मायक्रो स्क्रीन्स : माझा हनिमून 

प्राजक्‍ता कुंभार 

लग्न अरेंज्ड असो की लव्ह, ‘हनिमून’ किंवा ‘मधुचंद्र’ हा कोणत्याही जोडप्याच्या वैवाहिक प्रवासातला अतिशय रोमॅंटिक, गुलाबी टप्पा असतो, कारण ते दिवस फक्‍त आणि फक्‍त त्या दोघांचे असतात. एकमेकांना समजून घेण्याचे, एकमेकांच्या सहवासात रूजण्याचे, नात्यांच्या नव्या बंधनांना हळुवार उलगडण्याचे! बिलिव्ह इट ऑर नॉट, पण स्वतःच्या हनिमूनचं स्वप्न प्रत्येकाने किमान एकदा तरी पाहिलेले असते. त्याच प्लॅनिंग, टुरिस्ट पॅकेज, भारतातले किंवा परदेशातले ठिकाण ठरवणे हे असे उद्योगही प्रत्येकाने किमान एकदा तरी नक्कीच केलेले असतात. अशावेळी मुंबईत राहिलेल्या, वाढलेल्या एखाद्या मुलीनं ‘मला माझ्या हनिमूनसाठी मुंबईला जायचंय’ असं सांगितले तर? काय वाटेल? त्याच शहरात राहून, तिथेच हनिमून? करण असनानी या दिग्दर्शकाची ‘माझा हनिमून’ ही पाच मिनिटांची गोष्ट आपल्याला हाच मुंबईतल्या मुंबईतला प्रवास उलगडून दाखवते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ही गोष्ट आहे, ऋजुताची (मिथिला पालकर). ती वीस वर्षांची आहे आणि तिचे नुकतेच लग्न ठरलंय. खरंतर तिला हे लग्न अजिबात करायचं नाहीये, पण आई बाबा सांगताहेत, म्हणून ती या लग्नाला तयार झाली. पण फक्‍त एवढं एकचं कारण तिच्या या होकारामागे नाही. महत्त्वाचे कारण आहे ते, तिचा ‘मुंबई मधला हनिमून’. पण ही सगळी गोष्ट आपल्या समोर येते ती एका कॅमेरा रेकॉर्डिंगमधून.

ओढणीची शोधाशोध करताना, ऋजुताला कपाटात तिच्या दादाचा जुना कॅमेरा सापडतो. ती तो टेबलावर ठेवून सुरू करते, आणि त्या कॅमेरासमोर बसून स्वतःबद्दल बोलायला सुरुवात करते. तिच्या आईबाबांनी तिला कधीच कुठे बाहेर जाऊ दिलं नाही. शाळा, कॉलेजमध्ये असतानाही तिला मुंबईत राहूनही कधी मुंबई अनुभवायला मिळाली नाही. तिचा दादा याच कॅमेऱ्यात त्याच्या भटकंतीची सगळी ठिकाणं तिच्यासाठी रेकॉर्ड करून आणायचा.

ऋजुता त्यामधून मुंबई अनुभवायची. पण आता तिचा दादाही सोबत नाही. तिला मुंबई अनुभवायचीये, मुंबईत मनसोक्‍त हिंडायचंय. फक्‍त चित्रपटातून, दादाच्या कॅमेऱ्यातून पाहिलेली मुंबई तिला स्वतःच्या डोळ्यांनी न्याहाळायचीये. तिला दादरचा वडापाव खायचायं सुक्‍या चटणीसोबत, शिवाजी पार्कला बसून गप्पा मारायच्यात, जुहू बीचला जाऊन आइस गोळा खायचायं, शाहरुख खानचा “मन्नत’ बंगला बॅंडस्टॅंडवरून बघायचाय. बास.. तिच्या हनिमूनच्या कल्पना आणि स्वप्नं ही एवढीच आहेत. ती त्या कॅमेऱ्यासमोर बसून स्वतःशीच त्या स्वप्नांची उजळणी करते आणि आपणही तिच्या या स्वप्नामध्ये गुंतत जातो.

ही शॉर्ट फिल्म संपते तीही एका अनपेक्षित शेवटासोबत. ‘सिटी ऑफ ड्रीम्स’च्या मायानगरीत, ऋजुताला मात्र घरी स्वतःच्या खोलीत बसून, स्वतःची स्वप्नं

स्वतःला सांगण्याचीही मुभा नाही हे सहज स्वीकारणं आपल्यालाही जमत नाही. मिथिला तिची स्वप्नं उलगडत जाते आणि आपण त्या स्वप्नांचा एक भाग होऊन जातो. छोट्या स्वप्नांमध्ये आयुष्य शोधण्याची ऋजुताची ही गोष्ट किमान एकदा अनुभवावी आहे मात्र नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)