#मायक्रो-स्क्रीन्स: ‘खामख़ा’  

– प्राजक्ता कुंभार 
असं म्हणतात की बऱ्याच गोडुल्या-गोंडस नात्यांची सुरुवात ही एखाद्या अनपेक्षित प्रवासात होते. अशा प्रवासात आपल्या शेजारी नेमकं कोण येऊन बसतं, यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात म्हणा. पण वेगवेगळ्या कारणांनी, आपापल्या मुक्‍कामाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सुरू झालेल्या प्रवासात आधी कोणतीही ओळख नसणारे, अनपेक्षितपणे भेटणारे सहप्रवासी, अगदी आपलेच वाटावेत इतपत जवळचे होऊन जातात. अनेकदा काही क्षणात मैत्र जुळतं ते अगदी आयुष्यभरासाठी. ठराविक वेळेचं बंधन असताना आणि हातात वेगवेगळ्या थांब्यांची तिकिटं असतानाही, मर्यादित वेळेच्या या खेळात कोणत्याही अपेक्षेशिवाय उतरायचं; तो अनोळखी सहवास एक्‍सप्लोर करायचा आणि काही वेळा सोबतच्या खेळात आपण मागे पडतोय, हे लक्षात आलं तरी खुल्या मनाने तो पराभव स्वीकारायचा. खिडकीतून हात बाहेर काढून हसतमुखाने आपल्याला “अलविदा’ करणाऱ्या सहप्रवाशाला तितक्‍याच आनंदाने “बाय’ करून आपण आपल्या वाटेने चालू पडायचं, ही अशीच गोष्ट असते आपली. पण याच सर्वसामान्य गोष्टीला टिपिकल बॉलीवूड तडका मिळाला तर? तुमच्या-आमच्या प्रवासाची ही सरळ साधी गोष्ट जर एका सुंदर लव्ह स्टोरीमध्ये बदलली तर?
आरती बागडी या दिग्दर्शिकेची, ‘खामख़ा’ ही शॉर्टफिल्म अशाच एका गोडमिट्ट प्रवासावर बेतलेली आहे. ही गोष्ट आहे उदयन (हर्षवर्धन राणे) आणि रावी (मंजिरी फडणीस) यांची. कामानिमित्त मुंबईला निघालेल्या उदयनची कॅब नेमकी (बॉलीवूड मसाला, यू नो) बंद पडते, आणि ती तात्पुरत्या दुरुस्तीच्या प्रयत्नांना कोणताही प्रतिसाद देत नाही. आता मुंबईला वेळेवर पोहोचणं अगदीच गरजेचं असल्याने, तो त्या रस्त्याने जाणाऱ्या एका एसटीला, (होय अगदी ग्रामीण भाषेत लाल डब्बा म्हणा; किंवा लाल परी) हात करतो.
एसी कारची सवय असणाऱ्या उदयनला हा एसटीचा प्रवास अशक्‍य होऊन जातो, ते त्याच्या शेजारी बसलेल्या एका आजोबांमुळे. सतत खिडकीतून बाहेर थुंकण्याची सवय असणाऱ्या या आजोबांच्या तावडीतून उदयनची सुटका करते ती रावी. तिच्या हातात असणारी हिंदी कादंबरी बघून उदयनला तिच्याशी बोलण्याचं निमित्त मिळते आणि वेगवेगळ्या सीट्‌सवर बसून सुरू झालेला प्रवास, या दोघांना एकमेकांच्या शेजारी घेऊन येतो. त्यांच्या संवादातून अनेक गोष्टी उलगडत जातात. हिंदी ही मातृभाषा असणाऱ्या, व्याकरण नियमांप्रमाणे उत्तम इंग्रजीत संवाद साधू न शकणाऱ्या व्यक्तींबद्दल, उदयनचे असणारे पूर्वग्रह आणि त्याच्या या गैरसमजांना हव्याहव्याशा वाटणाऱ्या आगाऊपणाने उत्तरं देऊन चुकीचं ठरवणारी रावी, असा हा प्रश्‍नोत्तरांचा खेळ आपल्यालाही त्यात गुंतवून टाकतो. एकमेकांची अगदी नावंही माहीत नसताना (शिवाय हे दोघे जेव्हा आपापली नावं सांगतात ना, त्यातही दिग्दर्शिकेनं भलतंच नाट्य आणलं आहे), सुरू असणारा त्यांचा हा संवाद एका बऱ्यापैकी अपेक्षित शेवटाला येऊन पोहोचतो.
हा शेवट आपल्याला अगदी सुरुवातीलाच समजलेला असतो. प्रत्येक प्रेमकहाणीचा होणारा आणि प्रेक्षकांना बऱ्यापैकी अपेक्षित असणारा सुखद शेवट या दोघांच्याही गोष्टीच्या वाट्याला येतो. प्रत्येकाला जवळपास माहिती असणारी, ठराविक वळणाने जाणारी ही गोष्ट वेगळी ठरते ती मंजिरी आणि हर्षवर्धन यांच्या अभिनयाने. ही अवघ्या 17 मिनिटांची सफर आहे ती खास बॉलीवूड प्रेमींसाठी. संवादातून आणि सहवासातून उलगडणाऱ्या या संवादिनीला प्रेमात पडलेल्या प्रत्येकाने किमान एकदा अनुभवावं, हे मात्र नक्‍की.
विशेष म्हणजे या फिल्मला “पीपल्स ऍप्रिसिएशनच’ एक बेस्ट शॉर्ट फिल्मचं “फिल्मफेअर ऍवॉर्ड’ही मिळालेलं आहे. एसटीच्या प्रवासाचा अस्सल ग्रामीण कॅनव्हास आणि त्यामधले हे दोन अनोळखी प्रवासी, सारं काही अगदी रिऍलिस्टीक वाटावं, असंच शूट झालंय. फिल्म पाहिल्यावर मात्र आपण खामख़ा (उगाचच) ही फिल्म बघितली, असं मात्र मुळीच वाटत नाही, हेच तिचं यश.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
9 :thumbsup:
5 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)