मायणीजवळील चांद नदीवरील पुलाला भगदाड

मायणी : चांद नदीवरील पुलावर पडलेले मोठे भगदाड अपघाताला आमंत्रण देत आहे. (छाया : महेश जाधव)

अपघातांना आमंत्रण : तातडीने डागडुजी करण्याची मागणी

मायणी, दि. 23 (वार्ताहर) – मायणी शहरातून जाणाऱ्या मल्हारपेठ पंढरपूर राज्यमार्गावरील शहराच्या चांद नदीच्या पुलावर मोठे भगदाड पडले आहे. या भगदाडामुळे मोठ्या वाहनांचे नुकसान तर होतेच मात्र दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून पुलावरून प्रवास करावा लागत आहे. अनेक वेळा मागणी करूनही हे भगदाड बुजवले जात नाही. एखादा अपघात होवून जीवित हानी होण्याची वाट संबंधित विभाग पाहत तर नाही ना असा सवाल परिसरातील नागरिक व वाहन चालक करीत आहेत.
मायणी शहराला चांद नदीने वेढले आहे. शहरात प्रवेश करताना पूर्व व पश्‍चिम बाजूस चांद नदीवरील दोन मोठे फरशी पूल आहेत. या पुलावरून रोज शेकडो वाहने ये-जा करत असतात. गतवर्षी मायणी शहराच्या पश्‍चिम बाजूस अशाच प्रकारे भगदाड पडले होते. आज पूर्व बाजूस असलेल्या या चांद नदीवरील पूलावर सुमारे दीड फूट लांबी रुंदी व पाच फूट खोली असलेले भगदाड पडले आहे. याच मार्गावरून दररोज हजारो भक्त सद्‌गुरू सरुताई यांच्या समाधी मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जात असतात. तसेच शाळेत जाणारे शेकडो विद्यार्थी विद्यार्थिनी जाण्यासाठी या पूलाचा वापर करत असतात. मागील महिन्यांमध्ये या राज्य मार्गाचा ठेका दिलेल्या ठेकेदाराने राज्यमार्गावर पडलेले खड्डे खडी मिश्रित सिमेंटने भरले होते. मात्र त्यावेळी लहान असलेले हे भगदाड आता रुद्ररूप धारण करत आहे. त्यामुळे संबंधित विभागाला गेल्या दोन महिन्यापासून हे भगदाड दिसत नाही का? जाणूनबुजून कानाडोळा केला जात आहे का? या भगदाडामुळे मोठा अपघात होऊन कोणाला तरी आपले प्राण गमवावे लागल्यानंतर संबंधित अधिकारी व ठेकेदारांना जाग येणार आहे का असा सवाल नागरिक व वाहनचालक उपस्थित करत आहेत. त्यामुळे संबंधित विभागाने लवकरात लवकर हे पडलेले भगदाड भरावे, अशी मागणी होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)