मायबाप सरकार, दिवसा वीज देता का वीज

शिरुर तालुक्‍यातील शेतकऱ्यांची आर्त हाक : बागायती शेती धोक्‍यात
कवठे येमाई – मायबाप सरकार, शेतीसाठी दिवसा वीज देता वीज, असे म्हणण्याची वेळ शिरुर तालुक्‍यातील शेतकऱ्यांवर आली आहे. यंदा पावसाने पाठ फिरविल्याने शिरूर तालुक्‍यात पाणीटंचाईचे भीषण स्थिती उद्‌भवली आहे. या भागातील शेती व नागरिकांना वरदान ठरत असलेल्या डिंबा, घोड, चासकमान धरणात बऱ्यापैकी पाणीसाठा उपलब्ध आहे. त्याच पाण्यावर शेती टिकविण्यासाठी शेतकऱ्यांचा आटापिटा सुरु आहे. परंतु तालुक्‍यातील अनेक भागातील शेतकऱ्यांची ही व्यथा आहे. सध्या तीव्र थंडीचे दिवस आहेत. रात्री, अपरात्री शेतीला पाणी देताना थंडीबरोबरच अनेक संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. महावितरणाकडून अनेकदा रात्री 9 ते सकाळी 7 पर्यंत वीजपुरवठा केला जात आहे. दिवसभर शेतात काम करून रात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना रात्रभर शेतात 8 ते 10 डिग्री तापमानात शेतीला पाणी देण्यासाठी उभे रहावे लागत आहे.
शेतीला पाणी देण्यासाठी शेतकरी रात्री पाणी देण्यासाठी गेल्यानंतर कुटुंबाच्या चिंतेत भर पडत आहे. रात्री साप, विंचू, बिबट्या, तरस, लांडगे या वन्य प्राण्यांची संकटे शेतकऱ्यांच्या समोर आवासून उभी आहेत. या संकटातून मात करीत शेतकरी अंधारात शेतीला पाणी देण्याचे काम करीत आहे. अनेक समस्यांच्या गर्तेत शेतकरी सापडला असताना महावितरणच्या अनियमित आणि वेळापत्रकातील बदलाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. बोचऱ्या थंडीत मायबाप सरकार शेतीला किमान दिवसा 12 तास वीज देईल काय, अशी मागणी शिरूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांतून होत आहे.

तालुक्‍याच्या पूर्व भागातील यांनी व्यक्त केली आहे. शेतकऱ्या बदल सरकारला एवढी चीड का आहे ? शेतकऱयांनीच रात्रभर का जागं राहायचं ? असा सवाल ही गदादे यांनी केला आहे. अनेकदा शेतीसाठी रात्रीची वीज उपलब्ध असते. रात्री वीज डी.पी वरील फ्यूज गेला तर तो टाकण्यासाठी मंडळाने रात्रीचे कर्मचारी दिलेले नसतात. शेतकर्यांना जिव धोक्‍यात घालून फ्युज टाकावे लागत असल्याचे ते म्हणाले. येवढं करून शेतकऱयांच्या हातात काय पडतय ? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
-गणेश गदादे, शेतकरी, तांदळी.

महावितरणच्या शिरूर सबडिव्हिजनअंतर्गत एकूण 11 सबस्टेशन कार्यरत आहेत. शेतकऱ्यांची दिवसा शेतीसाठी वीज देण्याची मागणी जरी रास्त असली तरी महावितरणच्या धोरणानुसार तालुक्‍यातील प्रत्येक सब डिव्हिजनअंतर्गत असणाऱ्या शेतीपंप वीज ग्राहकांना एका आठवड्यात दिवसा व दुसऱ्या आठवड्यात रात्रीची वीज उपलब्ध केली जात आहे.
– जितेंद्र भिरूड, उपकार्यकारी अभियंता, शिरूर विभाग, महावितरण.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)