मार्केट यार्डातील भुसार बाजार मंदच

गेल्या वर्षीच्या तुलनेत परिस्थिती सुधारली : मात्र, अपेक्षित व्यापार नाही

– विजयकुमार कुलकर्णी

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे- नोकरदार वर्गाचा तयार फराळ खरेदी करण्याकडे वाढलेला कल…किराणा माल मॉल खरेदीचा ट्रेंड…ग्रामीण भागातून येणाऱ्या खरेदीदारांची कमी झालेली संख्या, यामुळे पश्‍चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी घाऊक बाजारपेठ असलेल्या मार्केट यार्डातील भुसार विभागातील उलाढाल नेहमीच्या तुलनेत 60 ते 70 टक्केच आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत काही प्रमाणात सुधारणा झाली आहे. तरीही ऑनलाइन पद्धतीने थेट घरपोच भुसार बाजार पोहोचविणाऱ्या मल्टिनॅशनल कंपन्यांचे भुसार बाजारात व्यापाऱ्यांपुढे मोठे आव्हान आहे.

60-70%
नेहमीच्या तुलनेत व्यापार 

मार्केट यार्डातील भुसार बाजारात किराणा माल घाऊक भावात मिळत असल्याने पूर्वी शहर, उपनगर, ग्रामीण आणि अहमदनगर जिल्ह्यातील काही भागातून खरेदीदार पूर्वी मोठ्या संख्येने यायचे. ग्रामीण भागातील, शहरातील सर्व किराणा दुकानदार त्यांचा माल ठोक स्वरूपात येथून भरत. याबरोबरच येथे किरकोळ विक्रीही घाऊक भावात केली जात होती. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकही दिवाळी अथवा दर महिन्याच्या किराणा येथूनच भरत होते. मात्र, मागील काही वर्षांत ठिकठिकाणी मॉल उभे राहिले आहेत. येथे घाऊक भावानेच किराणा माल घराजवळ उपलब्ध होत आहे. उच्च न्यायालयानेही दिलेल्या आदेशानुसार, येथील किरकोळ विक्री बंद करण्यात आली होती. किरकोळ विक्रेत्यांचे परवाने रद्द झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांची संख्या घटली. पणन मंत्रालयाने नुकताच एक आदेश काढून येथे किरकोळ विक्री करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, त्यासाठी व्यापाऱ्यांना बाजार समितीकडून परवाने घ्यावे लागणार आहेत. या सर्व बाबींचा परिणाम मार्केट यार्डातील ग्राहक कमी होण्यावर झाला आहे.

गेल्या वर्षी नोटाबंदी, जीएसटीचा परिणाम (वस्तू आणि सेवा कर) भुसार बाजारातील विक्रीवर झाला होता. त्यात काही अंशी सुधारणा झाली आहे. तरीही नेहमीच्या तुलनेत उलाढाल कमीच आहे. त्यातच आता आरोग्याप्रती जागरूकता वाढत असल्याने मोजकेच फराळाचे पदार्थ करण्याकडे कल वाढला आहे. पूर्वी पंधरा-वीस दिवस फराळ पदार्थ केले जायचे. मात्र, आता दिवाळीच्या तीन-चार दिवसच हे पदार्थ केले जातात. या सर्व कारणांमुळे दिवाळीतील मार्केट यार्डातील घाऊक बाजारातील खरेदी घटली आहे.

नोटबंदी, जीएसटीच्या परिणामातून अजूनही मार्केट यार्डातील भुसार बाजारातील व्यापार बाहेर आलेला नाही. शहर, उपनगर आणि ग्रामीण भागातूनही मार्केट यार्डात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. मल्टिनॅशल कंपन्याही भुसार व्यवसायात आहेत. त्या कंपन्या ग्राहकांना थेट घरीच माल पोहोचवत आहेत. त्यामुळे व्यापार कमी झाला आहे. नेहमीच्या तुलनेत केवळ 60 ते 70 टक्केच व्यापार आहे.
– पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, दि पुना मर्चंट चेंबर.


पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. दिवाळीतील फराळाचे पदार्थ घरातच केले जायचे. नातेवाईक शेजारी राहणाऱ्यांना देण्याचे पद्धत होती. मात्र, आता विभक्त कुटुंब पद्धती रुढ झाली आहे. स्त्री-पुरूष दोघेही नोकरीला असल्याने तयार फराळ खरेदीकडे ग्राहकांचा मोठा कल वाढला आहे. याचाही परिणाम येथील व्यापार कमी होण्यावर झाला आहे.
– राजेंद्र बाठिया, माजी अध्यक्ष, दि पुना मर्चंट्‌स चेंबर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)