मायक्रो स्क्रीन्स : ‘तांडव’   

प्राजक्‍ता कुंभार 
पुराणातील अनेक उल्लेखांप्रमाणे, शंकराचे तांडव नृत्य हे सृष्टीच्या निर्मिती आणि संहार चक्राचं प्रतीक मानलं जातं. आनंद आणि क्रोध, हे मानवी भावनांचे टोकाचे कंगोरे, ‘नृत्य’ या कलेतून उलगडून दाखवणं, त्यातून नवनिर्मितीचा प्रयत्न करणं, हे भगवंतालाच जमू शकेल. मला तरी ‘तांडव’ हा स्वतःमध्ये गुंतत आत्मशोधाचा एक उत्तम मार्ग वाटतो. आपल्या रोजच्या आयुष्यातही, नवनवीन प्रश्‍नांचा, अडचणींचा सामना करणं आणि त्यांच्यावर उत्तरं शोधणं या चक्रात आपण पुरते अडकून जातो. आपल्या अंगात कोणत्याही दैवी शक्‍ती नसल्यामुळे असेल कदाचित, एखाद्या क्षणी असं वाटतं की, “बास, सोडून देऊया सगळं, नाही जमणार आता काही, अगदीच कंटाळा आलाय सगळ्याचा.’ आता यानंतर, जेव्हा कधी असं निराशेचा विचार डोक्‍यात येईल, तेव्हा बाकी काही करू नका… फक्त ‘तांडव’ करा. दिग्दर्शक देवाशिष माखिजा यांची ‘तांडव’ ही मोजूनमापून 11 मिनिटांची ही शॉर्टफिल्म म्हणजे स्वतःपुरता आनंद शोधण्याची गोष्ट आणि 11 मिनिटांसाठी स्क्रीनवर ‘मनोज वाजपेयी’चा वावर बघणं इज ट्रीट टू आईज.
ही गोष्ट आहे आहे, महाराष्ट्र पोलीस म्हणून कार्यरत असणाऱ्या ‘तांबे’ या एका पोलीस कॉन्स्टेबलची. या हवालदाराला सगळीकडूनच समस्यांनी घेरलंय. पोलीस वसाहतीत राहणारा, फारसा पगार नसणारा, प्रामाणिक, कुटुंबाची काळजी घेणारा तांबे आयुष्यातले तेच ते प्रश्न सोडवून विटलाय. त्याच्या मुलीला एका उत्तम शाळेत मिळणारं ऍडमिशन डोनेशनमुळे रखडलंय. स्वतःची हौसमौज बाजूला ठेवून, कसाबसा संसार करणारी त्याची बायको, आता मुलीच्या भविष्यासाठी मात्र पेटून उठली आहे. त्यातच तांबेचे सहकारी त्याच्यावर नाराज आहेत, कारण त्याच्यामुळे त्यांनाही भ्रष्टाचार करता येत नाहीये. एकूणच, ‘तांबे’ हा अगदी चहुबाजूंनी अडचणीच्या चक्रव्यूहात अडकलाय. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या रात्रीची ड्युटी त्याला लागते. तिथे रिक्षावाला भाडं नाकारतो, म्हणून त्याच्याशी भांडणारा एक माणूस तांबेला त्या भांडणात ओढू पाहतो. रिक्षावाला आणि तो माणूस, दोघेही आपापली बाजू अगदी जीव तोडून तांबेला पटवून देत असतात. मात्र, तांबेचं त्यांच्या बोलण्याकडे काडीमात्रही लक्ष नसतं. स्वतःच्याच अडचणींमध्ये गुंतलेला तांबे एका क्षणाला त्याची बंदूक बाहेर काढतो… ती लोड करतो…आणि…
या ‘आणि’च्या पुढे नेमकं काय होतं, हे जाणून घेण्यासाठी ही शॉर्टफिल्म नक्कीच पाहायला हवी. या शॉर्टफिल्मचा शेवट तर, अगदीच चुकवायला नको. आनंद व आपलेपणा फक्‍त एका हास्यातून उलगडून दाखवणारा शेवट, आपल्यालाही आयुष्याकडे सकारात्मकतेने पाहायला शिकवतो. तांबेच्या बायकोच्या भूमिकेतली मराठमोळी विभावरी देशपांडे विशेष भाव खाऊन जाते. मोजून दोन ते तीन सीन्समध्ये दिसणारी आणि एकही संवाद नसणारी ही बायको, बोलते ते फक्त चेहऱ्यावरच्या हावभावातून. ‘तांबे’ला तिने चहा देण्याचा प्रसंग तर विशेष जमून आलाय. छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद शोधायला लावणारी आणि किमान काही क्षण स्वतःसाठी जगायला लावणारी, ही ‘तांडवा’ची गोष्ट एकदा तरी अनुभवी हे नक्की.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)