मारेकऱ्यांना पकडण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स नेमा

– डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरण
– हमीद दाभोलकर, मिलिंद देशमुख यांची मागणी
पुणे  (प्रतिनिधी) – अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे (अंनिस) कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला तब्बल 45 महिने पूर्ण झाले आहेत. तरीही डॉ. दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाचा केस प्रकरणामध्ये संशियित असलेले सनातन संस्थेचे कार्यकर्ते सारंग अकोलकर आणि विनय पवार अद्याप फरार आहेत. या दोघांना पकडण्यासाठी स्पेशल टास्क फोर्स नेमण्यात यावी, अशी मागणी अंनिसचे सरचिटणीस डॉ. हमीद दाभोलकर आणि राज्य प्रधान सचिव मिलिंद देशमुख यांनी पत्रकार परिषदेत केली.
डॉ. दाभोलकर म्हणाले, सीबीआय, एनआयए आणि गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपास करणारी एसआयटी यांच्याबरोबरच दहशतवाद विरोधी पथक यांची स्पेशल टास्क फोर्स नेमून अकोलकर आणि पवार यांचा तातडीने शोध घ्यावा. अकोलकर आणि पवार या दोघांना जोपर्यंत अटक होत नाही, तोपर्यंत विवेकवादी लोकांना असलेला धोका कायम आहे. तरीदेखील सीबीआय आणि महाराष्ट्र शासन त्या दोघांना पकडण्यात पुरेसे प्रयत्न करत नाही. सीबीआयने संशयित मारेकऱ्यांबद्दल माहिती देणाऱ्यास प्रत्येकी 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. तर राज्य शासनाने कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणी अजून बक्षीस जाहीर केले नाही. त्या दोघांना फरार जाहीर करून त्यांची संपत्तीवर जप्ती आणण्याची प्रक्रिया सुरू केलेली नाही. शासनाच्या दिरंगाईमुळे विवेकवादी लोकांना धोका वाढत आहे.
अशिष खेतान यांनाही धमकी
डॉ. दाभोलकर प्रकरणात प्लॅन्चेटचा वापर केल्याचे उघडकीस आणणारे पत्रकार अशिष खेताना यांना नुकतेच धमकीचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यात डॉ. दाभोलकर प्रकरणी डॉ. वीरेंद्र तावडे याला अटक झाल्याबद्दल खेतान यांना शिक्षा देण्यात येईल, असा आशय आहे. खेतान यांनी याबाबतची माहिती भेट घेऊन केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांना दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)