मारहाण झालेले अतिक्रमण निरीक्षक पडाळ यांची समाजकल्याण विभागात बदली

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 25 – मार्केटयार्ड परिसरातील हॉटेलव्यावसायिकावर अतिक्रमण कारवाई केल्याच्या कारणावरून मारहाण झालेले आणि त्यानंतर खंडणीचा गुन्हा दाखल झालेले महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील निरीक्षक किशोर पडाळ यांची समाजकल्याण विभागात उपअभियंता पदावर बदली करण्यात आली आहे. ज्या अधिकाऱ्यावरून महापालिकेत सभागृहनेते आणि कॉंग्रेसचे गटनेते यांच्यात वाद रंगला आहे, त्या पडाळ यांची बदली राजकीय दबावापोटी तडकाफडकी करण्यात आल्याची चर्चा महापालिकेत रंगली आहे.
मार्केटयार्ड परिसरात हॉटेल व्यावसायिकावर कारवाई केल्याच्या कारणावरून पडाळ यांना महापालिका भवनातील त्यांच्या कार्यालयात येऊन भुजबळ नावाच्या व्यक्तीने मारहाण केली होती. त्याच्यावर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर दोन दिवसांनी पडाळ यांच्या विरोधात संबंधित हॉटेल मालकाने खंडणी मागितल्याची तक्रार दाखल केली आहे.
हा विषय महापालिका मुख्यसभेतही गाजला. यावेळी कॉंग्रेस गटनेते अरविंद शिंदे आणि सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांच्यात हमरीतुमरी झाली. त्यामध्ये भिमाले यांनी शिंदे यांच्याविषयी आक्षेपार्ह विधाने केली. त्या विधानांमुळे शिंदे यांनी भिमाले यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीची तक्रार शिवाजीनगर पोलीसांत नोंदवली. भिमाले यांनीही दुसऱ्या दिवशी शिंदेंविरोधात तक्रार दिली.
महापालिकेच्या इतिहासात सर्वसाधारण सभेतील विधानावरुन सभागृहनेते आणि एका पक्षाच्या गटनेता यांनी परस्पर विरोधी अदखलपात्र गुन्हे दाखल होण्याची पहिलीच वेळ आहे. या सर्व घडामोडीनंतर पडाळ यांची तडकाफडकी अतिक्रमण विभागातून समाजकल्याण विभागात बदली करण्यात आली आहे. पडाळ यांची बदली राजकीय दबावापोटीच करण्यात आल्याची चर्चा अतिक्रमण विभागात सुरू आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)