मायावती, ममतांना पंतप्रधानपदाच्या उमेदवार बनवण्यास ना नाही: देवेगौडा 

नवी दिल्ली: पुढील लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात लढण्यासाठी विरोधकांची भक्कम आघाडी उभी राहण्याची गरज माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांनी व्यक्त केली आहे. याशिवाय, पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी किंवा बसप प्रमुख मायावती यांना विरोधी आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवार बनवण्यास ना नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कॉंग्रेससह इतर विरोधी पक्ष आघाडी स्थापन करण्याच्या दृष्टीने हालचाली करत आहेत. मात्र, पंतप्रधानपदाचा उमेदवार निवडणुकीनंतरच ठरवला जावा. निवडणुकीआधी उमेदवार निश्‍चित करण्याची बाब विरोधी ऐक्‍यासाठी प्रतिकूल ठरू शकते, असे कॉंग्रेस आणि इतर विरोधी पक्षांना वाटत आहे. इतर विरोधी पक्षाच्या नेत्यालाही पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून स्वीकारण्याची तयारी कॉंग्रेसनेही दर्शवली आहे. फक्त त्यासाठी त्या उमेदवाराला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पाठिंबा नसावा, अशी अट घातली आहे. यापार्श्‍वभूमीवर, जेडीएसचे प्रमुख असणाऱ्या देवेगौडा यांनी विरोधी आघाडी आणि पंतप्रधानपदाचा उमेदवार आदी बाबींवर पीटीआय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीतून भूमिका मांडली.
ममतांना पंतप्रधानपदाच्या उमेदवार म्हणून स्वीकारणार का, असा प्रश्‍न त्यांना विचारण्यात आला. ममतांच्या उमेदवारीचे स्वागतच करू. दिवंगत इंदिरा गांधी यांनी सतरा वर्षे पंतप्रधानपद भुषवले. केवळ पुरूषांनीच पंतप्रधान का बनावे? ममता किंवा मायावतींनी का नाही, असा प्रतिसवाल त्यांनी उत्तरादाखल केला. भाजपला राजकीय पर्याय देण्याचा सूर बळावू लागला आहे, असे म्हणत त्यांनी राष्ट्रीय पक्ष म्हणून कॉंग्रेस विरोधी ऐक्‍य दृढ करण्यासाठी महत्वाची भूमिका निभावेल, असा विश्‍वासही व्यक्त केला. कॉंग्रेस आणि जेडीएस कर्नाटकमध्ये एकत्रितपणे सत्तेवर आहेत. दोन्ही पक्ष कर्नाटकमध्ये लोकसभा निवडणूक एकत्रितपणेच लढवतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)