मारुती सुझुकी दक्षिण डेअर रॅली ; गिलकडे आघाडी, संदीप तिसऱ्या स्थानी

पुणे: महिंद्रचा तीन वेळचा एपीआरसी चॅम्पियन गौरव गिलने आपला फॉर्म कायम ठेवताना मारुती सुझुकी दक्षिण डेअरच्या चौथ्या दिवसअखेर लीडरबोर्डमध्ये आपली आघाडी कायम ठेवली आहे. गिलने मुसा शेरीफसह चार विशेष स्तरामध्ये चमक दाखवताना 04:59:45 वेळेसह पहिला क्रमांक राखला. एकूण 2000 किमी अंतराची दक्षिण डेअर रॅली कर्नाटक व महाराष्ट्रातून जात गोवा येथे संपते.

गौरवचाच संघ सहकारी फिलिपोस मथाईने पीव्हीएस मूर्तीसह 05:07:15 वेळ देताना दुसरे स्थान मिळवले. मथाई व गिल यामध्ये आठ मिनिटांचा फरक आहे. गिलने विशेष स्तराला धीम्या गतीने रॅली सुरू केली. मात्र नंतर त्याने आपला फॉर्म दाखवला. येथे गाडी चालवणे सोपे नसून अत्यंत आव्हानात्मक असल्याचे सांगून गिल म्हणाला की, आम्हाला ट्रॅकच्या अडथळ्यांसदर्भात अधिक माहिती नव्हती. त्यामध्ये आम्ही सावधपणे जाण्याचा निर्णय घेतला व त्याचा आम्हाला फायदाच झाला.

कर्नाटकमधील देवांगेरे येथे सुरू असलेल्या या रॅलीत संदीप शर्माने आपला फॉर्म कायम ठेवताना तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला मारुती सुझुकी मोटरस्पोर्टस संघाचा चालक असलेल्या संदीपने नेव्हिगेटर अनमोल रामपालसह 05:18:19 अशी वेळ नोंदवली. सुरुवातीच्या दिवशी मला चमक दाखवता आली नाही. पण नंतर मला सूर सापडला. मी चांगली वेळ नोंदवली आणि यामध्ये सातत्य राखण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे याचा शेवट काय होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल, असे तिसरा क्रमांक राखणाऱ्या संदीप शर्माने सांगितले.

अमित्रजित घोष व त्याचा सह चालक अश्‍विन नाईक यांना सलग तिसऱ्या दिवशी म्हणावी तशी कामगिरी न करता आल्याने चौथ्या स्थानी राहावे लागले. या जोडीने 5:19:06 अशी वेळ नोंदवली. मारुती सुझुकी मोटरस्पोर्टसच्या सम्राट कुमारने करण उकटासह 5:19:29 सेकंद वेळेची नोंद करताना पाचवे स्थान मिळवले.

बाईक गटात युवा कुमार व आकाश ऐतल हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या स्थानी आहेत. तर, तिसऱ्या फेरीनंतर जतिन जैनने तिसऱ्या स्थानाची निश्‍चिती केली आहे. त्याआधी युवा कुमारने पहिल्या दिवशी 1:43:30 वेळेसह अव्वल स्थान मिळवले होते. विश्‍वास एस डी याने 1:48:22 वेळेसह दुसरे, तर आकाश ऐथलने 1:49:29 वेळेसह तिसरे स्थान पटकावले होते.
गतविजेत्या टीम मारुती सुझुकीच्या सुरेश राणाला दुसऱ्या दिवशी सुरुवातीला अडथळ्याला सामोरे जावे लागले होते. टायर पंक्‍चर झाल्याने त्याला सात मिनिटांचा तोटा सहन करावा लागला. मात्र त्यामधूनही सावरत त्याने दिवसाच्या शेवटी आपले आव्हान कायम राखले. त्यामुळे उरलेल्या तीन दिवसांत तो चमक दाखवण्यास सज्ज असेल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)