मायक्रो स्क्रीन्स : इलायची 

प्राजक्‍ता कुंभार 

आपला नवरा सतत आपल्या आजूबाजूला असावा, त्याने आपल्याला काय हवं, काय नको ते बघावं अशी लग्न झालेल्या प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. पण मेलेला नवरा जर भूत होऊन 24 तास आसपास फिरायला लागला तर? एकांत, एकटेपणा यातलं काहीच तुमच्या वाट्याला न येता, अगदी त्याला गमावण्याच्या दुःखातही सतत त्याचा अतृप्त आत्मा आजूबाजूला वावरताना दिसला तर? देवाशिष मखिजा या लेखक-दिग्दर्शकाची ‘इलायची’ ही अवघ्या पाच मिनिटांची ब्लॅक कॉमेडी, बायको आणि फक्‍त तिलाच दिसणारा, तिच्याशी बोलणारा, तिच्या नवऱ्याचा अतृप्त आत्मा यांची जगावेगळी गोष्ट आपल्यासमोर आणते. निमरत कौर आणि दिव्येंदू शर्मा या दोन गुणी अभिनेत्यांच्या अभिनयातून उलगडणारी ही गोष्ट, अगदी शेवटपर्यंत आपली उत्सुकता ताणून ठेवते.

ही गोष्ट सुरू होते, ती निमरत कौरच्या देवपूजेनं. देवाच्या फ्रेमसमोर उभी असणारी निमरत वळते आणि पहिल्या फ्रेममध्ये कुठेही नसणारा, ‘समर’ अचानक समोर येतो. समर म्हणजे तिचा नवरा. तो भूत आहे, हे पण अगदीच अनपेक्षित आणि भन्नाट पद्धतीने समोर येत आपल्या. हा ‘समर’ खरंच दुखीआत्मा आहे. त्याला मुक्‍ती मिळाली नाहीये आणि हे असं मध्येच अडकल्यासारखं राहायचा कंटाळा आलाय त्याला. यातून सुटका व्हावी, म्हणून त्याने आत्महत्या करायचाही प्रयत्न केलाय. पण ना रेल्वे त्याच्या अंगावरून गेलीये ना उंच इमारतीहून उडी मारून त्याचा जीव गेलाय. हे काहीही असलं तरी त्याला स्वतःच्या बायकोलाही एकटं सोडायचं नाहीये. म्हणून मग तो सतत तिच्या आजूबाजूला वावरतोय, तिला हे पटवून देतोय की ‘लेट्‌स लिव्ह टुगेदर’. दुसरीकडे त्याची बायको, मेलेल्या नवऱ्याला सतत आजूबाजूला पाहून वैतागलीये. अगदी बाथरूममध्येही तिला एकटीला जाऊ न देणारा आणि 24 तास स्वतःच्या सहवासाने वीट आणणारा हा आत्मा तिला कंटाळवाणा झालाय. त्याच्या या नकोशा सहवासापासून ती स्वतःची सुटका कशी करून घेते हे जाणून घेण्यासाठी आणि गोष्टीचं नाव ‘इलायची’ का ही उत्सुकता क्षमविण्यासाठी ही शॉर्टफिल्म पाहायलाच हवी.

निमरत कौर आरशासमोर स्वतःशी बोलते तो प्रसंग या शॉर्टफिल्मची जान आहे. तिच्यात शिरलेल्या आणि आपण कसं एकत्र राहू शकतो हे तिला पटवून देणाऱ्या ‘समर’च्या आत्म्याशी तिचा होणारा हा अगदी काही सेकंदांचा संवाद, तिचं त्याला दटावणं अगदीच जमून आलंय. या गोष्टीचा शेवटही असाच, अनपेक्षित आणि भन्नाट, काहीसा आडवळणाने जाणारा. नवरा- बायकोची, अगदी भुताची वगैरे गोष्ट असणाऱ्या या शॉर्टफिल्मचं नाव, ‘इलायची’ का? याचं उत्तर अगदी शेवटी गवसतं आपल्याला. आपली निवड ही आपल्याच हातात असते शेवटी, पण तरीही वेगवेगळ्या कारणांमुळे, प्रेशर्समुळे आपण इतरांना काय योग्य वाटतं याचा विचार करत राहतो. आपली निवड ही ‘आपली’ उरतच नाही आणि आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टी हातातून निसटून जातात.

‘निवड’ हाच या शॉर्टफिल्मचा अर्थ आहे, पण हे उलगडतं ते या गोष्टीच्या अतिशय उत्तम शेवटातून. ‘पुढे काय’ ही उत्सुकता शेवटपर्यंत ताणून धरणारी ही ब्लॅक कॉमेडी एकदा तरी नक्‍कीच अनुभवायला हवी.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
4 :heart:
8 :joy:
3 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)