मार्कंडेय विद्यालयाने स्विकारले 21 दिव्यांगांचे शैक्षणिक पालकत्व

अनामप्रेम संस्थेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश, गणवेश , शैक्षणिक साहित्याचे वाटप
नगर – दिव्यांग विद्यार्थ्यांनी शिक्षणातून आपले भवितव्य घडविण्याच्या उद्देशाने गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय विद्यालयाने अनामप्रेम संस्थेतील 21 दिव्यांग विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्विकारुन, सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे त्यांना शाळेत प्रवेश दिला. या विद्यार्थ्यांना गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन शाळेत त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी संस्थेच्या खजिनदार डॉ.रत्ना बल्लाळ, मुख्यध्यापक रावसाहेब क्षेत्रे, उप मुख्यध्यापक पांडूरंग गोणे, पर्यवेक्षक दिपक रामदिन, सरोजनी रच्चा, शिक्षक प्रतिनिधी अलका आरोळे, प्रमोद चन्ना, संदिप छिंदम, अनामप्रेमचे व्यवस्थापक रामेश्‍वर फटांगरे, संभाजी खिलारी आदींसह शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
जीवनाशी संघर्ष करीत मोठ्या जिद्दीने शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांना मार्कंडेय विद्यालयाने मदतीचा हात दिला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना सामान्य प्रवाहात आनून, त्यांना गणित, इंग्रजी व इतर विषयांचे शिक्षक दर्जेदार शिक्षण देणार आहेत. त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी विशेष लक्ष देण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष शरद क्‍यादर यांनी सांगितले. या उपक्रमाचे संस्थेचे सचिव बाळकृष्ण सिद्दम यांनी स्वागत केले आहे.
पाचवी ते दहावी इयत्तेसाठी या दिव्यांग विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला असून, या विद्यार्थ्यांमध्ये अल्पदृष्टी व काही पुर्णत: अंध आहेत. त्यांना लागणारे सर्व शैक्षणिक साहित्य, गणवेश व इतर गरजा शाळेच्या वतीने पुर्ण केल्या जाणार आहेत. त्यांना सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे शिक्षक वर्गात शिकवणार असून, यानंतर ते विद्यार्थी अनामप्रेम संस्थेत ब्रेललिपीच्या माध्यमातून अभ्यास करणार असल्याची माहिती शाळेचे मुख्यध्यापक रावसाहेब क्षेत्रे यांनी दिली. तसेच यावेळी श्रीनिवास बोगा यांच्या वतीने दहावीतील गरजू विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम संचचे वाटप करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)