल्या टपऱ्या यांचा विचार करून टपऱ्याबाबत नवीन धोरण ठरवू, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, कारवाई न करता प्रशासनांकडून टपऱ्यांना एकप्रकारे अभय दिल्याचे दिसून येत आहे.
याबाबत बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यावेळी ते म्हणाले,
बाजारात कोणी टपरी सुरू केली याची कल्पना नाही. मात्र, त्यावर तत्काळ कारवाई करून उद्याच (दि.30) टपरी हलविली जाईल.

 

आडते असोसिएशन आक्रमक : पणन संचालकाकडे मागणार दाद
बाजाराच्या हिताच्या निर्णयाला आडते असोसिएशन नेहमी पाठींबा देत आली आहे. बाजार समिती सचिव बी.जे.देशमुख यांनी बाजाराला शिस्त लावण्यासाठी सर्व बाजार घटकांशी चर्चा करून नविन नियमावली तयार केली. त्यावेळी आडते असोसिएशनसह सर्व बाजार घटकांनी त्यास प्रतिसाद दिला. त्यावेळी बाजारातील अनाधिकृत टपऱ्या काढण्याचे आश्‍वासनही त्यांनी आडते असोसिएशनला दिले होते. मात्र, जुन्या टपऱ्या हटविण्याची गोष्ट खूप दुरची. बाजारात आता नवीन टपऱ्या टाकण्यात येत आहेत. त्याचा त्रास आडत्यांसह सर्व बाजार घटकांना होत आहे. त्यामुळे बाजारातील टपऱ्या हटविण्यासाठी पणन संचालकांकडे दाद मागणार असल्याचे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)