#मायक्रो-स्क्रीन्स: द गेस्ट

– प्राजक्ता कुंभार 
आपल्या डोक्‍यात प्रत्येक दिवसाचं प्लॅनिंग तयार असतं. अमुक वेळी, अमुक ठिकाणी, कसं आणि काय करायचं हे आपल्या डोक्‍यात पक्‍क असतं. कुठे किती वेळ थांबायचं, कोणाशी किती वेळ बोलायचं, स्वतःसाठी किती वेळा राखून ठेवायचा या सगळ्याचा तपशीलवार हिशेब आपल्या मेंदूने आधीच केलेला असतो. पण वेळेशी स्वतःला बांधून घेण्याच्या या खेळात आपण हे विसरून जातो की कितीही आखीव-रेखीव वाटतं असलं तरी आयुष्य ‘अनिश्‍चित’ आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक दिवसामध्ये स्वतःची अशी एक अनसर्टन्सी आहेच आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता आयुष्यात येणाऱ्या अशा अचानक समोर उभ्या टाकणाऱ्या अनेक प्रसंगांना त्यावेळी सुचेल-उमजेल अशा उत्तरांनी तात्पुरतं का असेना पण निभावून न्यावं लागत. पण अशावेळी ऐनवेळी सुचलेल्या उत्तरांतूनच अनेकदा प्रश्नांची मालिका सुरू होते.
समजा, तुम्ही घरातून दिवसभराचं अगदी पक्कं प्लॅनिंग करून बाहेर पडताय; आणि नेहमीच अगदी “शहाण्या बाळा’सारखी वागणारी तुमची गाडी एका आडवळणाला बंद पडतीये. आजूबाजूला मनुष्य वस्तीचा पुसट ठिपकाही तुमच्या नजरेस पडत नाहीये आणि तुम्हाला कोणाच्यातरी मदतीची नितांत गरज आहे. तुम्ही प्रयत्न करता आणि तुम्हाला मदत मिळतेही, पण ती मदत, मदत न ठरता एका अनपेक्षित संकटाची पहिली चाहूल ठरली तर? तर.. काय? मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये पुरस्कार विजेती ठरलेली ‘द गेस्ट’ ही शॉर्टफिल्म ही अशीच अनपेक्षित प्रवासाची गोष्ट आहे. अवघ्या आठ मिनिटांची, दिग्दर्शक अय्यप्पा केएम यांची ही गोष्ट, ‘ब्लॅक कॉमेडी’चा एक उत्तम नमुना म्हणता येईल.
ही गोष्ट आहे, एका तरुणाची (अविनाश तिवारी). जुन्या हिंदी चित्रपटातली गाणी ऐकत, निसर्गाच्या सान्निध्यात तो निवांत ड्राईव्ह करतोय आणि अचानक, अगदी अचानक त्याची गाडी बंद पडते, तेही अगदी सुनसान वाटेवर. गाडी पुन्हा सुरू करायचे तो त्याच्या परीने प्रयत्न करतो पण मेकॅनिकशिवाय पर्याय नाही, हे आता त्यालाही कळून चुकलंय. मग गाडी रस्त्यावर एका बाजूला उभी करून, कोणाची मदत मिळतीये का हे बघण्याचे त्याचे प्रयत्न सुरू होतात. तो घरी बायकोला फोन करून, त्या परिस्थितीची जाणीव करून देतो आणि त्याच्या लक्षात येत, की फोनची बॅटरीही मरायला टेकलीये. कुठेतरी कोणीतरी भेटेल आणि आपल्याला मदत मिळेल या धूसर शक्‍यतेचा विचार करत, तो रस्त्याने चालायला सुरुवात करतो.
दिवस सरतो, अंधार पडायला सुरुवात होते आणि त्याला नेमका एका घराचा निवारा सापडतो. तो दार वाजवतो आणि एक आजी दार उघडते. तो तिला त्याचा प्रॉब्लेम सांगतो. आजी म्हणते, ‘आता अंधार झालाय, सकाळी माझा मुलगा मेकॅनिकला फोन करेल, तू आज झोप इथेच.’ आजीच्या या अनपेक्षित पाहुणचाराने हा सुखावतो आणि तिने दाखवलेल्या घरापासून जरा दूरवर असणाऱ्या आऊट हाऊसमध्ये झोपायला जातो. या सुरळीत सुरू असणाऱ्या गोष्टीत एकच अडचण असते, ती म्हणजे त्या आऊट हाऊसच दार. त्याला आतून कडी घालणं शक्‍य नसतं, म्हणून मग आजी, ‘मी तुला सकाळी 7 वाजता उठवते,’ असं सांगून ते दार बाहेरून लावून घेते. दिवसभराच्या दगदगीने दमलेला हा क्षणात अगदी गुडूप झोपतो… आणि… आणि मग सकाळी नेमक काय होत? अनपेक्षितपणे मिळालेला हा पाहुणचार त्या तरुणासाठी कितपत बरा ठरतो? ती गाडी दुरुस्त होते की…? या साऱ्या प्रश्नांची उत्तरं ही शॉर्टफिल्म पाहूनच मिळवायला हवीत.
काही कथा या त्यांच्या जगावेगळ्या शेवटमुळे लक्षात राहतात. ही गोष्टही त्याच धाटणीची आहे. अनोळखी वाटेवर सोबतीने चालणाऱ्या आपल्या साथीदाराने कोणताही मागमूस न ठेवता, हात सोडून अचानक गायब व्हावं आणि आपण मुळापासून हादरून जावं अशा संभ्रमावस्थेत सोडून जाणाऱ्या या शॉर्टफिल्मचा शेवट चुकवू नये, एवढं मात्र खरं.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)