माय-लेकीचा खून करणाऱ्या भोंदू बाबाला दुहेरी जन्मठेप

विशेष न्यायाधीश आर.एन.सरदेसाई यांचा आदेश
पुणे, दि. 31 (प्रतिनिधी) – सराफ व्यावसायिकाकडे गहाण ठेवलेले सोने परत मागितल्याने घरकाम करणाऱ्या माय-लेकींचा डोक्‍यात पहार घालून खून करणाऱ्या भोंदू बाबाला न्यायालयाने दुहेरी जन्मठेप आणि 2 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी हा आदेश दिला आहे. दंडाची रक्कम न भरल्यास 1 वर्ष अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात नमुद केले आहे.
गड्डामेदी कनक राजू शंकर गौडा ऊर्फ रामदास महाराज ऊर्फ दत्तगुरू महाराज (वय 60, रा. माण, ता. मुळशी. मुळ रा. आंध्र प्रदेश) असे शिक्षा झालेल्या भोंदूबाबाचे नाव आहे. सुभद्रा काशिनाथ ऊर्फ कासाराम चव्हाण (वय 35) आणि बसंती काशिनाथ ऊर्फ कासाराम चव्हाण (दीड वर्षे) अशी खून झालेल्या माय-लेकींची नावे आहेत. याप्रकरणी सुभद्रा चव्हाण यांचे वडील जगन्नाथ काळे (रा. गुलबर्गा, कर्नाटक) यांनी फिर्याद दिली आहे.
ही घटना एप्रिल 2013 मध्ये घडली. घटनेच्या पाच ते सहा महिन्यांपुर्वी फिर्यादी हे त्यांच्या पत्नी, मुला-मुलींसह माण परिसरातील राक्षेवस्ती येथील एका विटभट्टीवर काम करत होते. तर, आरोपी हा परिसरात धार्मिक विधी करून त्यावर उपजिवीका करीत होता. तेथेच भाड्याच्या खोलीमध्ये राहत होता. त्यावेळी आरोपी आणि फिर्यादी यांच्यात ओळख निर्माण झाली. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांना मयत सुभद्रा चव्हाण हिस घरकामासाठी पाठविण्यास सांगितले. वीटभट्टीवर मिळणाऱ्या मोबदल्यापेक्षा जास्त पैसे देईन, असे सांगितल्यानंतर फिर्यादी यांनी त्यांच्या मुलीला आरोपी भोंदूबाबाच्या घरी पाठविले. सुभद्रा चव्हाण या त्यांच्या मुलीसह भोंदूबाबाच्या घरी राहून सर्व काम करीत होत्या. यादरम्यान, त्याने सुभद्रा यांच्याकडे उसने स्वरूपात पैशांची मागणी केली. पैसे नसल्याने सुभद्रा यांनी त्यांच्या बहिणीकडील सोने बाबाला दिले. आरोपीने ते सोने सराफाकडे गहाण ठेवले होते. काही दिवसानंतर सुभद्रा यांनी आरोपीकडे गहाण ठेवलेले सोने सोडवून आणण्याची मागणी केली. त्यावेळी, त्याने पैशांची व्यवस्था झाल्यानंतर सोने सोडवून देतो, असे सांगितले. मात्र, त्यानंतरही त्याने सोने सोडवून न दिल्यावमुळे घटनेच्या दिवशी दोघांमध्ये वादावादी झाली. दुसऱ्या दिवशी आरोपी पहाटे पाचच्या सुमारास घराला कुलूप लावून निघाला असताना घरमालकाने त्याला हटकले. त्यावेळी, त्याने आपण शिर्डीला चाललो असून सुभद्रा, बसंती हिस तिच्या घरच्यांकडे पाठविले असल्याचे मालकास सांगितले.
घटनेच्या दुसऱ्या दिवशी भोंदूबाबा राहत असलेल्या बंद घरातून वास येऊ लागल्याने घरमालकाने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत खिडकीतून पाहिले असता सुभद्रा आणि बसंती यांचा हात आणि पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी त्याविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. अखेर गुन्हे शाखा युनिट 3 च्या पथकाने कारवाई करत त्याला 11 मे 2013 रोजी भोपाळ येथून अटक केली. त्यावेळी, त्याच्याकडे शेकडो सिमकार्ड, मोबाईल तसेच विवध राज्यातील प्रवासाचे पास तसेच वेगवेगळ्या नावांची निवडणूक ओळखपत्रे आढळून आली. याप्रकरणी पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. संबंधित गुन्हा हा दुर्मिळात दुर्मिळ स्वरुपाचा आहे. प्रतिकार करू नये यादृष्टीने आरोपीने थंड डोक्‍याने हे कृत्य केले असून त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी, अशी मागणी अतिरिक्त सरकारी वकील लीना पाठक यांनी केली. ऍड. पाठक यांनी या प्रकरणात 24 साक्षीदार तपासले. परिस्थितीजन्य पुरावा, शवविच्छेदन अहवाल, वैद्यकीय पुरावा यामध्ये महत्त्वाचा ठरला. पोलीस निरीक्षक (गुन्हे) पी. डी पाटील, तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी या प्रकरणाचा तपास केला. त्यांना न्यायालयीन कामकाजासाठी हवालदार दीपक गायकवाड यांनी मदत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)