मायबाप सरकार, पाणी तरी वेळेत मिळावे!

– समीर कोडिलकर

पुणे – राज्यातील अनेक भागांत नोव्हेंबरच्या अखेरीसच तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. आगामी मान्सूनला अजून सात ते आठ महिने बाकी आहेत. तर, पाणीसाठेही झपाट्याने तळाच्या दिशेने जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर गावा-गावांमध्ये जनावरांना चारा आणि नागरिकांना पिण्यासाठी पाणी पोहचविण्यासाठीचे नियोजन सरकारने त्वरीत करणे गरजेचे आहे.

राज्यात यंदा सरासरीपेक्षा 10 टक्के कमी पाऊस पडला. विशेषत: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात यंदा हे प्रमाण तर सरासरीपेक्षा 60 टक्‍क्‍यांपेक्षा कमी आहे. यामुळे अनेक जलसाठेही भरू शकलेले नाहीत. मराठवाड्यातील 75 पैकी 36 प्रकल्पांमध्ये उपयुक्त पाण्याचा थेंबही नाही. जालना, बीड आणि लातूर या लघुप्रकल्पातील पाणीसाठ्याची अवस्था चिंतनीय आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत जे दुष्काळ पडले, त्यात साधारणत: फेब्रुवारीनंतर टंचाई सुरू व्हायची. यंदा मात्र नोव्हेंबरमध्येच अशी अवस्था निर्माण झाली आहे.मराठवाड्यात एकूण 11 मोठे प्रकल्प आहेत त्यामध्ये केवळ 27 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

बीड जिल्ह्यातील माजलगाव, मांजरा, उस्मानाबाद जिल्ह्यातील सिनाकोळेगाव या तीन मोठ्या प्रकल्पांत उपयुक्‍त पाण्याचा थेंब नाही. येलदरी प्रकल्पात 9 टक्‍के, तर निम्नदुधना प्रकल्पात केवळ 15 टक्‍केच उपयुक्‍त पाणी शिल्लक आहे. मध्यम 75 प्रकल्पांमध्ये 16 टक्‍केच उपयुक्‍त पाणीसाठा आहे.

पश्‍चिम महाराष्ट्रातील काही पट्ट्यात दुष्काळाच्या झळा बसत आहेत. त्यात पुणे आणि सोलापूर जिल्ह्यात परिस्थिती बिकट आहे. सोलापूरला उजनीचा पाणीपुरवठा होत असला, तरी जिल्ह्यात मात्र अनेक ठिकाणी तलाव कोरडे पडले आहेत. यामध्ये जेमतेम एक ते दीड महिना पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

पुणे जिल्ह्यात शिरुर, हवेली, पुरंदर तालुक्‍यांत हळूहळू पाणीटंचाई जाणवत आहे. कोल्हापूर आणि कोकण विभागात परिस्थिती चांगली आहे. फेब्रुवारीनंतर या भागात ही टंचाई जाणवण्याची शक्‍यता आहे. नाशिक विभागातील धरणांमध्ये 44 टक्के म्हणजे हा पाणीसाठा निम्याहून अधिक घटला आहे. अजून आठ महिने हे पाणी कसे पुरवायचे याबाबत प्रशासानाचे नियोजन सुरू आहे.

एकंदरी राज्यातील अनेक भागात पाण्याचा तुटवडा जाणवणार आहे. काही ठिकाणी तर परिस्थिती आताच गंभीर आहे, तर काही भागांत एक ते दोन महिन्यानंतर परिस्थिती गंभीर होऊ शकते. यामुळे राज्यात आगामी काळात टॅंकरची संख्या वाढणार आहे. त्याचे नियोजन आतापासूनच केले पाहिजे, अन्यथा ऐनवेळी शासनाला रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची वेळ येईल. त्यासाठीसुद्धा भरमसाठ खर्च करावा लागणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
8 :thumbsup:
8 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)