मायक्रो स्क्रीन्स : ब्लाइंडस्पॉट   

प्राजक्‍ता कुंभार 

ब्लाइंड स्पॉट… म्हणजे नजरेचा असा टप्पा जिथे गोष्टी हव्या तितक्‍या स्पष्ट दिसत नाहीत. खरंतर ही एक वैज्ञानिक संज्ञा असली तरी आपल्या रोजच्या आयुष्यात, अनेकदा अगदी जवळच्या नात्यांमध्ये हा ‘ब्लाइंड स्पॉट’ अनेकदा अनुभवतो आपण. गोष्टी जश्‍या असतात तश्‍या दिसत नाहीत. अनेक घटनांचे रुढार्थ हे इतके खोलवर रुजलेले असतात की स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेल्या एखाद्या घटनेचा स्वतःला हवा तसा अर्थ लावला जातो. एखाद्यादिवशी ‘मला ऑफिसमध्ये काम आहे, आज नाही भेटणं शक्‍य’ असं सांगणाऱ्या नवऱ्याला जर त्याच दिवशी, अगदी तुम्ही सुचवलेल्या त्याच वेळी, एका दुसऱ्या स्त्रीला भेटताना पाहिलं तर? डोळ्यांना जे दिसतंय त्या पलीकडे काही विचार करता येईल की कित्येक वर्ष विश्वासावर टिकलेल्या तुमच्या नात्यात ‘ ब्लाइंडस्पॉट’ येईल? तानिया देवहंस या दिग्दर्शिकेची ‘ब्लाइंडस्पॉट’ ही गोष्ट नात्यांच्या अशाच एका अव्यक्त कोपऱ्याला आपल्या नजरेसमोर आणायचा प्रयत्न करते. ‘आपल्या पार्टनरचे विवाहबाह्य संबंध’ हा एकचं विचार डोक्‍यात ठेऊन अनेक नात्यांना न चुकलेला ‘संशया’चा हा धूसर टप्पा आपल्या समोर उलगडतो, तो एका जोडप्याच्या गोष्टीतून.

ही गोष्ट आहे, पूजा आणि राहुलची. त्यांचं लव्ह मॅरेज झालंय. दोघेही आपापल्या क्षेत्रात उत्तम काम करताहेत, चांगलं कमवताहेत. पण आता, मागे जाणाऱ्या वर्षांसोबत आणि जुन्या होणाऱ्या नात्यासोबत दोघेही एकमेकांना थोडे का असेना पण गृहीत धरायला लागले आहेत. आपल्या पार्टनरला काय आवडतं, त्यानुसार स्वतःला बदलण्यामध्ये कदाचित एकमेकांसाठी जगणं हे दोघेही विसरायला लागलेत. नेमक्‍या याच टप्प्यावर घडणाऱ्या एका प्रसंगामुळे, पूजाला राहुलच्या आयुष्यात दुसरी एखादी स्त्री असल्याचा संशय आहे. ती तिची ही शंका तिच्या मैत्रिणीला बोलूनही दाखवते. इथपर्यंत अगदी ‘यात काय नवं’ असं वाटणारी ही गोष्ट वेगळी ठरते ते पूजाच्या निर्णयामुळे. ती राहुलला कोणताही जाब विचारत नाही, पण तिच्या डोक्‍यात मात्र सतत, तोच तो प्रसंग, तेच विचार येत राहतात. राहुलला या सगळ्याची काहीच कल्पना नसते. पण पूजाच्या वागण्यातला बदल त्याला जाणवायला लागतो. गोष्ट शेवटाकडे जाते तेव्हा, पूजाला राहुलच्या त्यावेळेच्या नेमक्‍या वागण्याचा खुलासा होतो आणि एका सुखद शेवटासह ही शॉर्टफिल्म संपते.

हा शेवट आपल्याला तसा थोडाफार अपेक्षित असतोच, पण शॉर्टफिल्ममध्ये अनुभवायचा आहे तो या कथेचा प्रवास. पूजा आणि राहुलच्या सुखवस्तू आयुष्यातले अनेक प्रसंग हे त्यांचं नातं ज्याप्रकारे उलगडवून दाखवतात ते खरंच अनुभवण्यासारखं आहे. पूजाच्या दृष्टिकोनातून होणारी शॉर्टफिल्मची सुरुवात, ज्यावेळी राहुलची बाजू आपल्यासमोर मांडते, त्यावेळी ‘दिसत तसं नसतं’ हे आपल्याही डोक्‍यात अगदी पक्कं होतं. नात्यांमध्ये संशयामुळे किंवा गैरसमजातून निर्माण होणारे ब्लाइंडस्पॉट अगदी स्पष्टपणे नजरेसमोर आणणारी ही शॉर्टफिल्म किमान एकदा तरी बघायला हवी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)