श्री सिद्धनाथाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात
मायणी, दि. 8(प्रतिनिधी)- “श्री सिद्धनाथाच्या नावांन चांगभल”च्या जयघोषात येथील ग्रामदैवत श्री सिद्धनाथ देवाची वार्षिक रथोत्सव यात्रा हजारो भाविकनाच्या उपस्थिती व भक्तिमय वातावरणात पार पडली. भविकांकडून रथावर दहा रुपयां पासून हजारो रुपये अर्पण करुन गुलाल खोबऱ्याची उधळण करण्यात आली.
आज सकाळी येथील श्री सिद्धनाथ मारुती मंदिरामध्ये श्री सिद्धानाथाची विधिवत पूजा करण्यात आली . मंदिर परीसरात विद्युत रोषणाई व फुलांच्या माळांनी सजविण्यात आला होता .मंदिरातील श्री सिध्दनाथ व माता जोगेश्वरी मुर्तीची विधीवत पूजा मांडली होती. तसेच रथ, पालखी व मानाची सासनकाठी ही फुलांच्या माळानी सजविण्यात आली होती .
सकाळी अकरा वाजता जिल्हा परिषद सदस्य, मायणी अर्बन बॅंकेचे चेअरमन सुरेन्द्र गुदगे , नाथ मारुती देवस्थान ट्रस्टचे सचिव सुधाकर कुबेर,यात्रा कमिटीचे चेअरमन डॉ. विकास देशमुख ,मानकरी व विश्वस्त यांच्या प्रमुख उपस्थितीत सिद्धानाथ मारुती देवस्थान ट्रस्ट चे चेअरमन विकास आबासाहेब देशमुख यांच्या हस्ते रथ पूजन करण्यात आले.
हा रथ गुदगे वाडा, चावडी चौक, उभी पेठ,नवी पेठ पुन्हा याचमार्गाने मुख्य बाजारपेठेतून एस. टी. बसस्थानक,मराठी शाळा, फुलेनगर,मातंग वस्ती, विटा रोड मार्गे, चांदणी चौकात आला. येथून हा रथ वडुज रोड ,कचरेवाडी,इंदिरा नगरपासून पुन्हा मुख्य रस्ताने रात्री उशिरा मंदिर परिसरामध्ये दाखल झाला.
रथ मार्गावर प्रत्येक ठिकाणी रथाचे पूजन करण्यात येत होते . भाविक रथावर मोठ्या गुलालाची उधळण करुन दहा पासून हजारो रुपये अर्पण करीत होते. तसेच रथ मार्गावर अनेक ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. प्रत्येकाच्या घरी पुराणपोळ्या करण्यात आल्या होत्या. रथमार्गावर पोलिस विभागामार्फत चोख बंदोवस्त ठेवण्यात आला होता .
म्हसवड ,पंढरपुरकडे जाणारी वाहतूक वळविण्यात आली होती, परंतु मायणी येथे लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या बाह्यवळण (बायपास)मार्गाच्या धुळीचा सामना आज वाहनचालकांना करावा लागला. त्यामुळे पुन्हा हा रस्ता खडीकरण किंवा डांबरी करण्याची मागणी आज होत होती. रथ मार्गावर व मंदिर परिसरामध्ये लहान मुलांची खेळण्याची व मेवा मिठाईची दुकाने लावण्यात आली होती.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा