मायक्रो स्क्रीन्स : ‘मेथी के लड्डू’   

प्राजक्‍ता कुंभार 

मातृत्व ही कोणत्याही स्त्रीच्या आयुष्यातली सर्वात सुखद भावना आहे. ‘आईपण’ मिरवण्यासाठी, दिवस जाण्यापासून ते डोहाळ जेवणापर्यंत ते कौतुक करून घेण्यासाठी प्रत्येक बाईचं मन उत्सुक असतं. यातला हवाहवासा सकारात्मक भाव सोडला, तरी आजही स्त्रीच्या परिपूर्णतेचा मापदंड हा अनेकदा तिच्या मातृत्वावरच ठरवलं जातो. इथे स्वतःहून मूल नाकारणारी, ती जबाबदारी घ्यायला तयार नसणारी बाई हा मुद्दाच वेगळा ठरतो. पण आपण आई होऊ शकत नाही म्हटल्यावर आपल्यात काहीतरी कमी आहे, असा सरधोपट विचार आजही अनेक सुशिक्षित स्त्रियांकडून केला जातो. यात चुकीचंही काही नाही, खरंतर. एका जीवाला जन्म देणं, त्याला छातीशी बिलगून अंगाई गाणं, त्याची सर्वतोपरी काळजी घेणं, त्याला थोपटणं, त्या इवल्या जीवाचे बोबडे बोल ऐकणं या गोष्टीच कोणालाही सुखाने वेडं करण्याची ताकद असणाऱ्या आहेत. त्यामुळेच असेल कदाचित पण त्या होणाऱ्या बाळाचे आजी आजोबा, घरात येणाऱ्या नव्या पाहुण्याबद्दल अतिशय उत्सुक असतात. बाळंतपणात लेकीला ‘मेथी’चे लाडू करून देण्यापासून ते तिचे खाण्यापिण्याचे डोहाळे पुरवण्याचे काम करणारी आईच कदाचित हे आईपण आणि आजी होणं एकावेळी सांभाळू शकते. मयंक यादव या दिग्दर्शकाची ‘मेथी के लड्डू’ ही सुनीता आणि तिच्या दोन मुलींची गोष्ट याच सुंदर भावनेभोवती तर फिरतेच, पण एका आई होऊ ना शकणाऱ्या, मातृत्वापासून वंचित असणाऱ्या अनेकींना एक आशेचा किरणही देते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही गोष्ट उलगडते ती सुनीताच्या स्वयंपाकघरात, आई आणि मुलीच्या संवादातून. सुनीताच्या दोन्ही मुली माहेरी आल्या आहेत. तिची मोठी मुलगी शाळेत शिक्षिका आहे, स्वतःच करियर उत्तम घडवतेय. पण लग्नानंतर काही वर्षे होऊनही तिला बाळ होत नाहीये. याउलट माहेरपणाला आलेल्या धाकट्या बहिणीला मात्र बाळ होणार आहे, त्यांच्या घरातलं पहिलं बाळ येणार आहे. मोठीला याच कौतुक आहे, पण आपल्यात काहीतरी कमी असा विचार तिच्या डोक्‍यात अविरत सुरू आहे. त्यातच तिची आई, ‘छोटी’ साठी मेथीचे लाडू बनवतीय. या सगळयात त्या मोठ्या बहिणीला खूप एकटं पडल्यासारखं वाटतंय. तिच्या आईच्या नजरेतून तिची ही अस्वस्थता, चिडचिड सुटली नाहीये. पण तिला काहीही समजवायला गेलं तरी त्यातून वेगळाच अर्थ काढून ती स्वतःला जास्त त्रास करून घेणार हेही आईला पक्‍कं माहितीये. शेवटी, एक भन्नाट शक्‍कल लढवून ही आई, या मोठ्या मुलीच्या चेहऱ्यावर फक्‍त हसू फुलवत नाही, तर तिला सतत जाणवणाऱ्या ‘त्या’ अपूर्णतेवर एक मार्गही नकळत सुचवते. आता ही शक्‍कल काय?

हे जाणून घेण्यासाठी ही शॉर्टफिल्म नक्कीच पाहावी लागेल. झरीना वहाब यांनी साकारलेल्या, आजच्या पिढीला समजून आणि सांभाळून घेणाऱ्या आईच्या आपल्याही नकळत प्रेमात पडायला होतं. मुलगी कितीही मोठी झाली तरी आईसोबतचं शेअरिंग, तिच्यासोबतचा संवाद कोणीही का रिप्लेस करू शकत नाही याचीच जाणीव होते. मेथीच्या लाडवांसारखी या गोष्टीचीही कडवट गोडसर चव काही क्षण तरी मनावर रेंगाळते, हेच विशेष. किमान एकदातरी हे मेथीचे लाडू अनुभवायला हवे, हे मात्र नक्कीच.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)